“शिवशंकर“
चांदोबा चांदोबा भागलास का ?
हे गाणं लहान असतानाही मला फारसं आवडायचं नाही.
“भागलास काय ?”
अरे काय हे ?
हे मराठी वाटायचंच नाही.
“चांदोबा चांदोबा आलास काय ?”
हे मात्र मला नक्की आवडायचं.
मी तिसरी चौथीत असेन.
आमच्या नगरला शनिचौकात ‘संपदा एजन्सीज’ नावाचं एक दुकान होतं.
सगळी मासिकं मिळण्याचं तेवढं बहुधा एकटंच दुकान असावं नगरमधलं.
एक तारखेच्या सुमारास मी बाबांबरोबर तिथं पोचायचो.
मला बघितलं की तिथले सुडकेकाका लगेच हसत हसत म्हणायचे.
“चांदोबा चांदोबा आलास काय ?”
मी काऊंटरपाशी टाचा ऊंचावत पुन्हा तेच विचारायचो.
“आलाय काय ?”
मग सुडकेकाका हसत हसत म्हणायचे.
“आलाय, आलाय !”
त्यांनी दिलेला चांदोबा हातात घेऊन,
मी बाबांच्या मागे स्कूटरवर बसायचो.
घरी जाईपर्यंत एकेक पान ऊलटत हावरटासारखं नुसती चित्र बघत बसायचो.
या चांदोबाची एक वेगळीच दुनिया असायची.
एकेक पान ऊलटत गेलो की त्या दुनियेत हरवून जायला व्हायचं.
चांदोबातली चित्रं हा माझा प्रचंड जिव्हाळ्याचा विषय.
त्यातली गावं.
बहुधा रामपूर हेच गावाचं नाव असायचं.
कौलारू घरं.
घरांचे सताड ऊघडे दरवाजे.
दोनफुटी चिर्याचं कंपाऊंड.
घरातलं टिपीकल फर्निचर.
नक्षीदार टेबल अन् त्यावरचं लोटीभांडे.
लांब हाताच्या आरामखुर्च्या.
ही असली आरामखुर्ची मी परवा एका डब्ड आण्णा मुव्हीत बघितलीय.
म्हातारा झाल्यावर मला या लंबे हातवाली आरामखुर्चीत घोरत पडायचंय.
तसं ठरलंय आपलं.
घरातले मस्ट मस्त झोपाळे.
भिंतीवरच्या खुंट्या.
अंगणातली झाडं,
नारळीची सरळसोट नाहीतर आंब्याची घेरदार.
गावातली मंदिरं.
मंदिराच्या चट्टेरी पट्टेरी भिंती.
बंद सिलिंड्रीकल बैलगाड्या नाहीतर बग्ग्या.
धूमकेतू, विचित्रवर्मा हे कथानायक.
विक्रम वेताळ, रामायण, महाभारत, वीर हनुमान, गणपती यासारख्या सिरीज.
देवदेवतांची अफलातून पौराणिक चित्र.
दलालांची चित्र बघण्याचं भाग्य आमच्या नशिबी नव्हतं.
चांदोबातले देवच आम्हाला खरेखुरे देव वाटायचे.
एकदम हॅन्डसम आणि कलरफुल.
फास्टफ्रेन्ड आणि रोजच्या पाहण्यातले.
देवळातल्या अस्सल देवांपेक्षाही हेच जास्त आवडायचे.
हे सगळं जिवंत चित्रविश्व ग्रेटच असायचं.
माझं आख्खं बालपण चांदोबाच्या चित्रात अडकलंय.
तर काय सांगत होतो ?
सर्वोदय काॅलनीतल्या आमच्या घरात एक चाफ्याचं झाड होतं.
चार एक फुटावर त्याला मस्त आडवी फांदी होती.
चांदोबा घेऊन घरी आलो की ,
आईकडनं वाटीत दाणेगूळ घ्यायचं.
चाफ्याच्या फांदीवर खोडाला टेकून बसायचं.
