जंगल मनाचे उमदे व्यक्तीमत्व.. लेख

0
286

जंगलमनाचे उमदे मित्र

 

‘महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) म्हणून सुनील लिमये यांची नेमणूक झाली आहे.’

पत्रकाराने अशा सगळ्या घटनांकडे अलिप्तपणे पाहायचं असतं. एक वन्यजीव पत्रकार म्हणून मीही तेच करायला हवं पण ही बातमी वाचून मला प्रचंड आनंद झालाय. वरिष्ठ वनाधिकारी नितीन काकोडकर यांच्या निवृत्तीनंतर आता सरांकडे ही जबाबदारी येणार याचा अंदाज होताच पण परवाच्या फोनमध्ये हा विषयही न काढता सर नेहमीप्रमाणेच जंगलाबद्दल बोलत होते…

लिमये सर म्हणजे माझे Green Friend, Green philosopher आणि Green Guide आहेत. वन्यजीव व्यवस्थापनाबद्दल मी केलेली कोणतीही बातमी असो, लेख असो की Documentary… लिमये सरांशी बोलल्याशिवाय ती पूर्णच होत नाही.

‘हां आरती …’
‘सर… बिझी आहात का ? मला अमुक अमुक जंगलात जायचं आहे, कायकाय महत्त्वाचं सांगाल ?’
‘काही problem नाही… अवश्य जा. तिथं हिंड, बघ सगळं. मग आपण बोलू.’लिमये सर फोनवर त्यांच्या मोकळ्याढाकळ्या कोल्हापुरी लहेजामध्ये सांगतात. त्यांचा ‘जंगलात हिंडणे’ हा शब्द मला जाम आवडतो.

आतापर्यंत एक हजार वेळा तरी माझा आणि लिमये सरांचा हा संवाद झाला असेल आणि लिमये सरांनी त्याच शांतपणे आणि खंबीरपणे मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली असतील! तुम्ही कसे आहात सर ? असं विचारलं की … बस्स टकाटक ! असं उत्तर मिळतं.

2004 मध्ये जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्ती विरुद्ध गावकरी संघर्ष सुरू झाला तेव्हा वनखात्याने या हत्तींना कर्नाटकमध्ये पुन्हा नेऊन सोडण्याची मोहीम आखली होती. त्यावेळी मी या अवलिया वनाधिकाऱ्याला पहिल्यांदा भेटले.

सिंधुदुर्गातले गावकरी, वनाधिकारी आणि आमच्यासारखे पत्रकार … या सगळ्यांसाठीच हत्तींचा हा प्रश्न नवा होता. मी इथल्या डोंगररांगांमध्ये फिरून हा प्रश्न समजून घेत होते. मंत्रिमहोदय स्वत: या मोहिमेला हिरवा कंदील देण्यासाठी आल्याने प्रत्येक जण बिझी होता. पत्रकारांच्या प्रश्नांची सरबत्ती झेलताझेलता वनाधिकारीही त्रासून गेले होते. मोहीम सुरू होणार इतक्यात कर्नाटकातून माहुतासोबत आलेला एक हत्ती गर्दीमुळे बिथरला होता. परिस्थिती गोंधळाची होती….

मी आणि माझा सिंधुदुर्गातला पत्रकार मित्र दिनेश केळुस्कर त्या गर्द जंगलात बांबूच्या एका रांजीजवळ हे सगळं पाहात थांबलो होतो. तिथेच लिमये सरांची आणि माझी पहिल्यांदा भेट झाली. त्यांचा appearance जंगलात खूप भटकलेल्या माणसासारखा वाटत होता म्हणून मीच पुढे जाऊन बोलले त्यांच्याशी.

सिंधुदुर्गातला हत्तींचा संघर्ष सोडवण्यासाठी वनखातं कायकाय करतं आहे ? याची सगळी माहिती त्यांनी शास्रीय पद्धतीने मला दिली. माझ्या काहिशा आक्रमक प्रश्नांनाही ते तितक्याच शांतपणे उत्तरं देत होते. त्यांच्याशी बोलल्यानंतर काही वेळानं मला कळलं ते IFS अधिकारी आहेत पण लिमये सरांच्या बोलण्यामध्ये आपण कुणीतरी ‘वरिष्ठ’ असल्याचा बडेजाव अजिबात नव्हता. ते अशा मैत्रीच्या सूरात बोलत होते की जणू काही माझी त्यांची खूप आधीपासूनची ओळख आहे.

