24.9 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeलेख*जीवित ध्येय नित्य जगणारा सर्जक….अमर हबीब*

*जीवित ध्येय नित्य जगणारा सर्जक….अमर हबीब*

यशोगाथा

भाग २

आपल्या आजूबाजूला अनेक अस्वस्थ करणाऱ्या घटना घडत असतात. आपल्या जाणिवां इतक्या बोथट झाल्या आहेत की भोवतालच्या प्रश्नांवर पुढाकार घेवून काम करणे तर अशक्य. आपल्या स्वतच्या प्रश्नात आपण इतके गुरफटून जातो की बाह्य आर्त परिस्थिती दूरच पण आपल्या अगदीच निकटच्या व्यक्तींच्या हाकेला पण विवेकी प्रतिसाद देणे राहून जाते.कशात ऐवढे आपण मशगुल असतो कुणास ठाऊक पण खूपच झापड लाऊन जगत आहोत. तत्पर प्रतिसाद देणारे पण बरेच असतात पण साकल्याने विचार करून प्रतिसाद देणारे खूप कमी. आपल्या स्वतःत हे प्रतिसादीपण जपले पाहिजे. वाढवले पाहिजे. अमरकाकाचे मात्र प्रचंड प्रतिसादी आहे. त्याचा भावनिक प्रतिसादाच्या सोबतच विवेकी प्रतिसाद पण असतो.

देवळालीला सेवादलाचे शिबिर चालू होते. एस.एम जोशींनी सर्वांना आवाहन केले,

” सातपुड्यातील आदिवासींच्या जमिनीचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्यासाठी कायद्यात डॉक्टरेट केलेल्या ऍड वसुधाताई धगमवार (गीता साने या सुप्रसिद्ध लेखिकेची कन्या) येत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी कोण तयार आहे?”

याला तत्पर प्रतिसाद अमरकाकांचा होता. ते लगेच त्याभागात राहायला गेले. सगळीच विपरीत परिस्थिती पण मन लाऊन आणि धडाढीने काम केले. शेवटी शरीर आजारी पडले. मनाची इच्छा काम करत राहण्याची होती पण आजारपण वाढल्याने त्यांना परत यावं लागलं.
अशा आपल्या भोवतालच्या परिस्थितीला यथायोग्य प्रतिसाद देण्याची वृत्ती अमरकाकाने स्वतः चांगली विकसित केली.प्रतिसादी असण्या बरोबरच आपल्यात जबाबदारीचे भान पण वाढले पाहिजे. आपला भोवताल सुंदर आणि सुखी करण्याची जबाबदारी स्वतः घेतल्यास आपल्याला जीवन समजायला लागते. राजकीय वलयांकित आयुष्य बाजूला ठेवून बिहार मधील गयेला संघर्ष वाहिनीचे काम करण्याचा निर्णय अमरकाका घेवू शकले कारण त्यांना जबाबदारीच भान होते.बिहार मधील त्यांची चळवळ तेथील गुंडाराजच्या विरुद्ध होती.आपल्या विरुद्ध उठणारा आवाज गाडून टाकण्यासाठी बंदुका उचलून ठार करणाऱ्या निर्दयी लोकांच्या विरुद्ध लढणे सोपे नव्हते. फार प्रचंड इच्छाशक्तीचे सामर्थ्य लागते. असे सामर्थ्य ऋजुता,प्रेम आणि आपुलकीतून येते. चांगुलपणाच्या शक्तीवर गाढ विश्वास लागतो.हे सर्व काकांच्यामध्ये विकसित झाले ते जयप्रकाश नारायणाच्या सहवासात. संघर्ष वाहिनीचे ते राष्ट्रीय संयोजक होते. देशपातळीवर काम करणाऱ्या अनेक दिग्गज लोकांशी काकांची भेट होत होती. त्यातून एक नवा अमर हबीब जन्माला येत होता.

विनोबा भावेंच्या सोबतची आठवण तर खूप काही शिकवणारी होती. त्या भेटीत विनोबा त्यांना म्हणाले,

“विवाह करा. संसाराची जबाबदारी पूर्ण करा.आपल्या क्षेत्रात जाऊन तेथेच काम करा.”

