निलंगा,-( प्रशांत साळुंके)-
आजवर कर्जतच्या अनेक चित्रकारांची प्रदर्शन मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत भरली आहेत. परंतु “अज्ञात” हे अश्विनी बोरसे यांच्या चित्रांचे प्रदर्शन काही विशेष कारणांमुळे एक वेगळा ठसा उमटवत आहे. चित्रकला हा साधारणतः पुरुष प्रधान व्यवसाय समजला जातो. आजही सामान्य माणसाला प्रसिद्ध भारतीय चित्रकारांची नावे विचारल्यास कुठल्याही स्त्रीचे नाव क्वचितच आठवेल. परंतु चित्रकार अश्विनी बोरसे यांनी या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जहांगीर कला दालनापर्यंत मजल मारली आहे.

एखाद्या स्त्रीने स्वतःच्या चित्रांचे प्रदर्शन भरवणे ही जेवढी कठीण गोष्ट समजली जाते तेवढीच कठीण अमूर्त चित्रांचे प्रदर्शन भरवणे ही बाब देखील आहे. वास्तववादी शैलीमध्ये, म्हणजेच जनसामान्यांना समजणाऱ्या चित्रांची प्रदर्शने भरवणे, त्यामानाने अतिशय सोपे समजले जाते. परंतु अमूर्त-चित्र ही जनसामान्यांना समजण्या पलिकडची असतात आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अश्विनीने अमूर्त चित्रांच्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.

तिच्या या शैलीची दखल अनेक नावाजलेल्या चित्रकारांनी घेतली आहे .अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘ द बॉम्बे आर्ट सोसायटी’ या संस्थेनेही सलग तीन वर्ष त्यांच्या वार्षिक प्रदर्शनासाठी अश्विनीच्या चित्रांची निवड केली होती. तसेच कोहिनूर काँटिनेंटल गॅलरी,ओबेराय ट्रायडंट गॅलरी, द लीला आर्ट गॅलरी या प्रसिद्ध कला दालनांमध्ये सुद्धा अश्विनीच्या चित्रांची प्रदर्शनं भरली आहेत.

अश्विनी बोरसे यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे 7 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 2022 या कालावधीत कलारसिकांना पाहता येईल. या प्रदर्शनासाठी ॲक्रीलिक रंगांमध्ये कॅनव्हासवर साकारलेली बावीस चित्रे मांडण्यात येणार आहेत. ही सर्व चित्रे अश्विनी बोरसे यांच्या अज्ञात या संकल्पनेवर आधारित आहेत.कोणत्याही रंग आणि आकरांना ज्ञात करून पाहण्यापेक्षा अज्ञात स्वरूपाने पाहता येण्याची क्षमता हीच खऱ्या अर्थाने मनुष्याला सौंदर्य आणि कुतूहलाची खरी अनुभूती करून देऊ शकते असा यामागचा अश्विनी बोरसे यांचा विचार आहे.