एकदा ताम्हिणीच्या जंगलात डाॅक्युमेंटरी करत असताना जंगलातल्या कॅम्प फायर साइटवर मी त्यांना त्यांच्या वनसेवेतल्या कारकिर्दीबद्दल विचारलं. सर थेट सह्याद्रीमधल्या ट्रेकिंगच्या दिवसांत रमले. ‘ट्रेकिंग करतानाच मला भारतीय वनसेवेची वाट सापडली. ही जंगलं, दऱ्याखोरी, डोंगर सगळं मनापासून आवडू लागलं. आव्हान देऊ लागलं. मी भटकायचो खूप. एकदा माझ्या एका प्राध्यापकांकडून वनखात्याच्या परीक्षेबद्दल कळलं. मी ती दिली आणि वनसेवेत रुजूही झालो.

ट्रेकिंग करताना ज्या डाकबंगल्यात झोपून आम्ही रात्र काढायचो तिथेच एकदा मी अधिकारी म्हणून राहायला आलो ! डाकबंगल्याच्या चौकीदारानं मला ओळखलं तेव्हा त्याचाही ऊर अभिमानाने भरून आला.’
‘का नाही … ? तुम्ही त्याच्याशी त्या एका मुक्कामातच मैत्री केली असणार !’ मी म्हटलं. सर गडगडाट करत मोठ्यांदा हसले. मराठी तरुणांनी वनखात्याच्या सेवेची ही वेगळी वाट निवडायला हवी, असं त्यांना मनापासून वाटतं.

सिंधुदुर्गातल्या मोहिमेनंतर पुढची बरीच वर्षं लिमये सरांची भेट झाली नव्हती. मी माझी वन्यजीव पत्रकारिता करत होते, ‘ गाज’ ही फिल्म केली आणि नंतर ‘IBN लोकमत’ मध्ये आले. IBN लोकमत साठी आम्ही वेगवेगळ्या विषयांवर रिपोर्ताज करत होतो. घुसखोरी वाघाच्या जंगलात, हिरवं कोकण धगधगतंय या माझ्या रिपोर्ताजना रामनाथ गोएंका पुरस्कार मिळाला. ते दिवसच झपाटलेले होते. अगदी प्रत्येक ऋतूत वेगवेगळ्या निमित्ताने मी महाराष्ट्रातल्या जंगलात फिरत असे.

एक दिवस माझी सहकारी प्रियांका देसाईसोबत बोरीवलीच्या नॅशनल पार्कमधून एक निरोप येऊन थडकला… ‘ आरतीला सांग. कुठेकुठे फिरत असतेस राज्यात. थोडं बोरीवलीच्या जंगलातही येऊन बघ म्हणावं !’

लिमये सरांनी खास त्यांच्या शैलीत निरोप पाठवला होता. खरंच, बोरिवली नॅशनल पार्कचे संचालक झाल्यापासून त्यांनी या जंगलाचं रूपच पालटून टाकलं होतं. जंगलातल्या बिबट्यांचं सर्वेक्षण, बिबट्या विरुद्ध माणूस हा संघर्ष कमी करण्यासाठीचे प्रकल्प, मुंबईकरांसाठी या देखण्या जंगलाची सायकल सफरी अशा उपक्रमांचा धडाकाच त्यांनी लावला होता. लिमये सरांच्या मोकळ्याढाकळ्या स्वभावामुळे मुंबईकरांना हे जंगल आपलं वाटू लागलं होतं. ‘मुंबईकर्स for SGNP’ हा त्यांचा उपक्रम खूपच गाजला होता. यावरच मग मी ‘ मेट्रो जंगल’ नावाची Short Film केली. सर तेव्हा पुणे विभागाचं काम करत होते पण या जंगलाशी त्यांचं अतूट नातं होतं.

