आमदार धिरज देशमुख यांची सरकारकडे मागणी;
‘लम्पी स्कीन’ रोगाची दिवसेंदिवस वाढ, अधिवेशनात उपस्थित करणार प्रश्न
लातूर : लम्पी चर्मरोगामुळे पशुधन दगावल्यानंतर राज्य सरकारकडून मिळणारी मदतीची रक्कम तुटपुंजी आहे. सरकारने ही रक्कम तात्काळ वाढवून जनावरांच्या बाजारभावाइतकी रक्कम शेतकरी, पशुपालकांना द्यावी, अशी मागणी आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी राज्य सरकारकडे सोमवारी केली. मदतीची रक्कम वाढवून मिळाली तर नवीन पशुधन घेणे घेणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.
राज्यात लम्पी चर्मरोगाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या अडीच महिन्यात सुमारे २५ हजार तर गेल्या १५ दिवसांत ७ हजार जनावरे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार श्री. धिरज देशमुख यांनी राज्य सरकारकडे ही मागणी केली. याबाबत हिवाळी अधिवेशनातही ते प्रश्न उपस्थित करणार आहेत.
आमदार श्री. धिरज देशमुख म्हणाले, लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पशुधन दगावण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेत सापडला आहे. ज्या कुटुंबाचे पोट दूध व्यवसायावर आहे, त्यांच्यावरही मोठे आर्थिक संकट कोसळत आहे. त्यामुळे सरकारने भरीव मदत करणे आवश्यक आहे.
नवीन पशुधन खरेदी कसे करायचे ?
सध्या एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे राज्य सरकार मदत देत आहे. पण ती अत्यंत कमी आहे. शिवाय ती वेळेतही शेतकऱ्यांना मिळत नाही. मिळणारी ही मदत अत्यल्प असल्याने या रकमेतून नवीन पशुधन खरेदी कसे करायचे, असे प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. याची दखल सरकारने घ्यावी व अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असेही ते म्हणाले.
: सरकारने ठोस पावले उचलावीत
लम्पी चर्मरोगाचा प्रकोप आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी ठोस पावले उचलावीत. पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत. मोहीम राबवून शंभर टक्के लसिकरणावर भर द्यावा. तसेच, शेतकरी, पशुपालकांनीही आपल्या पशुधनाच्या लसीकरणासाठी पुढे यावे. जनावरांची व गोठ्यांची नियमित स्वच्छता ठेवावी. योग्य उपचार आणि योग्य काळजी घेतली तर जनावरे बरी होऊ शकतात, असे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले.—