आणि घडलेही तसेच. देशपातळीवर संघर्षाचे काम करणारे काका एक पती म्हणून आशामावशीची व मुलांची अपार काळजी घेतात. ते जसे चळवळीतील कार्यकर्ते आहेत तसेच कुटुंब वत्सल पती,पिता आणि आता तर आजोबा पण आहेत.

बिहारहून परतल्यावर त्यांचे नाते जुळले शेतकरी संघटनेशी. शरद जोशींच्या उमद्या आणि शोधक नेतृत्वाखाली शेतकरी चळवळ व्यापक बनत चालली होती. महाराष्ट्राच्या बहुतेक गावात चळवळीचे कार्यकर्ते उभे राहिले होते. एखादी चळवळ विस्तारने सोपे असते. गरजेच्या आधारावर काम केले की ते सहजच होते. संघटनेच्या कार्यकर्त्याचे वैचारिक भरण पोषण झाले तरच ती चळवळ टिकते आणि कार्यकर्ता समृद्ध होतो. काळाची गरज ओळखणारे शरद जोशी नुसते नेतृत्व करणारे नव्हते तर एक संशोधक पण होते. त्यांच्या शोधक वृतीने अमरकाकांना हेरले आणि त्यांना कार्यकर्ता प्रशिक्षणाचा प्रमुख केले. अतिशय महत्वाची जबबदारी काकांच्यावर आलेली होती. कार्यकर्त्यांचे वैचारिक भरणपोषण करणारा अमर काका मात्र पदवीधर पण नव्हता परंतु तो जीवनाच्या विश्वविद्यालयाचा विद्यार्थी होता.

अमरकाकांच्यातील अभिजात विद्यार्थीपणा ही एक त्यांची खासियत. शिकण्यासाठी ते कुणाच्याही पायाजवळ बसण्यात तयार असतात. अगदी अणुउर्जेचे कठीण सिद्धांत असो की जनुकीय विज्ञानाचे अतिशय गुंतागुंतीचे ज्ञान असो अमरकाका प्रचंड तन्मयतेने समजून घेतात. त्यांचा व्यापक लोकसंग्रह व त्यांच्याशी असणारे मैत्र यांच्या जोरावर काकांचे ज्ञान विश्व बहुव्यापक झालेले आहे. यासर्वाचा उपयोग शेतकरी संघटनेच्या कामात खूप झाला. त्यांची बालसुलभ प्रश्न विचारण्याची वृत्ती तर अफलातून आहे. त्यातून खूप साऱ्या बारीक गोष्टी स्पष्ट होतात. शरद जोशींच्या बरोबरच्या संवादातून खूप काही निर्मिती झाली. त्यांचे नाते हे फक्त वैचारिक न राहता भावनिक बनले.

शरद जोशींनी स्थापन केलेल्या शाळेत काकांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले. शाळेच्या प्राचार्यांनी सरळ सांगितले शरद जोशी कार्यक्रमाला येणार असतील तर मी उपस्थित राहणार नाही. तशी शक्यता कमी कसल्याचे अमर काकांनी त्यांना सांगितले. कार्यलयात परल्यावर मात्र म्हात्रेसरांच्या कडून कळले की शरद जोशी अमर काकांच्या भाषणाला येणार आहेत. काकांना त्याचा फारसा ताण नव्हता. त्यावर म्हात्रे सर म्हणाले,

“ मी तुला हे एवढ्यासाठीच सांगतोय की शरद जोशी भाषणातून कधीही मधेच उठून जातात.त्यांच्या बरोबर आलेला लवाजमा त्यांच्या सोबत उठून जातो. कार्यक्रमाचा बेरंग होतो.”

ज्या दिवशी अमर काकांचे भाषण होते त्यादिवशीच शरद जोशींचा जन्मदिवस होता. ते पुण्यातील त्यांच्या घरी होते.त्यांचे जन्मस्थळ सज्जनगडाला त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरले होते. त्याधी ते सर्व कार्यकर्त्यांना म्हणाले,

चला आता अमरचे भाषण ऐकायला जाऊ या !!”

