प्रत्येकाने आपल्या जन्मदात्या आईला धर्माची उपमा देणे
म्हणजेच मातृत्वाचा उचित गौरव होय : गुणेश दादा पारनेरकर
लातूर ( वृत्तसेवा ) : आई म्हणजे आपला ईश्वर असते. आई ह्या दोन शब्दाचा मूळ अर्थच तो आहे. त्यामुळे आईच्या पोटी जन्म घेणाऱ्या प्रत्येकाने आपल्या जन्मदात्या आईला धर्माची उपमा देणे म्हणजेच मातृत्वाचा उचित गौरव होईल, असे प्रतिपादन गुरुसेवा मंडळ पारनेरचे अध्यक्ष पूर्णाचार्य श्री गुणेश दादा पारनेरकर यांनी केले.

लातूर येथील जीवन कला मंडळ व पूर्णवादी नारी फोरमच्या संयुक्त विद्यमाने रविवारी लातूर शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील पहिल्या महिला म्हणून यशस्वी झालेल्या, यशाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान झालेल्या महिलांचा सन्मान ‘ गौरव मातृत्वाचा ‘ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करण्यात आला. त्यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. वर्ष २०२३ हे पूर्णवादाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या वर्षात प. पू. रामचंद्र महाराज व प. पू. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या कृपाशिर्वादाने लातूर शहरात ‘सति सौभाग्यवती मनकर्णिका माता ‘ यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या उपक्रमांतर्गत ‘ गौरव मातृत्वाचा ‘ कार्यक्रम पार पडला.

यावेळी अशोक गोविंदपूरकर, लातूरच्या पहिल्या महिला खासदार श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर, जीवन कला मंडळाचे अध्यक्ष देवीकुमार पाठक, पूर्णवादी नारी फोरमच्या अध्यक्षा सौ. अमिता अशोक गोविंदपूरकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात जिल्ह्याच्या पहिल्या महिला खासदार श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर , पहिल्या महिला डॉक्टर डॉ. सौ. माया मधुकर कुलकर्णी, पहिल्या महिला प्राध्यापक श्रीमती चंद्रकला नंदकिशोर भार्गव, पहिल्या महिला इंजिनिअर सौ. सुनिता संचेती – गुगळे, पहिल्या महिला वकील एड. निलीमा पंडितराव देशमुख, पहिल्या महिला नगराध्यक्षा सौ. उषा कांबळे, पहिल्या महिला महापौर सौ. स्मिता कैलास खानापूरे , पूर्णवादी परिवाराच्या ज्येष्ठ उपासक श्रीमती पद्मजा टेकाळे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गुणेश दादा पारनेरकर पुढे म्हणाले की , काळाचे ज्ञान – वेळेचे भान हा पूर्णवादाचा मंत्र आहे. आज या ठिकाणी प्रतिष्ठापना होत असलेले मंदिर हे केवळ मनकर्णिका मातेचे नसून ते प्रत्येक मातेचे मंदिर आहे. आई ह्या संस्थेचे मंदिर आहे. आ म्हणजे आपला आणि ई म्हणजे ईश्वर अशी आई या शब्दाची फोड करता येईल. आई आपल्या मुलांच्या जीवनाची व्यवस्था लावते म्हणून ती मुलाच्या अर्थव्यवस्थेचीही जननी असते. भारतीय संस्कृती कुठल्याही अंगांनी एकांगी नाही. तर ती मातृ – पितृ संस्कृती आहे. धर्म आणि ईश्वर परस्परांना पूरक आहेत. त्यांना एकत्रित आणते तिला मातृशक्ती असे म्हटले जाते. आज दुर्दैवाने स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलला आहे. मात्र, स्त्री ही स्वरूपाने ईश्वर आहे येऊ समजून घेणे आवश्यक आहे. ज्याला आई आहे तो भारतीय अशीही आईची व्याख्या करता येईल असे पारनेरकर म्हणाले. स्त्रीकडे धर्म म्हणून पाहिले पाहिजे. व्यक्तीला आई कळत नाही तोपर्यंत धर्म कळत नाही. जगात कोठेही रहा , कितीही प्रगती करा पण आपल्यावर संस्कार करणाऱ्या आपल्या आईला विसरू नका असेही त्यांनी सांगितले.
माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांनी यावेळी आपले विचार व्यक्त करताना प्रत्येक आईने आपल्या मुलांवर चांगले संस्कार करणे आवश्यक आहे. आज आई आपल्या रडणाऱ्या लहान मुलांच्या हातात मोबाईल सोपवते ही बाब अत्यंत क्लेशदायक आहे. मुलांवर संस्कार करण्याचे काम आईचे असते. संस्कारांमुळेच मुले जीवनात यशस्वी होत असतात. येणाऱ्या काळात संस्कार खूप गरजेचे आहेत असे सांगून आपण केवळ आमदार संभाजी पाटील व अरविंद पाटील यांची आई नसून संपूर्ण जिल्ह्याची आई असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सर्व सत्कार मूर्ती मतांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक गोविंदपूरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अब्दुल गालिब शेख यांनी तर आभार प्रदर्शन देवीकुमार पाठक यांनी केले.
कार्यक्रमास आमदार संभाजी पाटील निलंगेकर, शैलेश लाहोटी, संपत पाटील, पूर्णवादी परिवारातील दिलीप वतनी , संजय कुलकर्णी , सुमुख गोविंदपूरकर , संजय टेकाळे, दर्शन टेकाळे , रेणुका कुलकर्णी, पंकज चामनीकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
————————-