यशोगाथा
जग बदलवतांना स्वतः बदलायला हवे, इतरांना नैतिकतेचे पाठ शिकवताना, कौटुंबिक मूल्य सांगताना ते आपण पहिले पाळायला हवेत तरच.. तुमच्या बोलण्याला नैतिकतेच बळ मिळतं… तुमच्याकडे समाज बदलाचे प्रतिक म्हणून बघतो … असा बदल स्वतः मध्ये घडवून समाजापुढे रोल मॉडेल म्हणून उभं राहिलेल्या तरुणाला मागच्या आठवड्यात जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांच्या सांगण्यावरून… अहमदपूर तालुका कृषी अधिकारी भगवान तवर, शिरूरचे कृषी सहायक माधव सुरवसे यांना सोबत घेऊन भेटलो त्याची ही प्रेरणादायी कहाणी …!!
तरुण शेतकऱ्याचे नाव संतोष सारोळे, शिक्षण बी. ई ,एम. बी. ए… पुण्यात एका मोठ्या शिक्षण संस्थेत प्राध्यापक असलेला तरुण… विचार करून, पुढचे सगळे नियोजन आखून… नोकरी सोडून…शिरूर ताजबंद ( ता. अहमदपूर जि.लातूर ) या आपल्या गावी शेती करायची हे ध्येय घेऊन येतो.. पुढचे काही वर्षे प्रचंड संघर्ष, शेतात राबताना सगळ्या डोक्यातल्या डिगऱ्या काढून टाकून खपतो… त्याला नियोजनाची जोड देतो..
शासनाच्या विविध योजना अभ्यासतो.. आणि मायक्रो प्लॅनिंग करून कुठली योजना कुठे फीट बसते याचा अभ्यास करतो… सुरुवातीला धक्के बसतात, त्या धक्याचा लोढ न घेता आपले आयुध खाली न टाकता लढत राहतो… 60 टक्के सबसिडी घेऊन पॉली हाऊस टाकतो.. टाकताना यात काय घ्यायला हवं.. याचे लॉजिस्टिक कसं असेल याचा पुरेपूर अभ्यास करतो.. आणि जरबेरा लावतो.. मार्केट चा अभ्यास करतांना पुण्यात गौरी गणपतीच्या काळात, हैद्राबादला फेब्रुवारी, मार्च,एप्रिल मध्ये कारण या दिवसात उर्वरित महाराष्ट्रात ऑफ सिझन असला तरी हैद्राबाद मध्ये धुमाधाम कार्यक्रम होतात… मग इतर वेळेस नांदेड वगैरे लोकल मार्केट मध्ये किरकोळ विक्री होते.. लॉजिस्टिकवर खर्च न करता व्यवस्थित पैकिंग करून ट्रॅव्हल्सनी अत्यंत कमी खर्चात बॉक्स पाठवून देतो… हैद्राबादला शिरूर वरून ट्रॅव्हल्स जात नाहीत मग उदगीर पर्यंत माल पोहचती करून तिथून ट्रॅव्हल्सनी पाठवणे… हे लॉजिस्टिक गणित एकदम पक्के बसले.. आणि जरबेरा लागवड फलद्रूप झाली आणि फक्त दोन सिझन मध्ये बँकेच्या कर्जातून मुक्त झाला…
पुढे कोविड आला त्या काळात फटका बसला पण हप्ते वगैरेतून बाहेर आल्यामुळे फ़ार त्रास झाला नाही… कुठे कुठे पैसे वाचवले, तर भरमसाठ लाईट बिल वाचविण्यासाठी मेडाच्या सबसिडीवर पाच एच.पी. मोटार चालेल एवढ्या क्षमतेच सोलार घेतलं.. आणि खिश्यावरला भार एकदम कमी झाला.. पावसाळ्यात सगळीकडले पाणी… अगदी पॉली हाऊसवर पडणारे पाणी सुद्धा पणाळयावाटे एकत्र करून एका अख्या बोर मध्ये सोडायाचं नियोजन केलं.. त्यामुळे जग पाण्यासाठी वणवण करतांना याच्या बोरला उन्हाळ्यातही पाणी होतं.. त्या पाण्याचे योग्य नियोजन करून सगळं पॉली हाऊस हिरवं राहिलं.. शिक्षण माणसाला शहाणपण देत… नियोजनाचे बहाण देत हे संतोष सारोळे सांगतात.. नोकरीं सोडताना मोठी जोखीम अंगावर घेऊन शेतात उतरलो होतो… आता मात्र मागे फिरून पाहत नाही… आता दुसऱ्या शेतात जेरीनियम लावले आहे.. इतरांचे उदाहरण फेलचे आहेत पण मी नियोजनाने यात पण शंभर टक्के यश मिळवेन…!!
शासनाच्या योजनेचे कोणते फायदे घेतले
सामूहिक शेततळे
-3 लाख 39 हजार रुपये शासनाचे अनुदान.
-दुष्काळी परिस्थितीमध्ये शेततळ्या मधील पाण्याचा वापर करून साडेतीन एकर पपई शेती मध्ये, 21 लाख रुपयाचे उत्पन्न.
पॉली हाउस
-खर्च 42 लाख – शेड उभारणी आतील माती ,लागवड खर्च ,रोपे इत्यादी, त्यात 30 लाख रुपये बँक ऑफ इंडियाचे कर्ज-
-1.5 वर्षा मध्ये पूर्ण कर्ज परत फेड यामध्ये एन एच एम योजनेअंतर्गत 13,60,000 रुपये अनुदान, उर्वरित रक्कम उत्पन्ना मधून परत फेड.
- झेंडू व गलांडा फुल शेती
जेरेनियम शेती
-यावर्षी बारामती येथे कृषी प्रदर्शन पाहण्यास गेले असता अहमदनगर जिल्ह्यातील आंबळे येथे मच्छिंद्र चौधरी यांची सुगंधी वनस्पती जिरेनियम ची शेती पाहून त्याची लागवड केली.
-टरबूज ,खरबूज शेती ,मिरची व शिमला मिरची शेती.
नर्सरी - पॉली हाउस मध्ये लॉक डाऊन कालावधी मध्ये भाजीपाला नर्सरी अथवा केशर आंबा नर्सरी
- पॉलिहाऊस वर पडणारे पाणी बोर पुनर्भरण केले.
- सौर कृषी पंपाचा वापर.
- जेरेनियम डिस्टिलेशन प्लांट
- यावर्षी जेरेनियम डिस्टिलेशन प्लांट शिरूर नळेगाव फार्मर प्रोड्युसर कंपनी याच्या अंतर्गत शिरूर ताजबंद येथे 19 लाख 38 हजार रुपयांमध्ये उभारणी केली.
- यात 11 लाख तीस हजार रुपयाचे अनुदान पोखरा योजनेअंतर्गत मिळाले.
शेतीत अपयशाचे शेकडो उदाहरण असताना असे योग्य सूक्ष्म नियोजन करून… लाखो रुपये पदरात पाडून घेणारा, शासनाच्या योजनाचा अभ्यास करून त्याकुठे कुठे वापरायच्या याचे बारकावे ठरवून शिक्षणाच्या हमखास महिन्याच्या महिन्याला पगार देणारी सुखवस्तू नोकरी सोडून… उतरलेला संतोष सारोळे म्हणून दीपस्तंभ ठरतो…!
@युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर