28.1 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*जलसाक्षरता अभियानाचा लातूरात समारोप*

*जलसाक्षरता अभियानाचा लातूरात समारोप*

लातूरच्या पाण्यासाठी राजकारण विरहित एकत्रित प्रयत्न करू

  • आ.संभाजीराव पाटील निलंगेकर

लातूर/प्रतिनिधी:-लातूरचा दुष्काळ आणि पाणीटंचाई ही भौगोलिक स्थितीमुळे उद्भवलेली आहे.लातूरकरांसाठी पाणी हा जीवनमरणाचा प्रश्न आहे.ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असून त्यात सर्वपक्षीयांनी मतभेद विसरून सहभागी होणे गरजेचे आहे.इतर कोणी नेतृत्व करणार असेल तर आपण त्यांच्या मागे उभे राहण्यास तयार आहोत.पाणी प्रश्नासाठी एकत्रित यावे लागेल,असे आवाहन आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.गणेश चतुर्थीच्या दिवशी निलंगा येथून सुरू झालेल्या जलसाक्षरता अभियानाचा मंगळवारी (दि.२६)रात्री लातूरच्या हनुमान चौकात समारोप झाला.

याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ.निलंगेकर बोलत होते.व्यासपीठावर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष ॲड.बळवंत जाधव,भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर,जिपचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे,भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख,शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे,औशाचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख,किरण उटगे,भाजपा प्रदेश प्रवक्त्या प्रेरणा होनराव,शैलेश गोजमगुंडे, शिवानंद हेंगणे,अजित पाटील कव्हेकर,ॲड. गणेश गोमसाळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.


यावेळी बोलताना आ.निलंगेकर म्हणाले की, पाण्याअभावी मराठवाडा आणि खास करून लातूरचा विकास खुंटलेला आहे.पाणी नसल्यामुळे या भागात उद्योग येत नाहीत. आता सरकारने समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय घेतला आहे परंतु हे पाणी गोदावरी पात्रात आले तर त्याचा लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यांना फायदा होणार नाही.त्यामुळे मांजरा व तेरणा खोऱ्यात हे पाणी येणे आवश्यक आहे. यासाठी आपण जनरेटा उभारला पाहिजे,असे ते म्हणाले.


यापूर्वीही मराठवाड्याला राजकीय नेतृत्व मिळाले होते परंतु खुर्ची टिकविण्यासाठी त्यांना इतरांसमोर झुकावे लागले. पण आम्ही झुकणारे नाही. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पदरात पाडून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,असे निलंगेकर म्हणाले.
पश्चिम महाराष्ट्रातील नेते विकासासाठी मतभेद विसरून एकत्रित येतात. आपणही पाण्यासाठी एकत्रित येण्याची गरज आहे.इतर कोणी यासाठी पुढे येत असेल तर मी त्यांच्या मागे उभे राहण्यास तयार आहे.परंतु पाणी प्रश्नावर सोबत येणार नसाल तर तुम्हालाही बाजूला करून हा प्रश्न सोडवून घेऊ,असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना लातूरच्या पाणी प्रश्नाबाबत त्यांच्याशी चर्चा झाली होती.परंतु काही नतदृष्ट अधिकाऱ्यांनी ही योजना फायद्याची नसल्याचा शेरा फाईलवर मारला.परंतु पाणी हा नफा-तोट्याचा विषय नाही.कितीही पैसे लागले तरी लातूरसाठी पाणी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिले आहे. याबाबतचा संपूर्ण तांत्रिक अभ्यास आपण केलेला असून ही योजना नेतृत्वाला पटवून देऊ,असे देखील ते म्हणाले.


आ.निलंगेकर यांनी सांगितले की,लातूर ही गुणवंतांची खाण आहे. राज्य व देशातील विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येतात. त्यामुळे आयआयटी व एम्ससह केंद्रीय विद्यापीठ लातूर येथे होणे आवश्यक आहे.या संदर्भातही आपण प्रयत्न करत असून लातूरला केंद्रीय विद्यापीठ मिळवून घेऊच,असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना ॲंड.बळवंत जाधव यांनी पाणी प्रश्नावर आपण कायमच आ.संभाजीराव पाटील यांच्यासोबत असल्याचे सांगितले.शिंदे-फडणवीस यांचे सरकार लातूरचा पाणी प्रश्न सोडविण्या बाबत सकारात्मक पावले उचलेल,असे ते म्हणाले. भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी आ. संभाजीराव पाटील यांच्या नेतृत्वात सर्वांनी या प्रश्नावर एकत्रित येण्याचे आवाहन करतानाच गरज पडल्यास आंदोलने उभारण्यास तयार असल्याचे सांगितले. देविदास काळे म्हणाले की,आ.संभाजीराव पाटील यांच्या नेतृत्वातच लातूरचा पाणी प्रश्न कायमचा सुटू शकतो.त्यासाठी आपण त्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे.अफसर शेख यांनी पाणी हा राजकारणाचा नव्हे तर जीवनमरणाचा प्रश्न असल्याचे सांगितले.आ.संभाजी पाटील हे वेगळ्या पक्षातील असले तरी या प्रश्नाकडे राजकारण विरहित दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
शिवानंद हेंगणे यांनी या सभेचे प्रास्ताविक केले.

सूत्रसंचलन चंद्रकांत कातळे तर आभार प्रदर्शन जिपचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले.या सभेस अभियानात सहभागी झालेल्या शेकडो दुचाकीस्वारांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


नो हाँकिंग रॅली…

गणेशोत्सवाच्या काळात ८ दिवस जिल्ह्यात ही दुचाकी रॅली काढली गेली. रॅलीत सहभागी झालेल्या दुचाकीस्वारांनी कधीही हॉर्न वाजविला नाही. यामुळे शेकडो दुचाकी असूनही गोंगाट व हॉर्नचा कर्णकर्कश आवाज ऐकू आला नाही.रॅली दरम्यान कोठेही अपघात झाला नाही.दुचाकी चालकांनी शिस्तीत वाहने चालवल्याने हे शक्य झाले.


१२८७ किमीचा प्रवास…
आठ दिवसांमध्ये दुचाकी रॅलीने जिल्ह्यात १२८७ किलोमीटर प्रवास केला. निलंगा,शिरूर अनंतपाळ, देवणी,उदगीर,जळकोट, चाकूर,अहमदपूर,रेणापूर, औसा,लातूर तालुका व लातूर शहरातून दुचाकी स्वारांनी प्रवास केला. यादरम्यान ३५४ गावे,४८२ ग्रामपंचायती व १०२५ गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी आ. निलंगेकर यांनी संवाद साधला.यादरम्यान १५४ संवाद सभा विविध ठिकाणी घेण्यात आल्या.


उत्स्फूर्त पाठिंबा…
आ.निलंगेकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या दुचाकी रॅलीस विविध गावातील गणेश भक्त,युवक मंडळे, महिला मंडळ,बचत गट, यासह शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,अखिल भारतीय छावा संघटना,शेतकरी संघटना,प्रहार संघटना, रिपाई आठवले गट,रासप, रयत क्रांती संघटना, विविध शेतकरी गट,वाहन चालक संघटना, ठिकठिकाणचे व्यापारी, शेतकरी,शेतमजूर यांच्यासह नागरिकांनी पाठिंबा दिला.यादरम्यान जवळपास साडेअकराशे पाठिंबा पत्रे या संस्था व संघटनांनी आ.निलंगेकर यांच्याकडे सुपूर्द केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]