संजय गांधी नॅशनल पार्क चे संचालक असताना सरांनी मुंबईतल्या पत्रकारांसाठी या जंगलात तुलसी लेकच्या कोअर भागाची सफर आयोजित केली होती. तिथे आलेल्या पत्रकारांना सर बिबट्यांच्या कथा सांगत होते, सुतार पक्ष्याची बारकाईनं माहिती देत होते आणि त्यांच्या कोल्हापुरी ढंगात निसर्गप्रेमींचं स्वागत करत होते. या निमित्ताने एक मोठा निसर्गमेळाच भरवला होता त्यांनी.

बोरिवली नॅशनल पार्कच्या संचालकांचं हे रूप माझ्यासाठी नवं होतं. लिमये सर जराही बदलले नव्हते. मग बोरिवलीचं जंगल पाहण्यासाठी आणि खास लिमये सरांना भेटण्यासाठी मी या जंगलात वारंवार जाऊ लागले. त्यांच्या बंगल्यातल्या प्रशस्त व्हरांड्यात सरांशी जंगलाच्या गप्पा रंगत. लिमये सर त्यांच्या आवडत्या झोपाळ्यावर बसून एकामागोमाग किस्से सांगत.

त्यांच्या बंगल्याजवळच एक बिबट्याचा पिंजरा आहे. तिथे एक ढाण्या बिबट्या येरझारा घालत असायचा. ‘मी इथे या बिबट्यांबरोबरच राहतो आणि मॅडम, मुलं पुण्याला.’सर गमतीनं म्हणायचे. एकदा पहाटेच उठल्यावर, या बिबट्याच्या पिंजऱ्याशेजारी जंगलातला एक बिबट्या कसा घुटमळत होता याचा किस्सा त्यांनी अगदी स्क्रीन प्ले च्या थाटात सांगितला होता.

एकदा असंच गप्पा मारतामारता संध्याकाळ झाली. मी घरी यायचं विसरून गेले होते. सर म्हणाले, ‘आता तू कशी जाणार ? हे राजपूत सर. माझे सहकारी ठाण्यालाच चालले आहेत. त्यांच्यासोबत मधल्या रस्त्यानं जा. बिबट्या दिसेल तुला.’

मला खरं वाटलं नाही पण खरंच तुलसी लेकच्या जवळून जाताना पौर्णेिमेच्या चांदण्यात एक शानदार बिबट्या पाहायला मिळाला. लिमये सरांनी इथल्या माणसांशीच नाही तर बिबट्यांशीही मैत्री केली होती तर ! मी मनातल्या मनात हसून म्हटलं.

‘मला पश्चिम घाटावर फिल्म करायची आहे सर.’ लिमये सरांच्या ऐसपैस केबिनमध्ये मी मनातला अर्धामुर्धा विचार बोलून दाखवला होता.
‘मला माहितीय, एवढ्या 6 राज्यांत फिरणं म्हणजे खूपच अवघड काम आहे. जमेल का मला… ?’ माझ्याच प्रकल्पाबद्दल मी जरा साशंक होते.

लिमये सरांनी माझा सूर ओळखला. ‘आता तू जंगलात भटकण्यासाठी नोकरी सोडलीच आहेस. करून टाक ही फिल्म.’ सर माझा हुरूप वाढवत म्हणाले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पटापट कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांतल्या त्यांच्या बॅचमेट्सना फोन लावले. त्यांना माझ्या कामाबद्दल सांगितलं. पश्चिम घाटाच्या जंगलात फिरताना कोणत्या जंगलात मी गेलंच पाहिजे याबद्दलही विस्ताराने माहिती दिली.

2013 च्या त्या वर्षात मी सह्याद्रीच्या जंगलात फिरले. परराज्यांतल्या कुठल्याही जंगलात गेलं आणि त्या अधिकाऱ्यांना फोन केला की प्रतिसाद मिळे. ‘हां हां आरती . लिमये ने बताया था तुम्हारे बारे मे… सबकुछ बढिया ?’ असं स्वागत झालं की माझा उत्साह वाढे आणि मग चित्रिकरण निर्धोकपणे पार पडत असे.

