24 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeआंतरराष्ट्रीय*जयसिंगपूरचीकन्या अमेरिकेत चमकली*

*जयसिंगपूरचीकन्या अमेरिकेत चमकली*

जयसिंगपुरची उर्मिला अर्जुनवाडकर झाली
अमेरिकेतील होपटाऊनची नगरसेविका

जयसिंगपूर (प्रतिनिधी) – अमेरिकेतील न्यूजर्सी भागात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदीय निवडणूकीत होपवेल टाउनशिपमध्ये नगरसेविका (कॉउंसिलर) म्हणून जयसिंगपूरची कन्या उर्मिला जनार्दन अर्जुनवाडकर(सौ. उर्मिला अशोक पुरंदरे) निवडून आल्या आहेत.त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार एडवर्ड एम. जॅकोवस्की यांचा एक हजाराच्या मताधिक्यानी पराभव केला आहे. होपवेल टाऊनशिपच्या तीनशे वर्षाच्या इतिहासात भारतीय वंशाची पहिलीच नगरसेविका होण्याचा मानही उर्मिला यांनी पटकावला आहे.

उर्मिला जनार्दन अर्जुनवाडकर ह्या येथील चौथ्या गल्लीतील विजया व जनार्दन दामोदर अर्जुनवाडकर यांच्या कन्या आहेत. त्यांचे शिक्षण जयसिंगपूरमध्ये ‘बी’ वॉर्ड शाळा, जयसिंगपूर हायस्कूल व जयसिंगपूर कॉलेज येथे झाले. त्यांनी सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून पदवीउत्तर शिक्षण पूर्ण केले. सध्या त्यांचे वास्तव्य अमेरिकेतील न्युजर्सी राज्यांतील होपवेल येथे असून त्या सुप्रसिद्ध औषध निर्मिती कंपनीत गेली २५ वर्षं शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे संशोधन कार्य प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक मासिके आणि परिषदांमध्ये प्रसिध्द झाले आहे व त्याला आंतरराष्टीय विज्ञान जगतात मान्यता मिळाली आहे.

न्यूजर्सी येथे त्यांनी महाराष्ट्रीयन व भारतीय संस्कृती, परंपरा व मराठी भाषा जतन व संवर्धनासाठी मराठी शाळा व संस्कार वर्गांची सुरुवात केली. तसेच त्यांच्याकडे गणपती उत्सव ही गेली २५ वर्षं मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गर्ल स्काउट्स-लीडर, पालक शिक्षक संघटना पदाधिकारी, होपवेल व्हॅली फूड पॅंट्री आणि ए टू झेड मार्गदर्शन उपक्रम या स्थानिक संस्थानच्या कार्यांत त्यांचा सहभाग असतो. या व अश्या बऱ्याच सामाजिक कार्यांत त्यांचा पुढाकार व सक्रीय सहभाग असतो. त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांची झोनिंग व ऍडजस्टमेंट बोर्डवर सहकारी / सहायक सदस्य म्हणून नेमणूक केली गेली. सहा वर्षांपासून टाउनशिपच्या समस्या आणि प्रशासनाचे काम त्या पाहत आहेत. त्यामुळे त्यांना टाउनशिपच्या समस्या आणि प्रशासनाचे विस्तृत ज्ञान व सखोल जाण निर्माण झाली आहे. त्यातूनच त्यांना या निवडणुकीत उभे राहण्याची संधी मिळाली आणि त्यांनी या निवडणूकीत दैदिप्यमान यश मिळवून जयसिंगपुरचा आणि भारताचा झेंडा फडकवला. त्यांना या निवडणूकीत ३७०१ मते मिळाली. त्यांच्या कामगिरीचे अमेरिकेत विविध स्तरावर कौतुक होत आहे. त्यांचा शपथ विधी कार्यक्रम जानेवारीमध्ये होणार आहे.

जयसिंपूरमध्ये असताना देखील विविध क्रीडा व सामाजिक कार्यात त्यांचा हिरीरीने सहभाग असे. त्यांनी जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर चे विद्यार्थिनी प्रमुख पद ही भूषविले आहे. विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय स्पर्धेत त्यांची शिवाजी विद्यापीठाच्या टेबल टेनिस संघात निवड झाली होती व सांघिक सुवर्ण पदकही जिंकले होते.

या त्यांच्या यशामध्ये त्यांचे पती अशोक पुरंदरे, मुलगा रोहित व मुलगी राधिका यांचा मोठा वाटा आहे. या विजयाते श्रेय जयसिंगपूर नगरीत झालेल्या जडणघडणीस आणि कुटूंबियांच्या, स्थानिक सहकाऱ्यांच्या व मतदारांच्या भक्कम पाठींब्याला आहे असे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]