सगळा लवाजमा भाषण ऐकण्यासाठी शाळेत आला. शरद जोशी अमर काकांच्या बाजूला. अमर काका भाषणाला उठले. त्यांचे पहिले वाक्य,

“ आजचे भाषण मी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी तयार केलेले आहे. मोठ्यांसाठी अजिबात नाही. जर कुणाला ते आवडले नाही तर ते भाषणातून उठून जाऊ शकतात. त्यांना त्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.”

अमर काकाचे भाषण सुरु झाले. सगळे मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. कोणीही जागचे उठले नाहीत अगदीच शरद जोशी पण !! भाषण संपले. काका आपल्या जागी बसले. शरद जोशी त्यांचे मनगट पकडले आणि प्रेमाने म्हणाले.

“अमर, तुझे हे भाषण मला पूर्ण लिहून दे. त्याचा अनुवाद करून मी घेतो. सर्व भारतभराच्या मुख्य वर्तमानपत्रातून ते आले पाहिजे.”

तो दिवस होता ३ सप्टेंबरचा. कार्यक्रम संपला सगळे जाण्यास निघाले. शरद जोशींनी काही अजूनही अमर काकांचा हात सोडला नव्हता.शेवटी गाडी मध्ये बसताना पण त्यांनी परत आपल्या बोलण्याची आठवण करून दिली. तो वाढदिवस शरद जोशींचा शेवटचा वाढदिवस ठरला. त्यानंतर १२ डिसेंबरला त्यांचे निधन झाले.

अमर काकांच्या विचारांच्या सोबतच वाणीचे सामर्थ्य अफाट आहे. त्यांनी देशभर भाषणं केली. काही प्रचंड गाजली. त्यांचा एक सोपा मंत्र आहे.

ताज बोला,स्वतःचे बोला आणि खरे बोला.’

कार्यकर्ता प्रतिसादी, जबाबदार, कल्पक त्यासोबतच पुनर्निर्माण करणारा असला पाहिजे. पुनर्निर्माण करण्याऱ्याचे पुनर्निर्माण करणारा तो सर्जक. असे सर्जकच या विश्वाचे पायाभूत घटक आहेत. त्यामुळे अन्नधान्याची निर्मिती काळ्या आईला कसून करणारा शेतकरी आणि आपल्या गर्भात नऊ महिने बाळ जपून जन्म देणारी आई म्हणजेच स्त्री हे दोघे मुळात सर्जक आहेत. काळाच्या प्रवाहात या दोन्ही सर्जक घटकांना गुलामगिरी टाकण्यात आले. राजसत्तेने शेतकऱ्यांना आणि धर्मसत्तेने सत्तेने स्त्रीला. या दोघांच्या स्वातंत्र्यासाठी काम केल्या शिवाय भारताचे प्रश्न सुटणार नाहीत हे अमर काकांना पुरते पटले आहे. अशा सर्जकाच्या स्वातंत्र्यासाठीचा लढा हेच अमर काकांचे जीवित ध्येय आहे. ते उठता जागता केवळ याचा विचार करतात. साहित्य निर्मितीत पण सर्जकता असते हे त्यांना वाटत होते म्हणून त्यांनी अंबाजोगाई मसापचे अमाप काम केले. तर शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी किसान पुत्र आंदोलनाची मुहुर्तमेढ रचली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर पहिल्यांदा शेतकरी विरोधी कायदे रद्द केले पाहिजेत. यासर्वांच्यासाठी काकांनी आपले उर्वरित आयुष्य वाहून घेतलेले आहे.

भारतात आपुलकीच्या ओलावा टिकला पाहिजे म्हणून अंतरभारतीचे काम काका मनापासून करतात. त्यांच्यातील सर्जक हा नवनवीन माणसे समाजात उभा करतोय. कुठलीही मोठी आस्थापना सोबत नसताना आपले जीवित ध्येय नित्य जगणारा सर्जक म्हणजे अमर काका …..त्याचा बहिरंग आपण समजून घेतला आता पुढे अंतरंग समजून घेवू या !!!

लेखन : प्रसाद चिक्षे:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]