एखादा माणूस त्याच्या हयातीत ‘समजणं’ ही केवळ आनंददायी गोष्ट; पण तसं होत नाही हे मोठं गूढ आहे. खरं तर माणूस आपल्याला समजला आहे, असा दावा करणं हेच मूळात धाडसाचं! त्यातही राजाकाकाबाबत काही ‘प्रेडिक्शन’ करणं म्हणजे ‘ओव्हर कॉन्फिडन्सच.’ खरं तर काकाचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास झाला होता. पंचांग पाहून काही ‘प्रेडिक्शन्स’ करण्याचा त्यांचा वकूब होता. पण प्रत्यक्षात त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल काही सांगता येणं त्यांच्या वयाच्या कोणत्याही वर्षात कठीण होतं.
वैदिक घराण्यात जन्म झाल्यानं ऋग्वेद संहितेचा अभ्यास त्यांनी लहानपणीच केला होता. त्यांचे वडील रामचंद्र म्हणजे आमचे आजोबादेखील ज्योतिषविद्येचे जाणकार, त्यांचीही ऋक संहिता झालेली. वाळूजसारख्या छोट्या खेड्यात आमच्या काकाचं प्राथमिक शिक्षण झालं, पण माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते सोलापुरात आले त्यांच्या मोठ्या भावाकडं. अर्थात आमच्या घरी. विद्याविकास प्रशालेनंतर पदवी घेऊन ते रितसर बँकेत कामाला लागले. हे सगळं सरळ रेषेतलं जगणं आहे, असं वाटेल. पण तसं नाही. राजाकाकांना समजून घेणं इतकं सोपं नव्हतं. अतिशय हुशार, वेदविद्येचा अभ्यास आणि जोडीला पदवी अभ्यासक्रमही पूर्ण केलेला. अनेक श्लोक, संस्कृत सुभाषितं, काव्य त्यांना मुखोद्गत होतं. वेदविद्येच्या अभ्यासासाठी त्यांनी काही काळ सज्जनगडावरही वास्तव्य केलेलं.
काकांच्या लहानपणापासून ते आमच्या घरीच वाढले. माझ्या आजीपेक्षा माझी आईच त्यांची आई झालेली. त्यांच्या आजारपण, दुखण्याखुपण्यापासून सगळ्या गोष्टी तीच पाही. राजाकाका शेंडेफळ; म्हणजे माझ्या आजीचं अकरावं अपत्य. भारताला स्वातंत्र्य मिळालेल्या वर्षी त्यांचा जन्म झाला. गंमत म्हणजे माझी आजी आणि माझ्या दोन आत्या एकाचवेळी थोड्याफार अंतरानं प्रसुत झाल्या. आत्यांची पहिली अपत्यं आणि आजीचं शेवटचं!! माझ्या काकाला त्यांच्या मामानं म्हणजे वासुदेवमामानं हातात घेतलं आणि त्यांचं रंगरूप पाहून ते म्हणाले, ‘याचं नाव ठेवा राजा!’ तेव्हापासून त्यांचं घरातलं नाव पडलं राजा. पण आजोबांनी कागदोपत्री स्वतःच्या वडिलांचं कृष्णाजी हे नाव काकांना लावलं!

पदवीनंतर बँकेतली नोकरी मिळाल्यानं वडिलांना राजाकाकाचं कोण कौतूक. दहाच्या आत जेवण आणि दुपारच्या जेवणाचा डबा देण्याबद्दल वडील आईला अक्षरशः तंबी देत. डबा घेऊन काकांची स्वारी कधी सायकलवर तर कधी चालत बँकेत जाई. पण ही दैनंदिनी फार थोडा काळ चालली.
