लहानपणी आई सांगायची, ” लोकांना एखादी गोष्ट करा सांगितलं तर पटकन ऐकत नाहीत … पण देवा धर्माचा दाखला दिला की लोक बरोबर ऐकतात! ” त्यातूनच अंधश्रद्धा पसरण्यास सुरवात झाली असावी. रोज तुळशीला फेऱ्या मारा का ? तर तुळस दिवस रात्र ऑक्सिजन उत्सर्जित करते त्यामुळे आपण काही वेळ तरी भरपूर ऑक्सिजन देणाऱ्या वनस्पतीच्या सानिध्यात राहिलो तर आरोग्यासाठी लाभदायक ठरते. पण असं शास्त्रीय कारण सांगितल्यावर कोण कडमडायला जातो त्या तुळशी जवळ ! पण तुळस ही अत्यंत पवित्र आहे , ” जिथे आहे तुळशी पान तिथे वसेनारायण ” असे म्हणले की सश्रद्ध मान तुकवली जाते. आपल्या सण उत्सवाचे असेच झालेले आहे. खरं तर बारकाईने आणि विवेकनिष्ठ विचार केला तर हे सण उत्सव निसर्गचक्राशी – ऋतुचक्राशी सांगड घालताना दिसतात. देव ही संकल्पना व्यक्तीनिष्ठ असली तरी निसर्ग ही संकल्पना वस्तुनिष्ठ आहे.
आपल्या संस्कृतीत येणारे सण उत्सव निसर्गचक्राशी , कृषिजन्य संस्कृतीशी जोडलेले आहेत हेच दिसतं.
तसाच आता येऊ घातलेला ‘वट सावित्री पौर्णिमा’ हा सण. यात देखील निसर्गाच्या एका घटकाला अत्यंत पूजनीय मानले आहे. वडाचे झाड अर्थात वट वृक्ष. मराठी महिना जेष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला वटसवित्री पौर्णिमा साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी सतीसावित्रीने मृत्यूच्या जबड्यातून आपल्या सत्व सामर्थ्याने आपल्या पतीचे प्राण परत आणले होते त्याची आठवण म्हणून विवाहित स्त्रिया आपल्या पतींच्या निरोगी आणि दिर्घ आयुष्यासाठी मनोकामना करतात आणि उपवास करतात. सावित्री हे पुराणकथेतील ऐतिहासिक पात्र ! या कथेनुसार सावित्री ही मद्रा देशाचा राजा अश्वपती याची मुलगी(राजकन्या). तिचे लग्न शाल्व प्रांताचा राजा धृमत्सेन याचा मुलगा (राजकुमार) सत्यवान याच्याशी तिच्या मर्जीने म्हणजे तिने निवड करून झाला होता. हा धृमत्सेन राजा अंध होता आणि शत्रूने त्याचे राज्य काबीज केल्याने त्याला आपल्या कुटूंब कबिल्यासोबत जंगलात रहावे लागले होते. जेंव्हा सावित्रीने सत्यवानाची वर म्हणून निवड केली होती तेंव्हा नारदमुनीने सावित्रीला सल्ला दिला होता की, सत्यवान हा अल्पायुषी आहे तो येत्या पौर्णिमेला मृत होणार आहे तर तू त्याच्याशी लग्न करू नको . परंतु तो सल्ला धुडकावून तिने सत्यवानाशी विवाह केला आणि त्याच्या बरोबर वनात राहू लागली. नारदांनी सांगितल्या प्रमाणे सत्यवानाचा मृत्यू तीन दिवसांवर येऊन ठेपला तेंव्हा सावित्रीने उपवास करून देवी सावित्रीचे व्रत करण्यास सुरुवात केली. तिसऱ्यादिवशी सत्यवान लाकडे तोडायला बाहेर पडला असता चक्कर येऊन जमिनीवर पडला. तो मृत झाला म्हणून यमराज त्याचे प्राण घेऊन जाऊ लागला तेंव्हा सावित्री यमाच्या पाठीमागे चालू लागली व आपल्या पतीचे प्राण वापस दे म्हणून विनवणी करू लागली. यमाने तिला परत जाण्याचे बजावूनही ती मागे हटली नाही. तेंव्हा कंटाळून यमाने सावित्रीला सत्यवानाचे प्राण सोडून इतर तीन गोष्टी (वर) मागण्यास सांगितल्या. सावित्रीने सासऱ्याची दृष्टी , परत गेलेलं राज्य आणि स्वतःला पुत्र दे असे तीन वर मागितले. यमाने तत्काळ तथास्तु म्हणले आणि तो शब्दात अडकला आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. हा सगळा प्रसंग वडाच्या झाडाखाली घडला म्हणून वडाच्या झाडाला महत्व प्राप्त झाले अशी कथा आहे.
