मातोश्री वृध्दाश्रमातील आजी आजोबांना फराळांचे वाटप करुन
मुक्तांगण व लॉर्ड श्रीकृष्णच्या चिमुकल्यांनी साजरी केली आगळी वेगळी दिवाळी
लातूर -लातूरच्या विशालनगर परिसरातील मातोश्री कलावाती प्रतिष्ठान संचालित मुक्तांगण इंग्लिश स्कूल व लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कुलच्या चिमुकल्यांनी शहरालगत असणाऱ्या मातोश्री वृध्दाश्रमात आजी आजोबांसोबत यंदाची दिवाळी अतिशय उत्साहात साजरी केली आहे. यावेळी या विद्यार्थ्यांनी येथील आजी आजोबांना फराळाचे वाटप करत त्यांना त्यांच्या पासून पोरक्या झालेल्या नातवंडाचा सहवास दिला व त्यांना या दिवाळीच्या शुभेच्छा देऊन त्यांच्याकडून आशिर्वाद घेतले.
या प्रसंगी श्रीकृष्ण लाटे यांनी विद्यार्थांना आजी आजोबांची काळजी घेण्यास सूचित केले तसेच मुलांच्या शालेय जीवनात ऐतिहासिक, महाभारत, रामायणातील गोष्टी सांगून त्यांचा भाषा विकास करण्यात आजी आजोबांचे मोलाचे योगदान असते घरोघारी मुलांवर संस्कार घडवण्याचे काम नेहमीच आजी आजोबा करत असतात हे मार्गदर्शनपर सांगितले.
भारतीय संस्कृतीत दिवाळी हा सणच मुळात सर्वांना आनंद देणारा, हिंदू संस्कृतीतील सर्वच सणांमध्ये प्रमुख असणारा आणि अनेक वैविध्यपूर्ण सांस्कृतिक उत्सवाचा हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद देतो. म्हणूनच लातूर येथील विशालनगरच्या मुक्तांगण इंग्लिश स्कूल व लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल ने या देखील सणाला आपल्या चिमुकल्यांना एका वेगळया आणि जिवाला चटका लावणार्या उपक्रमाच्या माध्यमातून या सणाचा आनंद द्विगुणीत करण्याचा प्रयत्न केला आहे. यामाध्यमातून मुक्तांगण व लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात सर्व आप्तेष्ठांपासून पोरके झालेल्या मातोश्री वृध्दाश्रमातील आजी आजोबांना फराळाचे वाटप करुन तेथेच त्यांच्या सोबत अनेक चांगल्या गप्पा गोष्टी करत त्यांच्याही दिवाळीतील पर्वाला सुखद करण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी मुक्तांगण व लॉर्ड श्रीकृष्णचे चिमुकले विद्यार्थी यांनी या वृध्दाश्रमात असणार्या वृध्दांच्या नातवांची जागा घेत त्यांच्या सोबत अतिशय प्रेमळ भावनेने व मनमोकळे पणाने गप्पा मारल्या.
लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थीनी अनुष्का गोविंद सगर हिचा वाढदिवस आजीआजोबांच्या समवेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थी व पालकांच्या सहभागातून आजी आजोबांना फराळाचे वाटप केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे पालक पल्लवी गन्जेवर, शाळेच्या शिक्षिका अर्चना शिंदे यांचे विशेष सहकार्य केले.
या माध्यमातून येथील वृध्दांच्या बाबतीत सामाजिक ऋण अथवा कर्तव्याच्या भावाना व गुणांना वृध्दींगत करण्यासाठी मातोश्री कलावाती प्रतिष्ठान संचालित मुक्तांगण इंग्लिश स्कूल व लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कुलने हा उपक्रम हाती घेतला.
या कार्यक्रमासाठी मातोश्री वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक नरसिंह कासले, प्रा. भरत चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी श्रीकृष्ण लाटे, कविता लाटे, मुक्तांगणच्या प्राचार्या सुमेरा शेख व लॉर्ड श्रीकृष्णचे उपप्राचार्या रुपाली कुलकर्णी, समन्वयक रौफ शेख, दोन्ही शाळेच्या शिक्षिका व शिक्षक आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ममता शर्मा यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दोन्ही शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
———————————————————————————-