हातात चांदोबा आणि तोंडी लावायला दाणे गूळ.
आहाहा…
समाधी साधन.
दोन तीन तास निवांत चांदोबाचा रवंथ करत बसायचं.
आयुष्यात निवांतपणा अनुभवायचा असेल तर खुशाल चांदोबा वाचत बसावं..
सगळी टेन्शन्स गायब.
जरा मोठा झालो आणि चांदोबातल्या चित्रांखालची सही वाचता यायला लागली.
बहुतेक चित्रं दोघांनीच काढलेली असायची.
एक शंकर आणि दुसरे चित्रा.
आज महाशिवरात्रीला चित्रकार शंकर याची खूप आठवण झाली.
के. सी. शिवशंकरन हे या महान चित्रकाराचं नाव.
साठ वर्ष हा माणूस चंदामामा परिवाराशी निगडीत होता.
हजारो चित्रं या माणसानं काढली असावीत.
विक्रम वेताळाचं चित्र यांनीच पहिल्यांदा काढलं.
वयाच्या ब्यायण्णव वर्षापर्यंत हा माणूस चित्र काढत होता.
पौराणिक चित्र काढावीत तर याच माणसानं.
जणू तेव्हा ते स्वतः तिथं ऊपस्थित असावेत.
मला तर वाटायचं, देवलोकात बहुधा शंकरनजींचा स्वतःचा स्टुडिओ असावा.
सगळे देवगण टर्न बाय टर्न छान मेकअप करून त्यांच्या स्टुडिओत जाऊन फोटो काढून घेत असावीत.
फोटो डेव्हलप व्हायचे ते थेट पृथ्वीवरच्या चांदोबा मासिकात.
या देवचित्रांची प्रमाणबद्धता, त्यांच्या चेहर्यावरचे हावभाव, त्यांच्या अंगावरचे दागदागिने,रंगसंगती.
सगळं कालातीत.
शंकर यांनी चितारलेले शंकर महादेव, गणपती, हनुमान, रामचंद्र, लक्ष्मी सरस्वती..
खरंच देव होता त्यांच्या हातात…
अगदी देवसुद्धा स्वतःच्या चित्राकडे बघून खुष झाला असता अन् म्हणाला असता,
“ये हात मुझे दे दे शंकरठाकूर !”
तामिळनाडूतील इरोडेजवळच्या छोट्या गावात त्यांचा जन्म झाला.
1946 साली शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला आणि 1951 साली ते चंदामामा परिवारात सामील झाले.
शेवटपर्यंत तिथेच कार्यरत राहिले.
जवळ जवळ साठ वर्ष.
खरं सांगू ?
वर्षामागून वर्षे जाऊ देत.
सगळं काही बदलू देत.
नो प्राॅब्लेम.
फक्त एक गोष्ट मात्र तशीच रहायला हवी होती.
‘चांदोबा’.
चांदोबा आणि चांदोबातली चित्रं.
चांदोबा बंद पडलं आणि काळजाला ड्रिल मारल्यासारखं वाटलं.
चालायचंच.
नवीन पिढीच्या लहान मुलांना नसेल आवडत हे फारसं.
मला आवडायचं.
तुम्हाला आवडायचं.
मग झालं तर…
एकच राहिलं.
कधीतरी चेन्नईला वडपळणीला जायचं होतं.
चंदामामा बिल्डींगमधे हळूच शिरायचं.
केबिनमधे टेबलवर चित्र काढण्यात गुंगलेल्या शिवशंकर नावाच्या चित्रमहर्षीला डोळे भरून बघायचं.
चित्रमय देवदर्शन घडवणारा आमच्यासाठी साक्षात देवच.
राहिलं ते राहिलंच.
काही का असेना, त्यांची जिवंत चित्रं
अमर आहेत..
ती डोळे भरून बघायची.
आजच्या महाशिवरात्रीला शिवशंकरनाचे स्मरण करू यात.
जय जय शिवशंकर !
लेखन:कौस्तुभ केळकर नगरवाला.