अजितदादा आतून मिळाले की काय, खैरेंचं वक्तव्य
औरंगाबाद : (विशेष प्रतिनिधी)-
एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपच्या कुठल्या मोठ्या नेत्याचा सहभाग दिसत नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्यानंतर शिवसेना नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “आमचं आघाडी सरकार भाजपच तोडतंय, असं अजितदादांनी स्पष्टपणे बोललं पाहिजे, पण ते बोलत नाहीत. ते आतून मिळालेत का माहिती नाही” असं खैरे म्हणाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

“भाजपने सगळ्याच राज्यात अशीच फोडाफोड केली आहे. या बंडखोरीमागे भाजप नाही, असं अजित पवारांना वाटत असेल. पण आता ते (एकनाथ शिंदे) ओपनलीच बोलले ना आम्ही भाजपसोबत आहोत. अजितदादांना सगळं माहित असेल पण ते मुद्दाम बोलले असतील की भाजपचा हात नाही” असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

“अजितदादांसारख्या मोठ्या व्यक्तीने असं बोलायला पाहिजे का, उलटं म्हणायला पाहिजे की भाजपच करतंय म्हणून. आमचं आघाडी सरकार भाजपच तोडतंय, असं बोललं पाहिजे, पण ते बोलत नाहीत. काय ते आतून मिळालेत का माहिती नाही. ओपनली बोललं पाहिजे होतं, पवार साहेब कसे रोखठोक बोलतात, तसे अजितदादांनी पण बोललं पाहिजे” असेही खैरे म्हणाले.