चांगली जीवनशैली कर्करोगास दूर ठेवते
डॉ. बी.एस. नागोबा : एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक कर्करोग दिन साजरा
लातूर –
अतिरिक्त प्रमाणात धुम्रपान, मद्यपान आणि तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन हे आरोग्यासाठी घातक असून व्यसनाधीन झाल्याने मनुष्य तानतणावात अडकून कर्करोगासारख्या दुर्धर आजारास बळी पडतो. त्यामुळे नियमित व्यायाम, पोषक आहार, नियंत्रीत वजण, नियमित वैद्यकीय तपासणी अशी चांगली जीवनशैली अंगीकारल्यास निरोगी राहण्यास मदत होऊन कर्करोगास दूर ठेवता येते, असे मत एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा यांनी व्यक्त केले.
एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील मेडिसिन, स्त्रीरोग विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक कर्करोग दिनाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. बी. एस. नागोबा बोलत होते. यावेळी मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. गजानन गोंधळी, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. सी. एस. पाटील, बालरोग विभाग प्रमुख डॉ. विद्या कांदे, एमआयएनएस नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य सरवनन सेना, रुग्णालय प्रशासकीय अधिकारी श्रीपती मुंडे, डॉ. मनोज भडके, डॉ. सचिन बाभळसुरे, डॉ. विशाल भालेराव, डॉ. अनंद दासरे, डॉ. हेमंत केंद्रे उपस्थित होते.
सध्याची जीवनशैली बिघडल्याने मनुष्य तानतणावाखाली वावरत आहे. व्यसनाप्रमाणेच तानतणाव ही कर्करोग होण्यास कारणभूत ठरत आहे. त्यामुळे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून स्वच्छंदपणे जीवन जगले पाहिजे, असे सांगून पुढे बोलताना डॉ. बी. एस. नागोबा म्हणाले की, शरीरातील जनुकांमध्ये बिघाड होते तेंव्हा पेशींचे विभाजन नियंत्रणाबाहेर घडून येते आणि कर्करोग उद्भवतो मात्र कर्करोगाचे वेळेत निदान झाल्यास योग्य उपचार घेवून कर्करोग पुर्णपणे बरा होऊ शकतो. त्यासाठी प्रत्येकाने नियमितपणे आपली आरोग्य तपासणी करावी, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना डॉ. गजानन गोंधळी म्हणाले की, देशात कर्करोगामुळे सर्वाधिक मृत्यू होत आहेत. रासायनिक घटकांचा समावेश असलेली फळे, भाज्या, अन्नधान्य, प्रदूषण, सौंदर्य प्रसाधनांचा अतिरिक्त वापर कर्करोग होण्यास कारणीभूत ठरत आहे. शरीरातिल कोणत्याही अवयवास कर्करोगाची लागन होऊ शकते. शरीरास गाठ, वजन कमी, रक्तस्त्राव, थकवा अशी वरवर दिसणारी लक्षणे सुध्दा कर्करोगाची असू शकतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसून आल्यास तज्ज्ञांकडून तपासणी करुन घ्यावी. रक्ताचा कर्करोग, ल्युकेमिया, मल्टीपल मायलोमा अशा दुर्धर कर्करोगाचा औषधोपचाराने विलाज करता येतो. मात्र कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास तो योग्य उपचार देवून पुर्णपणे बरा करता येतो व पुढील होणारी हाणी टाळता येते. त्यामुळे तरुणपणापासून कर्करोगाबद्दल जागृक राहून गरज भासल्यास कर्करोग तपासणी करुन घ्यावी असे डॉ. गोंधळी यांनी शेवटी सांगीतले.
यावेळी डॉ. सी. एस. पाटील, डॉ. विद्या कांदे, डॉ. हेमंत केंद्रे, लिपीक मिरा कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी निवाशी डॉक्टरांनी कर्करोगाविषयी माहिती असलेले पोस्टर प्रदर्शीत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अमर लिंबापूरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. विपुल राका यांनी तर आभार डॉ. गौरव कदम यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निवाशी डॉ. शेखर सोळंके, डॉ. हितेश मोरे, डॉ. व्यंकटेश याटकरला, डॉ. शुभम चौधरी, डॉ. सानिका नारकर, डॉ. जयश्री दहिफळे, डॉ. लक्ष्मी बाली, डॉ. श्रुती जायभाये, डॉ. प्रथमेश झेंडे, डॉ. रोहित माळी, डॉ. रोहित माले प्रा. कांती जाधव, प्रा. पायल राठोड, प्रा. नितिन होळंबे, लिपीक मिरा कुलकर्णी, सेवक अवदूंबर कुपकर, दादाभाई पठाण यांनी परिश्रम घेतले.