याच माहितीपटासाठी मी लिमये सरांची बोरीवलीच्या जंगलात मुलाखत घेतली तेव्हा त्यांच्या गाडीने केलेली जंगलाची सफर मला अजूनही आठवते. सरांसोबत गेलं की हे जंगल तुमच्याशी दिलखुलासपणे बोलू लागतं, असं मला वाटतं. एकेक ओढा, एकेक रानवाट जिवंत होते. सरांच्या गाडीसमोरून दौडत जाणाऱ्या चितळांची वेगवेगळ्या ऋतूतली वर्णनं कळतात. त्याच वेळी जंगलात कुणी घुसखोरी केली असेल तर त्याला सरांचा सज्जड दमही खावा लागतो.

जंगलाबद्दल, तिथल्या प्राण्यांबद्दल सोप्या शब्दांत, थेटपणे बोलण्याची त्यांची हातोटी मला फार आवडते. वनखात्याच्या कामाबद्दलचा एकही प्रश्न लिमये सरांनी कधीच टाळलेला मला आठवत नाही. अशा वेळी ते जे काही असेल ते स्पष्ट सांगून मोकळे होतात.

‘ नातं पश्चिम घाटाशी’ या माझ्या पश्चिम घाटावरच्या डाॅक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगला ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, संपादक आणि खासदार भारतकुमार राऊत, पर्यावरणवादी कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि सुनील लिमये सर यांच्या उपस्थितीतला हा कार्यक्रम माझ्या खास आठवणीतला आहे. एक वनाधिकारी म्हणून लिमये सरांनी वनखात्याच्या कामाबद्दल अत्यंत मनमोकळा संवाद साधला.

‘तुम्ही फाॅरेस्ट खात्याचे अमिताभ बच्चन आहात सर’ या कार्यक्रमानंतर मी त्यांना दाद दिली. ‘ हां हां हरभऱ्याच्या झाडावर चढवू नको मला! ‘ सर तेवढ्याच मोकळेपणाने म्हणाले.

पण खरंच त्यांच्या या धडाडीचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला तो पांढरकवड्याला ‘अवनी’ वाघिणीच्या प्रकरणात. वनखात्याची ही अत्यंत कसोटीची मोहीम होती. T1 म्हणजेच अवनी वाघिणीच्या हल्ल्यात 13 जणांचा बळी गेला होता. तिच्या दहशतीतून गावकऱ्यांची सुटका करणं आवश्यक होतं. तर दुसरीकडे वाघिणीला वाचवण्यासाठी तीव्र आंदोलनं सुरू होती. दबाव वाढत चालला होता…

लिमये सर तीन महिने या मोहिमेसाठी पांढरकवड्याला ठाण मांडून बसले होते. मी मुंबईतून त्यांच्याशी बोलून अपडेट घेत होते. त्यांच्याशी बोलतानाच मला जाणवलं, या प्रकरणात इथे शहरात बसून अंदाज लावण्यात अर्थ नाही.

यवतमाळहून पांढरकवड्याच्या कॅम्पवर गेले तेव्हा लिमये सर आणि वनखात्याची फौज भेटली. जंगलात आलेल्या पत्रकारांचं सर मनापासून स्वागत करतात, तिथे येऊन परिस्थिती समजून घेतली की त्यांना कौतुकही वाटतं. ते प्रत्येक पत्रकाराला न थकता सगळी माहिती देत होते.

मी अवनीला मारणारे शिकारी, हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचे कुटुंबीय, गावांगावांत काम करणारे कार्यकर्ते सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या. लिमये सरांना कितीतरी थेट आणि कडवे प्रश्न विचारले. त्यांनी नेहमीप्रमाणेच शांतपणे त्याची उत्तरं दिली. या मुलाखती प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यावरून जाणवलं, एक वनाधिकारी म्हणून लिमये सरांनी अनेकांचा विश्वास कमावला होता. ते जे सांगत होते ते ऐकून घ्यायची प्रत्येकाची तयारी होती.

या मुलाखती संपल्या, माझं रिपोर्टिंग करून झालं की रात्री पुन्हा मी पांढरकवड्याच्या कॅम्पवर येत असे. अशा वेळी सर ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते, वनमजूर, गार्ड यांच्यासोबत संवाद साधत असत. ‘आम्ही अधिकारी तुमच्याशी बोलतो, स्क्रीनवर दिसतो पण तुला खरी माहिती या लोकांशी बोलून मिळेल.’ लिमये सर त्यांच्या खांद्यावर हात ठेवून मैत्रीच्या शैलीत सांगत.

