चला दोस्तहो वडा पाव वर बोलू काही

0
351

चला दोस्तहो वडा पाव वर बोलू काही

आताच रेडिओ वर समजलं की आज जागतिक वडा पाव दिवस आहे. असा काही दिवस असतो हेच मुळात माहीत नव्हतं. पण, हा दिवस साजरा केल्यामुळे एक गोष्ट नक्की झाली की वडा पाव हा जागतिक पदार्थ आहे.

तसं म्हटलं तर ‘वडा पाव ‘ या पदार्थाची मुळं आपल्या संस्कृतीत सापडतात. पूर्वीच्या काळी राक्षसांनी यज्ञात विघ्न आणू नये म्हणून त्यांच्यासाठी ऋषीमुनी हा चविष्ट पदार्थ बनवून घेत असत असा उल्लेख माझ्या नुकताच एके ठिकाणी वाचण्यात आला.

मध्यप्रदेशात भीमबेटका इथे जी भित्तिचित्रे सापडली त्यातील स्वयंपाकातील पदार्थाच्या चित्रातील एक पदार्थ ‘वडा पाव’ सदृश्य असल्याचा संशय इतिहास तज्ज्ञांना आहे.

1960 साली गिरगाव ला वैद्य नावाच्या माणसाने ह्या पदार्थाचा शोध लावला नसून तो पदार्थ पुनरोज्जीवित केला असावा. इतक्या उशिरा हा पदार्थ अस्तित्वात आला हे दाखवून बाहेरील देशांना भारताच्या प्रसिद्ध पदार्थांमधील पायाभूत पदार्थच निकालात काढायचा आहे आणि यासाठी त्यांची ही चाल आहे असे अनेक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

खरं तर पूर्वीच्या काळी अफगाणिस्ताना पासून ते बिहार, बंगाल, ओरिसा, गुजरात पर्यन्त, अगदी दक्षिण भारतात देखील या पदार्थाचे अस्तित्व होते हे पुराव्यानिशी मी सिद्ध करू शकते. अफगाणी कबाब हा मुळात बटाटे वडा आहे. आता ते लोक मंजूर करणार नाहीत ही गोष्ट वेगळी.

दक्षिण भारतात देखील पूर्वी ‘ वुट्टम पाई’ असा जो पदार्थ मिळे तो वडा पावच होता असे नुकतेच माझ्या एका दाक्षिणात्य मित्राने एकटा असताना कबूल केले आहे.

चंद्रगुप्त मौर्य च्या काळात तर वडा पाव बनवणारे आचारी प्रसिद्धच होते. हे उत्तम आचारी आमच्या राज्यात हवेत म्हणून तेव्हा खूपशा लढाया झाल्या.

अलीकडच्या काळात तर प्रत्येक देशात या पदार्थाची चोरी करून आपली आपली नावे त्याला जोडली आहेत. बर्गर, potato pan cakes, potato tots, potato shots, cajun potatoes हे सगळे वडा पाव चेच वेगवेगळे प्रकार आहेत.

आपण सुद्धा वडा पाव आपल्या पारंपरिक पदार्थांमध्ये सामील करून आपली प्रादेशिक अस्मिता जपली पाहिजे. मला तर असं वाटतं की देवाला तिखट पदार्थांचा नैवेद्य जर दाखवता आला असता तर त्यात वडा पाव नक्कीच सामील झाला असता.

प्रत्येक गृहकर्तव्य दक्ष माणसाने जसे पोळी भात बनवायला शिकणे आवश्यक आहे तसे वडा पाव बनवणे देखील आवश्यक असायला हवे. किमानपक्षी वडा पाव बनवण्याचा एखादा क्रॅश कोर्स काढायला हवाच.

या पदार्थाला मूळ मात्र स्वतःची चव हवी. ढीगभर चटण्यानी त्याची मूळ चव झाकू नये. झणझणीत वडा पाव खाऊन जिभेवर त्याची चव रेंगाळत राहावी. आणि प्रत्येक गावचे वडा पाव चे विशिष्ट अड्डे ठरलेले असतात. पंचतारांकित हॉटेल मध्ये जाऊन खायचा हा पदार्थच नव्हे.

एवढं सगळं लिहून आता आजच स्टॉल वरचा वडा पाव खाण्याची इच्छा होते आहे. जिव्हा तृप्त करून घ्यावी.

#चला दोस्तहो वडा पाव वर बोलू काही

सारिका कुलकर्णी 

ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here