काय झालं माहिती नाही, राजाकाका तर रोज तयार होऊन बँकेत जात. पण एकेदिवशी घरच्या पत्त्यावर काकांना बँकेत कामावर तातडीनं हजर होण्याचं ताकीद देणारं पत्र आलं. वडिलांना धक्का बसला. अनियमितपणाबद्दल राजाकाकांची ही नोकरी सुटली आणि पुढं आयुष्यात त्यांनी नोकरी कधीच केली नाही. रोज वेळेत कामाला जातो म्हणून घरातून सांगून जाणारा माणूस जातो कुठं? कामावर का जात नाही, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी अखेरपर्यंत दिलं नाही. असं कोणतं कारण होतं, अशी कोणती गोष्ट त्यांना खटकली की ज्यामुळं त्यांनी बँकेसारखी चांगली नोकरी सोडून दिली? माझ्या आईला किंवा वडिलांना त्यांनी त्याचं कारण अखेरपर्यंत सांगितलंच नाही…
राजाकाका जात्याच बुद्धिमान, जवळपास एकपाठीच. स्मरणशक्ती अगदी तल्लख. कोणत्याही घटना-घडामोडी त्यांना तिथी-वारानिशी लक्षात राहत. पण नोकरी सुटली तसं त्यांचं खाण्यापिण्यावरचं लक्ष उडालं. वडिलोपार्जित पौरोहित्यावर त्यांनी गुजराण सुरू केली. जोडीला मोठी शेती होती. आजोबा निवर्तल्यानंतर ते अधूनमधून गावाकडं, वाळूजला जात. पुढं आजीच वाळूजहून सोलापूरला आमच्या घरी आली. ‘राजा-राजा…’ अशा हाका मारत तिचा जीव त्यांच्यासाठी तीळतीळ तुटत असे. माझी आई मग आजीला आणि काकाला सांभाळून घेई, प्रेमानं, कधी रागानंही. आजी गेली आणि काका सैरभैर झाले. त्यांना आवरणं फक्त माझ्या आईला शक्य होत असे, कारण ते फक्त तिचंच ऐकत. माझ्या वडिलांसमोर तर ते येतच नसत. या दोन भावांमधील विलक्षण सख्य आमच्या प्रत्ययाला येत नसे, पण वडील राजाकाकाची चौकशी आईकडं करीत, त्या दोघांत बऱ्याचदा त्यांच्याविषयी बोलणं होत असे. पूजनीय गुरूनाथबाबा दंडवते यांच्या आश्रमात माझ्या वडिलांनी राजाकाकांना दर्शनाला नेलं आणि काका तिथं सेवा करू लागले.
एकदा गाणगापूरात दंडवते महाराजांच्या कार्य़क्रमानिमित्त आई-वडील आणि काका गेले होते. भीमा-अमरजा नद्यांच्या संगमावर दुथडी वाहणाऱ्या नदीत काठावर ते स्नान करीत होते. अचानक काकांचा तोल गेला आणि ते प्रवाहात गटांगळ्या खाऊ लागले, झटक्यात पूर्ण पाण्यात बुडाले. वेगाने पोहत जाऊन वडिलांनी त्यांना प्रवाहाबाहेर खेचून काढले आणि अरिष्ट टळले. पण काठावर ज्या दगडावर बसून ते स्नान करीत होते, त्यावरून पाय कसा निसटला आणि ते प्रवाहात कुणीतरी ‘ओढल्यासारखे’ पडले. हे कसं झालं ते त्यांनी अखेरपर्यंत सांगितलं नाही, कारण ते त्यांच्याच ध्यानात आलं नव्हतं. मात्र, माझ्या वडिलांनी पुनर्जन्म दिला, असं ते वारंवार सांगत…
वडील ‘आरएमओ’ असल्यानं शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेदालय दवाखान्याच्या तिसऱ्या मजल्यावरच्या कॉर्टर्समध्ये आम्ही राहत होतो. त्यावेळी म्हणजे साधारण १९७५ साली तिथं आयुर्वेद कॉलेजचं बांधकाम सुरू होतं. त्यासाठी अनेक ट्रक वाळू येऊन पडे. राजाकाकांच्या मनात काय आलं कुणास ठाऊक… त्यांनी चार वर्षाच्या माझ्या धाकट्या भावाला तिसऱ्या मजल्याच्या गच्चीवरून थेट खाली वाळूवर फेकून दिलं. वाळूवर पडल्यामुळं त्याला किरकोळ खरचटण्यापेक्षा जास्त लागलं नाही, पण त्यांनी तसं का केलं, याचं कारण शेवटपर्यंत सांगितलं नाही…
राजाकाकांचा विवाह झाला आणि त्यांची गाडी थोडी रुळावर आली. त्यांनी स्वतःच स्वतंत्र बिऱ्हाड केलं. कुठूनही आमच्या घरी आले की समोर असेल त्या पुतण्याला खिशातून कधी खडीसाखरेचा खडा, कधी खारीक, कधी बदाम, कधी एखादं फळ देत. आम्हा पुतण्यांशी त्यांचं अगदी मस्त जमे. सुटीत आम्ही मित्र कधी पत्ते वगैरे खेळत असू तर ते आमच्यात सामील होत. गाण्याच्या भेंड्यामध्ये संबंधित अक्षरांचे श्लोक किंवा चक्क आरतीही म्हणून त्यांनी साथसंगत केली होती. एकदा आम्ही मित्रांनी केलेल्या अंगतपंगतीत मित्रांनी आणलेल्या लसणाच्या ठेचाचा आस्वाद ‘चातुर्मास’ असतानाही ‘कोंचम कोंचम’ (हा त्यांचा शब्द, अगदी थोडा अशा अर्थानं) घेतला. त्यांचं हरवलेलं बालपणच जणू ते आमच्यात शोधत होते.
