संजय राऊतांच्या वर्चस्वाला बसला हादरा
औरंगाबाद, ●राजेंद्र शहापूरकर●
राज्यातील महाआघाडीच्या महाप्रयोगातील
महिनाभरापूर्वी पर्यंत महाघटक असलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाने एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल ही घोषणा केली.
या संदर्भात खासदारांनी केलेला ‘प्रेमळ आग्रह’ ठाकरे यांनी ऐकला हे त्यांच्यासाठी एका अर्थाने चांगलेच झाले असे म्हणावे लागेल. म्हणजे पक्षप्रमुखावर सद्या आमदार , खासदार, जिल्हाप्रमुख, शाखाप्रमुख आदी साऱ्या प्रमुखांकडून ‘प्रेमळ आग्रह’ मोठ्या प्रेमाने केला जात आहे आणि पक्षप्रमुख जात्याच प्रेमळ असल्याने त्यांची स्थिती प्रेमात न्हाऊन निघाल्यासारखी झाली असल्यास नवल नाही. असे हे उराउरी प्रेमामुळे (म्हणजे या ह्दयीचे त्या ह्दयी) महाविकास आघाडीचा जीव मात्र गुदमरण्याचा संभव आहे.
म्हणजे तशी ही आघाडी एकसंध केव्हाच नव्हती. एवढेच नाही तर त्यातील कथित घटक पक्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परस्परांच्या विरोधात लढले होते. पण केवळ भाजपाला रोखण्यासाठी ते एकत्र असल्याचा भास तेवढा होत होता.त्याला फक्त आणि फक्त सत्तेचा आधार तेवढा होता. आता सत्तेचा आधार उरला नसल्याने महाआघाडीतील विसंवाद स्पष्ट होत चालले आहेत.
खरे तर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतच आघाडी समाप्त झाली होती. औरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांच्या नामांतराच्या वेळीच काॅग्रेस व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी कोणते तरी कारण काढून मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेर पडणे हा काही निव्वळ योगायोग नव्हता.ते आघाडीच्या समाप्तीचेच लक्षण होते. मुर्मू यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याच्या निर्णयामुळे समाप्तीचा दुसरा टप्पा पार पडला आहे.मग ‘हा पाठिंबा म्हणजे भाजपाला पाठिंबा नव्हे’ असे संजय राऊत कितीही कंठशोष करून सांगोत,त्यामुळे काहीही फरक पडत नाही.
खरे तर या निर्णयामुळे आपल्या सर्वोच्च न्यायालयातील लढाईमागची भूमिका पातळ होते, हे उध्दव ठाकरेंच्या लक्षात आलेच नसेल असे म्हणता येणार नाही. ‘मजबुरी का नाम महात्मा गांधी ‘ असे का म्हणत असावे याचा प्रत्यय त्यांना येत असावा . खासदारांच्या या ‘प्रेममय’ बैठकीत गेल्या काही वर्षांपासून सर्वेसर्वा असल्यासारखे वागणारे-बोलणारे पक्ष प्रवक्ते संजय राऊत उपस्थित असताना व त्यांचे सोनियाधार्जिणे धोरण सर्वज्ञात असतानाही ठाकरे गटाने मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय राऊतांसाठी त्यांचे वर्चस्वाला सुरुंग लागत असल्याची सुरवात असल्यासारखे आहे.
विशेष म्हणजे याच बैठकीत खासदारानी एकनाथ शिंदे व भाजपाशी जुळवून घेण्याची भाषा वापरणे राऊतांसाठी किती जीवघेणी असेल याची कल्पनाकेलेलीच बरी.
शिंदे गटाने विधिमंडळ शिवसेना पक्षावर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर सांसदीय शिवसेना पक्षाचे काय, या प्रश्नावर चर्चा सुरू असतानाच सेना खासदारांच्या बैठकीनंतर मुर्मूना पाठिंबा देण्याचा निर्णय यावा, याचा अर्थ शिंदे गट सांसदीय शिवसेना पक्षावरही आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात सफल झाला आहे, असा होतो. कारण असा निर्णय व्हावा अशी मागणी मुख्यतः शिंदे समर्थकांची होती.ठाकरे गटाला ती स्वीकारण्याशिवाय पर्यायच नव्हता, हा या निर्णयाचा अर्थ होतो.विशेषतः काॅग्रेस व राष्ट्रवादी हे पक्ष यशवंत सिन्हा यांचा प्रचार करण्यात आघाडीवर असताना मविआच्या तिसर्या शिवसेना गटाने मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करावा, ही बाब मविआच्या शवपेटिकेवरील मारलेला एक भरभक्कम खिळाच आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.
लेखन : राजेंद्र शहापूरकर
जेष्ठ पत्रकार, औरंगाबाद