दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
• दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केला नेत्रदीपक कलाविष्कार
• जिल्ह्यातील ४६ शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग
• भक्तीगीत, देशभक्तीपर गीत, लोकगीतांचे दिमाखदार सादरीकारण
लातूर, दि. ०३ : दिव्यांग बांधवांच्या कल्याणसाठी शासन, प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील दिव्यांग जणांच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत विविध उपक्रम राबविले असून यापुढेही अशा उपक्रमांसाठी जिल्हा प्रशासन सदैव पुढाकार घेईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि जिल्ह्यातील विशेष शाळा, कार्यशाळा व मतिमंद बालगृह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य सुरेश पाटील, महिला व बाल विकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, समाज कल्याण अधिकारी विलास केंद्रे, संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, कार्यवाह डॉ. योगेश निटूरकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
दिव्यांग मुलांवर विविध उपचार करून त्यांच्यातील दिव्यांगत्व कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या उमंग ऑटिझम अँड मल्टीडीसिबिलिटी रिसर्च सेंटरला राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कॉच अवॉर्ड’ नुकताच प्रदान करण्यात आला. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. इतर पुरस्कारांच्या तुलनेत या क्षेत्रातील कामाबद्दल मिळालेला पुरस्कार सर्वाधिक अभिमानास्पद असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या. संवेदना प्रकल्पाच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी करण्यात येत असलेल्या कामाचे त्यांनी यावेळी कौतुक केले.
प्रारंभी जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. नाईकवाडी यांनी प्रास्ताविकात दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. तसेच ८ हजार दिव्यांग बांधवांना १० लाख रुपयांचे साहित्य वितरीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यंकट लामजने यांनी केले, राजू गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालय व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील अधिकारी, कर्मचारी आणि जिल्ह्यातील विशेष शाळा, कार्यशाळा व मतिमंद बालगृहातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह बाळासाहेब वाकडे, बंकट पवार, सिंधू इंगळे, विजय बुरांडे यांनी परिश्रम घेतले.
दिव्यांग क्षेत्रातील कामगिरीबद्दल पुरस्कार वितरण
दिव्यांग क्षेत्रात कार्य करणारे उत्कृष्ट दिव्यांग व्यक्ती, अधिकारी व संस्था यांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आला. दीपक ओकारअप्पा क्षीरसागर यांना उत्कृष्ट दिव्यांग व्यक्ती, स्वआधार बेवारस मतिमंद मुलींची निवासी प्रकल्प यांना उत्कृष्ट संस्था, श्रीमती मनीषा बोरूळकर यांना प्रशासनातील उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व डॉ. पद्मावती रमेश बियाणी यांना दिव्यांग मुलांचे उत्कृष्ट पालक पुरस्काराने गौरविण्यात आले.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धेत जिल्ह्यातील ४६ शाळांमधील २९७ विद्यार्थी सहभागी झाले होते. यापैकी ३० शाळेतील विद्यार्थ्यांनी समूह नृत्य, ६ शाळेतील विद्यार्थ्यांनी समूह गाण आणि ८ शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नेत्रदीपक नृत्याविष्कार सादर केला. ‘जय हो…’, ‘सौगंद मुझे इस मिट्टी कि…’, ‘ऐ देस मेरे…’, ‘जलवा तेरा…’ यासारख्या गीतांसह ‘माऊली, माऊली…’, ‘गाडी घुंगराची…’, ‘पांडुरंग, पांडुरंग…’ आदी गीतांवर दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. संगीताच्या तालावर आणि गीताच्या बोलावर अचूकपणे ठेका धरून आपली नृत्यकला आत्मविश्वासाने सादर करणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी सुवर्णा बुरांडे, मयूर राजापुरे यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.