लातूर:-( वृत्तसेवा )- विकासविषयक अभ्यास व संशोधनात अग्रेसर असलेल्या इंग्लंडमधील ‘इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज’ ह्या संस्थेने ‘ जागतिक अनिश्चिततेच्या काळात सामाजिक सुरक्षिततेची पुनर्कल्पना’ ह्या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. सप्टेंबरमध्ये होत असलेल्या ह्या परिषदेने, लातूर येथील विकासात्मक अर्थशास्त्राच्या अभ्यासक इरा देऊळगावकर यांना निबंध सादरीकरणासाठी आमंत्रित केले आहे.

इरा देऊळगावकर ह्या लंडन येथील ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंट अॅण्ड डेव्हलपमेंट’ ह्या संस्थेत ‘हवामान बदल व कमकुवत घटक’ ह्या विषयांवर क्षेत्र अभ्यास व संशोधन करत आहेत. त्यांनी मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या भेटी घेऊन अनेक एकल महिलांच्या परिस्थितीचा अभ्यास केला आहे. त्यांनी नैसर्गिक आपत्तींमुळे सामाजिक व आर्थिक विषमतेमध्ये वाढ होत जाते’ हे साधार दाखवून दिले आहे. तसेच, पर्यावरणीय विषमता आणि आर्थिक, सामाजिक, लिंगाधारित व ज्ञानाधारित विषमता ह्या ‘बहुआयामी विषमतां’ हातात हात घालूनच वाटचाल करत असतात. अशा विषमताग्रस्ताना मुख्य प्रवाहापासून दूर लोटले जाते (मार्जिनलायझेशन ) . कित्येक वेळा त्यांना सर्व बाजूंनी वंचितता व बहिष्कृतता (एक्सक्लूझन)सहन करावी लागते.’ याची अनेक उदाहरणे सादर केली आहेत.
लातूरचे माजी जिल्हाधिकारी श्री. बी.पी.पृथ्वीराज यांच्या विनंतीवरून देऊळगावकर यांनी लातूर जिल्ह्यात आत्महत्या करणायाच्या टोकावर असणाऱ्या शेतकरी कुटुंबाना जोखता येण्यास निदानपद्धती (अल्गोरिदम) तयार केली होती.