27.6 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*जातीयतेचं विष पेरणाऱ्यांपासून सावध रहा- शरद पोंक्षे*

*जातीयतेचं विष पेरणाऱ्यांपासून सावध रहा- शरद पोंक्षे*


  लातूर / प्रतिनिधी – मागील पंधरा-वीस वर्षात राज्यात जातीच्या भिंती बळकट करण्याचे काम कांही मंडळींकडून केले जात आहे,त्यापासून सावध रहा. संघटित होऊन जातीय विष पेरणाऱ्यांना जबाब द्या,असे प्रतिपादन प्रख्यात सिने अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले.   भारत विकास परिषदेच्या लातूर शाखेच्या वतीने आयोजित जाहीर व्याख्यानात शरद पोंक्षे बोलत होते.दयानंद सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ‘ साहित्यातून राष्ट्र जागरण-  बंकीमचंद्र ते सावरकर’ या विषयावर पोंक्षे यांनी विचार मांडले.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बांधकाम व्यावसायिक दिलीप माने तर मंचावर भारत विकास परिषदेच्या लातूर शाखेचे अध्यक्ष प्रा.सुधाकर जोशी,सचिव अमित कुलकर्णी, डॉ.अभिजीत मुगळीकर,अमोल बनाळे,सिद्धराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.   यावेळी मार्गदर्शन करताना शरद पोंक्षे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुत्ववादी होते पण त्यांनी जाती-जातींच्या भिंती तोडण्यासाठी प्रयत्न केले.

रत्नागिरी जिल्हा जातमुक्त करण्यात त्यांना यश आले होते.जात जन्माने नाही तर कर्माने निर्माण होते,असे ते म्हणत असत.मनुष्य ही जात,माणुसकी हा धर्म आणि पृथ्वी हे राष्ट्र असे सावरकर यांचे तत्व होते.परंतु आपण विशिष्ट चष्मा घालून सावरकर यांच्याकडे पाहतो. माणसाने माणसाशी माणुसकीने, प्रेमाने वागणारा प्रत्येक व्यक्ती हा हिंदू आहे,असे सावरकर सांगत असत.परंतु आता जातीयवाद वाढवला जात आहे.राष्ट्राची भावना,राष्ट्रीय विचार हेच त्याला उत्तर असेल,असेही पोंक्षे म्हणाले. 

  ऋषी बंकिमचंद्र यांनी लिहिलेले वंदे मातरम हे गीत स्वातंत्र्य चळवळीचा मंत्र होते परंतु नंतर या गीतातील तीन कडव्यांची हत्या करण्यात आली. मुस्लिम लांगुलचालनाचा हे गीत बळी ठरले.त्यामुळे राष्ट्रगीता ऐवजी राष्ट्रीय गीताचा दर्जा त्याला दिला गेला. मुस्लिम समुदाय सोबत येणार नाही म्हणून स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने हिंदू राष्ट्रवादा ऐवजी हिंदी राष्ट्रवाद स्वीकारला.तत्पूर्वी पाच मुस्लिम राजांनी देशावर आक्रमण केलेले होते.स्वातंत्र्यानंतरही पुन्हा एकदा मुस्लिम राजवट असावी अशी काही मंडळींची मागणी होती,असेही ते म्हणाले. 

  वंदे मातरम या गीतामध्ये पृथ्वीचे वर्णन करण्यात आलेले आहे.त्यात कुठल्याही देवाची महती सांगण्यात आलेली नाही. एक स्त्री आणि दुर्गेच्या रूपात पृथ्वीचे वर्णन बंकिमचंद्रांनी केलेले आहे.परंतु हे पटवून देण्यात आपण कमी पडलो. लांगुलचालनामुळेच देशाची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली.आपल्यातील काहींनी स्वाभिमान विकला त्यामुळे राष्ट्र दुबळे झाले.ठाम भूमिका घेतली नाही. हिंदूंना अहिंसेचे डोस पाजवण्यात आले,असेही त्यांनी सांगितले.    प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दिलीप माने यांनी भारत विकास परिषदेच्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार ऐकून रक्त सळसळते.अंदमानत गेलो असता सेल्युलर जेल पाहून सावरकर यांच्या प्रति आदरभावाने डोके टेकवल्याचेही ते म्हणाले.   प्रारंभी भारत विकास परिषदेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

डॉ.अभिजीत मुगळीकर यांनी प्रास्ताविक केले. भारत विकास परिषदेच्या लातूर शाखेच्या सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.’ऋषी ब्रोंकिमचंद्र’ या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रा. शशी देशमुख यांनी देशभक्तीपर गीताचे गायन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय अयाचित व डॉ.सौ.ऋजुता अयाचित यांनी केले.अमोल बनाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.   कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारत विकास परिषदेच्या व्याख्यान समितीमधील सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास शहरातील हजारो नागरिक,युवक-युवतींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]