● सांस्कृतिक कार्यक्रमातून अभियांत्रिकी शिक्षण हा जानाईचा स्तुत्य उपक्रम – जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज.
● प्रशांत दामले यांची जानाईला लाखाची देणगी.
लातूर :माध्यम वृत्तसेवा
गेल्या 22 वर्षापासून लातूर शहरामध्ये कार्यरत असलेल्या जानाई प्रतिष्ठानने ‘ वारसा संस्कृतीचा जाणीव कृतज्ञतेची ‘ हे ब्रीदवाक्य खरे ठरवत अभियांत्रिकी शाखेतील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी कंबर कसली आहे. अशाच एका सांस्कृतिक उपक्रमास लातूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला . सुप्रसिद्ध अभिनेते , नाट्य कलावंत प्रशांत दामले यांनी देखील प्रभावित होऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयाचा धनादेश देण्याचे जाहीर केले.
अभियांत्रिकी महाविद्यालयातील गरजू, हुशार, होतकरू विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्क संकलनास्तव प्रशांत दामले,वर्षा उसगांवकर यांची प्रमुख भुमिका असलेले ” सारखं कांहीतरी होतय ” या विनोदी नाटकाचे श्री.जानाई प्रतिष्ठान संस्थेने मार्केट यार्ड सभागृहात आयोजन केले होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमातून अभियांत्रिकी शिक्षण हा जानाईचा स्तुत्य उपक्रम आहे ,असे उदगार लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.यांनी नेहमी प्रमाणे जानाईच्या खचाखच भरलेल्या श्रोत्यांसमोर बोलताना काढले.
● पद्मभूषण डाॅ.अशोकराव कुकडे काका , जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.माजी महापौर विक्रात गोजमगुंडे, सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ डाॅ.विश्वास कुलकर्णी, विलास पाटील चाकूरकर, माधवराव पाटील टाकळीकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
● मध्यंतरात प्रशांत दामले यांनी जानाईच्या कार्याने प्रेरीत होऊन रू १ लाखाच्या देणगीचा धनादेश यंदाच्या सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा डाॅ.वैशाली टेकाळे यांच्याकडे सुपूर्त केला. सरकार जेथे कमी पडते तेथे जानाई सारख्या संस्था मदतीला पुढे येतात. अशा संस्था गावागावात झाल्या पाहिजेत असे उदगार वर्षा उसगांवकर यांनी काढले. यावेळी व्यासपीठावर विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष अवधुत जोशी, अवंतिका प्रयाग, सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा डाॅ.वैशाली टेकाळे, सचिव प्रा.दत्तात्र्येय मुंढे उपस्थित होते. इतिहासाचे अभ्यासक विवेक सौताडेकर यांनी कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन केले.प्रास्ताविक अवधुत जोशी यांनी केले . भिकाजी पाटील यांनी जानाईच्या उपक्रमाचा आपल्या मनोगतात आढावा घेतला. अवंतिका प्रयाग यांनी आभार मानले.
● मागील २२ वर्षात जानाईने २२ सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनातून १३५ जानाई शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी आपले अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले व ते अभियंते झाले. या कार्यक्रमातून ११ अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जानाई शिष्यवृती दिली जाणार आहे असे जानाईचे पालक अतुल ठोंबरे यांनी सांगीतले.