विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४
निवडणूक विषयक पथकांनी सतर्क राहून कामकाज करावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
- जिल्हास्तरीय निवडणूक पथक प्रमुखांची बैठक
लातूर, दि. २३ : विधानसभा निवडणुकीसाठी गठीत करण्यात आलेल्या सर्व पथकांनी सतर्क राहून आपल्यावर सोपविलेली जबाबदारी पार पाडावी. यामध्ये कोणत्याही प्रकारे दिरंगाई अथवा हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात आयोजित निवडणूक पथक प्रमुखांच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, पोलीस उपाधीक्षक गजानन भातलवंडे, जिल्हा कोषागार अधिकारी उज्ज्वला पाटील, शिक्षणाधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी नागेश मापारी, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक केशव राऊत यांच्यासह विविध निवडणूक पथकांचे नोडल अधिकारी, विविध समितींचे सदस्य यावेळी उपस्थित होते. स्वीप समिती, प्रसारमाध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती, इन्फोर्समेंट समिती, कॅश रिलीज कमिटी आदी विविध समितींचा आढावा यावेळी घेण्यात आला.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया शांततामय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर विविध पथके गठीत करण्यात आली आहे. या सर्व पथकांनी परस्परांशी समन्वय ठेवून आपल्यावर सोपविलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी, निवडणूक खर्च संनियंत्रण करण्यासाठी स्थापन केलेल्या पथकांनी अधिक दक्ष राहून कामकाज करावे. रोख रक्कम अथवा अवैध दारू, अंमली पदार्थ जप्तीची कार्यवाही केल्यास प्रत्येक बाबीची बारकाईने नोंद घेवून अहवाल सादर करावा, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
स्वीप कक्षामार्फत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबवून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. एमसीएमसी समितीने राजकीय जाहिरात प्रमाणीकरण, पेड न्यूज आदी बाबींवर बारकाईने लक्ष ठेवावे. रोख रक्कम वाहतूक किंवा मतदारांना आमिष दाखविण्याचे प्रकार आढळून आल्यास त्वरित कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल ऑनलाईन पोर्टलवर सादर करावा, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कदम यांनी प्रारंभी सर्व समिती, कक्षांवर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीबाबत माहिती दिली.