कामाचं बोलून झालं की पुन्हा एकदा सरांशी जंगलाच्या, झाडांच्या, ट्रेकिंगच्या गप्पा सुरू होत आणि मग तिथला तणाव निवळून एक मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटे !
लिमये सरांसोबतची अशी जंगलाबद्दलची एकही मैफल मी सोडत नाही.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सरांसोबत मी एक अभ्यासदौरा केला. त्यांना सोलापूरजवळच्या येडशी रामलिंग अभयारण्यात सर्वेक्षणासाठी जायचं होतं. या आडवाटेच्या अभयारण्याबद्दल मलाही खूप उत्सुकता होती पण तेवढीच उत्सुकता होती सरांसोबतच्या प्रवासाची. आम्ही मुंबईहून पुणे आणि मग पुण्याहून नगर, बीड, उस्मानाबाद अशी मजल दरमजल करत गेलो.

त्यांचे डेहरादूनच्या प्रशिक्षणाचे अनुभव, त्यांचं पहिलं पोस्टिंग, वनाधिकारी म्हणून काम करतानाचे आठवणीतले किस्से, ताडोबाचे वाघ आणि वाघांवर प्रेम करणारे वन्यजीवप्रेमी यांचे अनुभव अशी एक मोठी कादंबरीच सरांनी माझ्यापुढे ठेवली आणि तीही एखाद्या चित्रपटाच्या स्क्रीन प्ले सारखी !

बीडच्या मयुरेश्वर अभयारण्यात भेटलेले वनखात्याचे निसर्गप्रेमी कर्मचारी, मियावाकी जंगल वाढवणाऱ्या लेडी फाॅरेस्ट गार्ड, वनखात्यात नुकतेच दाखल झालेले तरुण या सगळ्यांशी सर मोठ्या खुबीनं संवाद साधत होते. ‘काय आहे आरती… ही माणसं उन्हातान्हात, दूर अंतरावरून येऊन, आपल्या समस्या बाजूला ठेवून जंगलासाठी झटत असतात. मुंबई- पुण्याहून आलेल्या साहेबानं त्यांच्याशी दोन गोष्टी केल्या की बरं वाटतं त्यांना!’ सर सांगतात.

अशा दौऱ््यांसाठी सर मुद्दाम शनिवार – रविवारी सुटी न घेता वेळ काढतात. त्यांच्या पिवळ्या दिव्याच्या जीपमधून रानवाटा पिंजून काढतात. तेव्हा हे वनाधिकारी काही वेगळेच आहेत याची खात्री पटते. जंगलाजवळच्या कितीतरी गावकऱ््यांशीही त्यांनी या दौऱ्यात दोस्ती केलेली असते.

जंगलातली झाडं, प्राणी याइतकंच त्यांचं माणसांवरही प्रेम आहे म्हणूनच तर लिमये सरांनी राज्यभरात जंगलप्रेमींचं एक मोठं नेटवर्क उभारलं आहे. लिमये सरांच्या कानावर एखादी गोष्ट घातली की आपला प्रकल्प पुढे जाणारच हा विश्वास या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्याच कार्यकर्त्यांना वाटतो.

मुंबईतल्या वास्तव्यानंतर सर पुन्हा एकदा नागपूरकर झाले आहेत. आता त्यांना भेटण्यासाठी नागपूरच्या ‘वनभवन’ मध्ये जावं लागेल. वाघांच्या जंगलाच्या या प्रदेशात सर मोठी जबाबदारी सांभाळत असले तरी महाराष्ट्रातली सगळीच वनं त्यांची वाट पाहत असतील आणि पुन्हा एकदा एखाद्या आडवाटेच्या अभयारण्यात त्यांच्यासोबत जंगलाच्या हिरव्यागार गप्पा रंगतील… असं मनोमन वाटतं आहे.

लेखिका

आरती कुलकर्णी

स्त्रोत…फेबु

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here