आधी आपण वडाच्या झाड बद्दल माहिती घेऊ आणि मग दोन्हींची सांगड कशी आहे ते बघू…
वड ज्याला वटवृक्ष म्हणतात. वड म्हणजे फायकस या प्रजातीत मोडणारी फायकस बेंगालेन्सिस नावाची जात आहे. अतिविशाल, प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे 30मीटर उंची पर्यंत वाढतो. हा एक प्राचीन वृक्ष आहे. वेद पुराणा पासून अनेक लोककथामधून याचे उल्लेख आढळतात. जसे की, भगवान शंकराचे संसारात लक्ष नाही म्हणून पार्वतीने त्याला तू वृक्ष होशील असा शाप दिला आणि तो पांरब्याचा जटाधारी ‘वटवृक्ष’ झाला. आणखी एका लोककथे नुसार महाप्रलय झाल्यावर सगळे चराचर नष्ट झाले तेंव्हा फक्त वटवृक्ष पृथ्वीवर घट्ट पाय रोवून उभा राहिला होता ! आजही गावागावातून वडाच्या झाडावर चढत,पारंब्याना लटकत कित्येक पिढ्या लहाणाच्यामोठ्या होतात. त्याच्या सावलीत गप्पांचे फड रंगवतात. वडाच्या झाडाला अक्षय वृक्ष असे म्हणतात कारण वडाच्या पारंब्या जमिनीतून पुन्हा पुन्हा उगवतात व झाडाचा विस्तार होतो. कधी कधी तो मैलोन मैलही असतो. 1950 मध्ये वडाच्या झाडाला “राष्ट्रीय वृक्ष” म्हणून मान्यता मिळाली आहे. वडाच्या झाडाचा प्रत्येक अवयव म्हणजे मुळे, खोड,पाने,फुले,चीक व साल यांचा उपयोग रोजच्या वापरात औषध म्हणून होतो. त्याची पाने आकाराने मोठी व संख्येने भरपूर असल्याने अनेक विषारीवायू शोषून घेऊन हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते. वडाचे झाड उन्हाळ्यात दिवसाला दोन टन इतके पाणी बाष्प स्वरूपात बाहेर फेकते त्यामुळे हवेत आर्द्रता व गारवा निर्माण होण्यास मदत होते. हा सदोदित हरित वृक्ष आहे. एक पूर्ण वाढ झालेले वडाचे झाड एक तासाला तब्बल 712 किलो इतका ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू सोडत असतो. अशा झाडा खाली जास्तीत जास्त वेळ व्यतीत करणे म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची पूर्तता करणे होय.
आता आपण पुन्हा सावित्रीच्या गोष्टीकडे वळू…
सत्यवान – सावित्री कथेतील सावित्रीच्या चरित्राचा शोध घेताना आपल्याला सावित्री एक हुशार , स्वतःचे निर्णय ठामपणे घेणारी,सहजासहजी हार न पत्करणारी आणि विज्ञाननिष्ठ स्त्री म्हणून समोर येते. तिने स्वतःचा पती स्वतः निवडला. जेंव्हा त्याच्याशी लग्न करण्याची वेळ आली आणि तिला कळले की तो अल्पायुषी आहे ( म्हणजे त्याला एखादा दुर्धर आजार आहे) तेंव्हा तिने त्याच्या वरील अत्यंतिक प्रेमा पोटी त्याचा ठामपणे स्विकार केला. त्याला नाकारले नाही. ती वनौषधींची जाणकार असली पाहिजे. आपला नवरा मूर्च्छित झाल्यावर त्याला प्राणवायूची गरज आहे लक्षात घेऊन तिने त्याला वडाच्या झाडाखाली आणले असेल आणि प्राणवायूचा पुरवठा झाल्यामुळे त्याचे प्राण वाचले असतील. असा त्या संपूर्ण कथेचा अर्थ आपण विवेकी विचार करून लावू शकतो. यात कुठल्याही प्रकारचा आणि कोणाचाही अवमान होऊ शकत नाही. उलट भारतीय संस्कृतीत अगदी पूर्वीपासून स्त्रियांनी त्याच्या बुद्धीमत्तेने अनेक प्रसंगातून स्वतःची आणि समाजाची सुटका केली आहे हे सिद्ध होते. मग आपण आजच्या स्वतःला आधुनिक आणि सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या स्त्रिया या सगळ्याकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघून हे सण उत्सव का साजरे करू शकत नाही. प्रत्येक सणांच्या वेळी निसर्गाची नासधूस केलीच पाहिजे का ? शंकराला बेल प्रिय म्हणून ऐन श्रावणात बेलाची झाडे अगदी ओरबाडली जातात. निवडून जून झालेली पाने तोडली तर हरकत नाही पण तितका संयम आणि तितकी निसर्गाबद्दलची आस्था बाळगायला वेळ कुणाला आहे. जस बेला बद्दल तसंच इतर सणांच्या वेळी उपयोगात आणले जाणाऱ्या वेगवेगळ्या फुलं पत्री बाबतही तेच करतो. वट पौर्णिमेला वडाचे झाड जवळ नाही म्हणून वडाच्या फांद्या तोडून त्यांची पूजा केली जाते म्हणजे जो वृक्ष आपल्याला प्राणवायू देतो त्यालाच ओकंबोकं करून टाकायचं हा कुठला शहाणपणा ? थोडक्यात आपल्या पूर्वजांनी ज्या निसर्गाचे उपकार मानण्यासाठी त्याच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या परंपरा सुरू केल्या त्याचा आपण अवमान करतोय अस वाटत नाही का ? नुकतेच करोना सारख्या भयंकर महामारीतून सावरत आहोत . त्या महामारीत आपण मंदिर- मस्जिद-चर्च यासारखी धार्मिक स्थळे देखील बंद ठेवली होती. प्रदूषणयुक्त शहरातून लहान गावाकडे जाण्याचा लोकांचा कल वाढला होता तो जीव वाचवण्यासाठी आणि आरोग्य चांगले रहावे म्हणूनचं . या सगळ्यातून धडा घेऊन आपण काही शिकणार आहोत की नाही.
आज त्या पुराणातल्या सवित्रीचा सुज्ञपणा आणि शिक्षणाची महती सांगणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा विवेकनिष्ठपणा आपण अंगीकारुन हे सण पूर्ण श्रद्धेने परंतु कुठलीही अंधश्रद्धा न बाळगता , निसर्गाची हानी टाळून साजरे करू या!! आणि विवेकनिष्ठ सावित्री बनू या !! असं मला म्हणावसं वाटतं.
@अरुणा दिवेगावकर.
( लेखिका या कवयित्री व सामाजिक कार्यकर्ती आहेत ,लातूर