जाहिरात …समाजाच्या विचारसरणीला आणि उपभोग प्रवृत्तींना दिशा देणारे शक्तिशाली माध्यम
आज 14 ऑक्टोबर, राष्ट्रीय जाहिरात दिवस …. त्यानिमित्त
जाहिरातींचे जग हे अत्यंत रंगतदार, सर्जनशील आणि प्रेरणादायी आहे. आपण विचार केला तर, जाहिरात ही फक्त उत्पादन किंवा सेवेची माहिती देण्याचे साधन नाही, तर ती समाजाच्या विचारसरणीला आणि उपभोग प्रवृत्तींना दिशा देणारे शक्तिशाली माध्यम आहे.
जाहिरातींचा इतिहास:
जाहिरातींचा इतिहास फार पुरातन आहे. पहिली जाहिरात म्हणजे प्राचीन काळात शिलालेख, ध्वनिक्षेपक किंवा हस्तलिखित पत्रके असू शकतात. मात्र, आधुनिक जाहिरातींचा उदय 19व्या शतकात औद्योगिक क्रांतीनंतर झाला. उद्योगांच्या वाढीसोबतच उत्पादनांची मागणी वाढली, आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नव्या संकल्पनांचा उदय झाला. 20व्या शतकात, रेडिओ, दूरदर्शन, आणि वर्तमानपत्रे यांसारख्या माध्यमांनी जाहिरातींची दुनिया पूर्णपणे बदलून टाकली. यातून जाहिरात कंपन्या उदयास आल्या, ज्यांनी मोठ्या प्रमाणात मार्केटिंग आणि ब्रँडिंगच युग निर्माण केल.

वर्तमान काळातील जाहिरात व्यवसाय:
आज जाहिरात क्षेत्र हे विविध माध्यमांमध्ये विभागलेले आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या विकासामुळे जाहिरातींचे स्वरूप वेगाने बदलत आहे. सोशल मीडियाचा उदय, मोबाइल ऍप्स, आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स हे जाहिरातीसाठी नवीन संधी निर्माण करत आहेत. पूर्वी आपल्याला टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रात जाहिराती दिसायच्या, पण आता प्रत्येकजण आपल्या मोबाईलवर, वेबसाइट्सवर, आणि सोशल मीडियावर जाहिराती पाहतो. ‘गूगल ऍडवर्ड्स’, ‘फेसबुक ऍड्स’, ‘इंस्टाग्राम प्रमोशन्स’ ही उदाहरणे आपण सर्व ओळखतो.
यामुळे जाहिरातदार आणि उपभोक्ता यांच्यातील संवाद अधिक तात्काळ आणि थेट झाला आहे. याचबरोबर, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि बिग डेटा यांच्या वापरामुळे वैयक्तिकृत जाहिरातींचा जमाना आला आहे. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जाहिरातदार उपभोक्त्यांच्या आवडी-निवडी ओळखून, त्यांना योग्य त्या वेळेस योग्य जाहिरात दाखवू शकतात.
भविष्यकाळातील जाहिरात व्यवसाय
भविष्यात जाहिरातींचे स्वरूप आणखी अत्याधुनिक होईल, यात शंका नाही. ‘वर्च्युअल रिअॅलिटी’ (VR) आणि ‘ऑगमेंटेड रिअॅलिटी’ (AR) सारख्या तंत्रज्ञानांचा वापर करून जाहिरातदार उपभोक्त्यांना अधिक प्रभावीपणे आकर्षित करू शकतात. तसेच, ‘मेटाव्हर्स’ सारख्या नव्या डिजिटल विश्वात जाहिरातींचा एक अनोखा मार्ग उघडेल.
तसेच, ‘सस्टेनेबल मार्केटिंग’ आणि ‘ग्रीन ऍडव्हर्टायझिंग’ या संकल्पनांचा अधिकाधिक वापर होईल. ग्राहकांना पर्यावरणपूरक उत्पादनांकडे आकर्षित करण्यासाठी या प्रकारच्या जाहिराती प्रभावी ठरतील. समाजातील विविधतेला मान्यता देणाऱ्या जाहिरातींचीही गरज वाढेल.
जाहिरात व्यवसाय हा केवळ उत्पादने आणि सेवा विकण्यासाठी नाही, तर तो समाजाला दिशा देणारे, कल्पकता आणि सर्जनशीलता यांना चालना देणारे माध्यम आहे. आपल्या विचारसरणी, जीवनशैली आणि आर्थिक व्यवस्थेत जाहिरातींचा मोठा वाटा आहे.
आजच्या या जाहिरात दिनानिमित्त, आपण जाहिरात व्यवसायात नव्या कल्पकतेने पुढे जाण्याचा संकल्प करूया. तंत्रज्ञान, सर्जनशीलता, आणि सामाजिक जाणीव यांच्या मिलाफातून जाहिरात क्षेत्र निश्चितच एक सुवर्णकाळ अनुभवेल.

दिलीप निकम
ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिक रिलेशन्स प्रोफेशनल, नाशिक
9922904068