त्यांना चालण्याची खूप आवड होती. कित्येक किलोमीटर ते न थकता चालत असत. आणि उपाशी राहण्याची त्यांची प्रचंड ताकद. दोन दोन दिवस ते अन्नाशिवाय राहत. स्वतंत्र राहत असल्यानं, कुठं एखादी गोष्ट खटकली की उपाशी राहून ते स्वतःवरच राग काढतात की काय असं वाटे. अशावेळी पाय खरडत ते चालत. राजाकाका जेवलेले नाहीत, हे आई बरोब्बर ओळखे आणि त्यांना जेवायला वाढे, त्यांचा उपवास मग सुटे.
माझ्या आईची त्यांच्यावर खूप माया होती. तिचा कोणताही शब्द ते डावलत नसत. माझ्या आईमध्ये त्यांना जगदंबेचं रूप दिसतं, असं काका सांगत.
काळ आपल्या गतीनं पुढं सरकत राहिला. माझ्या काकूच्या पुढाकारानं सोलापुरात राजाकाकांनी स्वतःचा फ्लॅट घेतला. कन्या शर्मिलाचं उत्तम शिक्षण केलं. एमएस्सी बायोटेक्नॉलॉजी मध्ये तिनं फर्स्टक्लास मिळवला. संदीप बाकरे या गुणी तरुणाशी तिचा विवाह झाला. जावई संदीप आणि कन्या शर्मिलाचं कौतूक करावं तेवढं थोडं. संदीप यांनी वृद्धापकाळात राजाकाकांना पुण्यातल्या आपल्या घरात नेऊन त्यांचा अक्षरशः लहानमुलासारखा सांभाळ केला. स्वतःच्या छोट्या मुलांबरोबरच त्यांनी राजाकाकांना सांभाळलं. एकेकाळी लख्ख स्मरणशक्ती असणाऱ्या राजाकाकांना वयोमानपरत्वे विस्मृती होऊ लागली. त्यातून अनेक विकल्प निर्माण झाले, पण संदीप आणि शर्मिलाने जिद्दीनं, प्रेमानं सगळ्या गोष्टी केल्या. काकूचीही मदत त्यांना होत असे. या काळात संदीप आपलं व्यक्तिगत आयुष्य जणू विसरून गेले होते. त्यांचं हे ऋण मोठं आहे. संदीपच्या मातोश्रींनीही चांगला मानसिक आधार दिला. संपूर्ण बाकरे कुटुंबच आदर्श आहे. विद्यमान कालखंडात अशी निस्वार्थी, सहृदय आणि प्रेमळ माणसं भेटणं ही भाग्याचीच गोष्ट म्हणावी लागेल.
वाळूजसारख्या भोगावती नदीकाठी जन्मलेल्या राजाकाकांना संदीपच्या इंद्रायणी काठच्या मोशीच्या घरी देवाज्ञा झाली.
हा अखेरचा काळ कसोटीचा होता. राजाकाकांनी निर्माण केलेल्या प्रश्नांची उत्तरे स्वतःजवळच ठेवून ते गेले. चिं.त्र्यं.खानोलकरांच्या कादंबरीतल्या एखाद्या पात्रासारखं त्यांचं आयुष्य होतं. काकांच्या आयुष्यातील रिकाम्या जागा भरल्या तर एका मोठ्या कादंबरीचा तो ऐवज ठरेल. हिमखंडासारखं प्रचंड काही मनात आणि सतत चर्चा होत राहील असं जगणं जनात ठेवून राजाकाका निवर्तले. त्यांच्या जाण्याचं दुःख, हुरहुर, वेदना आहेच, पण आयुष्यभर आपल्या अवतीभवती असणारा माणूस आपल्याला कधीच का समजू शकला नाही याची खंत पोखरत राहील..!

रजनीश जोशी
( लेखक हे सोलापूर येथील जेष्ठ पत्रकार आहेत)
०००