हक्काच्या पाण्यासाठी संभाजीरावांच्या पाठीशी
लातूर ग्रामीण ताकतीने उभा राहील- आ. कराड
लातूर दि.२८ – दुष्काळी जिल्हा म्हणून लातूरची ओळख देशात झाली असून हा कलंक पुसण्यासाठी हक्काचे पाणी शेतीला आणि उद्योगाला मिळाले पाहिजे त्याशिवाय गावाचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा विकास होणार नाही. जलसाक्षरता रॅलीचे प्रणेते संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सुरू केलेल्या पाणी प्रश्नाच्या लढ्यासाठी त्यांच्या पाठीशी लातूर ग्रामीण मतदारसंघ ताकतीने उभा राहील अशी ग्वाही भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी लातूर तालुक्यातील ठिकठिकाणच्या जलसाक्षरता कार्यक्रमात बोलताना दिली.
लातूरला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सुरू केलेली जिल्हास्तरीय बाईक जलसाक्षरता रॅलीचा सोमवारी लातूर तालुक्यातील चिंचोलीराव, अंकोली पाटी, सावरगाव पाटी, टाकळी, ढाकणी, निवळी,गुंफावाडी, मुरुड, बोरगाव काळे, खंडाळा पाटी, हिसोरीपाटी, शिराळा, चिंचोली (ब), ढोकी, काटगाव, भोईसमुद्रगा या सर्व विविध गावचा दौरा झाला. प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहात फटाक्याची आतिषबाजी करून विविध वाजंत्रीच्या गजरात फुलांची उधळण करत रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले.

मुरुडसह निवळी, चिंचोली बल्लाळनाथ, काटगाव, भुईसमुद्रगा आदी ठिकाणी जाहीर कार्यक्रमातून जनतेशी संवाद करण्यात आला त्यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड बोलत होते. यावेळी भाजपाचे दिलीपराव देशमुख, संजय दोरवे, विक्रमकाका शिंदे, भागवत सोट, हनुमंत बापू नागटिळक, बन्सी भिसे, वैभव सापसोड, विजय काळे, सुरज शिंदे, साहेबराव मुळे, गोपाळ पाटील, गोविंद नरहरे, सुधाकर गवळी, चंद्रसेन लोंढे, अनंत कणसे, धनराज शिंदे, विश्वास कावळे, काशिनाथ ढगे, बालाजी दुटाळ, शंकर चव्हाण, हनुमंत शिंदे, अरविंद पारवे, सचिन सवई यांच्यासह त्या गावातील प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वैभव संपन्न घराण्यातील संभाजीराव पाटील स्वतःसाठी अथवा स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर जनतेच्या हितासाठी हक्काच्या पाणीसाठी रस्त्यावर उतरले, गावोगाव त्यांचे जल्लोषात स्वागत होत आहे. सर्व स्तरातील जनता आशीर्वाद देत आहे असे सांगून यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, भौतिक विकासाबरोबरच शेतीला आणि उद्योगाला पाणी मिळाले पाहिजे तरच आपला तालुका आणि जिल्हा समृद्ध होईल. वैभव मिळेल तेव्हा पाणी प्रश्नासाठी पक्ष भेद बाजूला ठेवून सर्वांनी या लढ्याला समर्थन दिले पाहिजे असे बोलून दाखविले. समुद्रात वाहून जाणारे पाणी आपल्याला मिळाली पाहिजे यासाठी हा संघर्ष आहे गरज पडली तर मुंबईपर्यंत धडक मारू हक्काचे पाणी मिळवण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करू असेही आ. कराड यांनी बोलून दाखविले.

यावेळी बोलताना आ. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, सरकारने समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हे पाणी गोदावरी पात्रात आले तर त्याचा लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यांना फायदा होणार नाही. मांजरा व तेरणा खोऱ्यात हे पाणी येणे आवश्यक आहे. यासाठी आपण जनरेटा उभारला पाहिजे, आपल्या हक्काचे पाणी पदरात पाडून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पाण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे.

लातूर तालुक्यात ठीक ठिकाणी झालेल्या जलसाक्षरता सभेस शेकडो दुचाकीस्वारांसह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ठिकठिकाणच्या गणेश मंडळ, ग्रामपंचायत, सोसायटी, विविध संघटना, व्यापारी, युवक मंडळ, मित्र मंडळ, शेतकरी, शेतमजूर यांच्यासह नागरिकांनी पाठिंबा पत्र आ. निलंगेकर यांच्याकडे सुपूर्द केली.