25.5 C
Pune
Sunday, January 12, 2025
Homeमहाराष्ट्रगोदरेज ग्रुप पाशा पटेलांसोबत बांबू क्षेत्रात एकत्रित काम करणार

गोदरेज ग्रुप पाशा पटेलांसोबत बांबू क्षेत्रात एकत्रित काम करणार

एक तासाच्या चर्चेत बांबूच्या उपयोगीतेवर सांगोपांग चर्चा

*बांबूचा 100 टक्के वापर प्रयत्न करूयात….*पर्यावरण संरक्षणासाठी गोदरेज इंडस्ट्रीजचा सदैव पुढाकार राहत आलेला आहे. आता आम्ही पाशा पटेल यांच्या फिनिक्स फाउंडेशन सोबत एकत्रित काम करणार, याचा मनस्वी आनंद होत आहे. पर्यावरणपूरक बांबूचा वापर 10 टक्के मर्यादित न राहता, हा वापर शंभर टक्के करण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. त्यासाठी प्रारंभी 50 टक्के टार्गेट ठेवून, ते शंभर टक्‍क्‍यापर्यंत पोहोचण्याला आपले प्राधान्य राहील.

नादिर गोदरेज*(अध्यक्ष, गोदरेज इंडस्ट्रीज)

गोदरेजसोबत काम करण्याचा मनस्वी आनंद*गोदरेज इंडस्ट्रीज हा पर्यावरणासाठी काम करणारा औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठा ग्रुप असून, बांबू क्षेत्रात त्यांच्यासोबत काम करण्याचा योग लाभत असल्याचा आपणास मनस्वी आनंद होत आहे. हा ग्रुप फिनिक्ससोबत जोडल्या जाण्याने आमच्या पर्यावरणपूरक चळवळीला अधिक बळकटी मिळेल, यात तिळमात्र शंका नाही.*- पाशा पटेल*(अध्यक्ष, फिनिक्स फाउंडेशन)

*लातूर/प्रतिनिधी*

– देशातील सर्वात मोठ्या गोदरेज ग्रुपने बांबू क्षेत्रात पाशा पटेल यांच्या फिनिक्स फाउंडेशनसोबत एकत्रित काम करण्याची तयारी दर्शविली असून, यासाठी गोदरेजने आपल्या रिसर्च टीमसह संपूर्ण यंत्रणा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे. गोदरेज हा सर्व इंडस्ट्रीज ग्रुपमध्ये पर्यावरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करणारा ग्रुप असून, हा ग्रुप आता बांबू क्षेत्रात एकत्रितपणे काम करणार असल्याने पाशा पटेल यांच्या पर्यावरणपूरक बांबू चळवळीला हत्तीचे बळ प्राप्त होणार आहे.      बांबूची लागवड आणि वापरासाठी सुरू केलेली देशव्यापी चळवळ प्रत्येक क्षेत्रात रुजविण्यासाठी पाशा पटेल हे अहोरात्र परिश्रम घेत देशभर कार्यशाळा आणि बैठका घेऊन जनजागृती करत आहेत. औद्योगिक इंडस्ट्रीजमधील बॉयलर मध्ये वापरल्या जाणाऱ्या आणि प्रदूषण वाढविणाऱ्या दगडी कोळशाऐवजी कमी प्रमाणात कार्बन उत्सर्जन होणाऱ्या बांबू वापरासाठी ते जनजागृती करत आहेत, उद्योजकांच्या भेटी घेत आहेत. त्याअंतर्गत त्यांनी मंगळवारी (ता. 19 एप्रिल )गोदरेज वन , विक्रोळी,मुंबई येथे प्रतिथयश गोदरेज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष नादिर गोदरेज यांची भेट घेतली आणि या चळवळीत एकत्रित काम करण्यासाठी त्यांना साकडे घातले. बांबू आणि उपयोगिता या विषयावर उभयतांमध्ये सुमारे 1 तास चर्चा झाली. यावेळी गोदरेज म्हणाले की, बांबूच्या उपयोगीतेबाबत आपणास बरीच माहिती आहे. बॉयलरमध्ये इंधन म्हणून वापर होणाऱ्या दगडी कोळशाला बायोमास पर्याय ठरत असलातरी, ज्याप्रमाणे कोळशाचे भाव वाढत चालले, त्याचप्रमाणे बायोमासचे भाव वाढत असल्याने प्रश्न कसे सुटणार, अशी विचारणा त्यांनी केली असता, पाशा पटेल म्हणाले की, बांबूचे उत्पादन वाढवले आणि शेतकऱ्यांना एकरी ,1 ते 2 लाख रुपये दिले तर ते खूष होतील. परिणामी सर्व शेतकरी बांबू लागवडीकडे वळतील आणि त्यामुळे बायोमासचे भाव वाढण्याचा प्रश्नच येणार नाही. महत्वाचे म्हणजे एवढी अर्थप्राप्ती शेतकऱ्यांना कोणत्याच पिकातून मिळणार नाही. त्यांना बांबुतून आर्थिक सुबत्ता लाभेल, हे पाशा पटेल यांनी पटवून दिले. त्यानंतर बांबू पिकाला किती पाणी लागते, बांबूंची ऊस पिकाशी तुलना करताना बांबू शेतीसाठी लागणारे अत्यल्प पाणी, शून्य देखभाल खर्च, कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव न होणारे पीक, कार्बन उत्सर्जनाचे अत्यल्प प्रमाण, एकदा लागवडीनंतर किमान 70 ते 100 वर्ष तगणारे पिक, या बाबी जाणून घेत त्या पटल्यामुळे नादिर गोदरेज यांनी आपण बांबू या क्षेत्रात एकत्र काम करूया, लगेच काम सुरू करूयात, असा शब्द दिला तसेच बायोमासचा वापर करण्यासाठी गोदरेजची रिसर्च आणि तांत्रिक टीम फिनिक्स फाउंडेशनसोबत जोडून देतो, या क्षेत्रातील तुमची माहिती आम्हाला द्या, आमची माहिती तुम्हाला देऊ आणि व्यापक प्रमाणात एकत्रितरीत्या पर्यावरण पूरक काम करू, असे सांगितले. शेतकरी म्हणतायेत कोण घेणार बांबू? आणि इंडस्ट्रीजवाले म्हणतात कुठेय बांबू? ही सध्याची परिस्थिती ‘कोंबडी आधी की अंडे आधी’ याप्रमाणे आहे. आज घडीला पुरेशा प्रमाणात बांबू नाही हे मान्य आहे. मात्र, जिकडे आहे तिकडेचा थोडा महाग का होईना, तो खरेदी करून तूर्तास गरज भागविता येईल, यावर उभयतांमध्ये सकारात्मक विचारमंथन झाले.       या चर्चेदरम्यान जालना येथील दोन गोष्टी अधोरेखित झाल्या. त्यातील पहिली म्हणजे जालना जिल्हाप्रमाणेच महाराष्ट्रभर नदीकाठी बांबू लागवडीसाठी जलदुत नेमून गोदरेजसोबत एकंदरीत काम करणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जालना येथील स्टील इंडस्ट्रीजने आपापल्या बॉयलरमध्ये दगडी कोळशाबरोबरच ज्या पद्धतीने बांबूचा वापर सुरू केला, त्याचपद्धतीने गोदरेज इंडस्ट्रीच्या बॉयलरमध्येही बांबूचा 100 टक्के वापर करण्यावर नादिर गोदरेज यांनी सकारात्मकता दर्शविली.या बैठकीमध्ये काँनबँक चे संचालक संजीव करपे व पुण्याचे अक्षय चिटणीस सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]