सिनेमा सिनेमा

बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव, सेक्स, हिंसाचार व वरतून व्हायोलिनच्या जोरदार ताना! 'गॉडफादर ' हा चित्रपट जेव्हा पन्नास वर्षांपूर्वी थिएटरमध्ये आला तेव्हा असाच गोळ्यांचा वर्षाव करीत आला. या चित्रपटाने हॉलीवूडचा चेहरामोहरा बदलून टाकला. माफिया जगतावरील या चित्रपटाने सुपरहिट चित्रपटांच्या मालिकेचा प्रारंभ तर केलाच तसाच तो सांस्कृतिक मानबिंदू होऊन बसला!
इटलीतून न्यूयॉर्कमध्ये स्थलांतरित झालेल्या कॉर्लियॉनी कुटुंबाचा गुन्हेगारी जगतातील सर्वोच्च स्थानापर्यंत जाण्याचा प्रवास जगभरातील प्रेक्षकांना प्रभावित करून गेला. आजही हा चित्रपट क्लासिक समजला जातो. त्यावरून प्रेरणा घेऊन अनेक चित्रपट निर्माण झाले. गॉडफादर मधील कितीतरी सीन आपल्याला आजही कोणत्या ना कोणत्या चित्रपटात थोडा-फार बदल करून वापरलेले दिसतात. यावर आधारित अनेक चित्रपट निघाले, पण हॉलिवूडमध्ये गॉडफादर ची जागा आजही उच्च स्थानीच आहे.
त्यावेळी गॉडफादरला 11 विभागात ऑस्कर नामांकने मिळाली. त्यापैकी सर्वोत्कृष्ट चित्रपट व मार्लन ब्रँडोला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार तसेच मारिओ पुझो व फ्रांसिस कोपोलाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कारही मिळाला. ही पटकथा इतकी गाजली की, या पटकथेतील प्रसिद्ध ओळी आज संस्कृतीकोशात कायमच्या स्थान मिळवत्या झाल्या आहेत.
13 मार्च 1972 रोजी प्रदर्शित झालेल्या गॉडफादरला व्यावसायिक यश तर मिळालेच, शिवाय टीकाकारांची वाहवाही या चित्रपटाने मिळवली. तो बॉक्स ऑफिसवर इतका चालला की त्याकाळी सर्वाधिक उत्पन्नाचा उच्चांक मिळविलेला 'द साउंड ऑफ म्युझिक' या चित्रपटापेक्षा अधिक कमाई 'गॉडफादर' ने केली.
गॉडफादर च्या महाकाव्यात्मक कथेत काय नव्हते! प्रेक्षकांना खिळवून ठेवणार्या व्यक्तिरेखा, उत्कृष्ट अभिनय, नाविन्यपूर्ण चित्रपट निर्मिती, भावनात्मक शक्ती आणि पुरस्कारांची मोठी यादी! या चित्रपटाने शेकडो चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांना निर्मितीसाठी प्रेरणा दिली. यावर बेतलेला मार्टिन स्कोर्सेसी चा 'गूडफेलास', एचबीओची 'द सोप्रोनोस' ही सिरीयल त्याचप्रमाणे 'ब्रेकिंग बॅड' ही मालिका हे सर्व मूळ चित्रपटाप्रमाणेच गाजले.
या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या पॅरामाउंट पिक्चर्स ने जर त्यांना हवा तसा चित्रपट बनवला असता तर हा अतिशय वेगळाच बनला असता व कदाचित तो इतका अविस्मरणीय खचितच झाला असता! पॅरामाउंट ने हा चित्रपट बनवायला घेतला तेव्हा कंपनी आर्थिक तोट्यात होती. यातून बाहेर येण्यासाठी एका यशस्वी चित्रपटाची तिला गरज होती. पण या चित्रपटावर फार खर्च होऊ नये असाही त्यांचा प्रयत्न होता. म्हणूनच की काय, दहा दिग्दर्शकांनी गॉडफादर करण्यास नकार दिल्यानंतर फ्रान्सिस कोपोला यांना विचारण्यात आले. त्यांनी प्रारंभी आढेवेढे घेतले, पण नंतर ते राजी झाले. कलाकारांची निवड करताना कोपोला व निर्मात्यांमध्ये बरेच खटके उडाले. ज्यांना, डॉन विटो कॉर्लियॉनी या भूमिकेसाठी अभिनयाचे ऑस्कर मिळाले, त्या मार्लन ब्रँडो यांना ही भूमिका देण्याची निर्मात्यांची अजिबात इच्छा नव्हती.
मार्लन ब्रँडो यांचे बरेच चित्रपट अयशस्वी झाल्यामुळे पॅरामाउंटचा सुरुवातीपासून त्यांना विरोध होता. हे एकच कारण त्यामागे नव्हते, तर मार्लन हे चित्रीकरणादरम्यान अनेक अडचणी निर्माण करतात, वेळेवर येत नाहीत, त्यामुळे निर्मितीखर्च वाढतो असे कंपनीचे मत होते. त्यांच्याऐवजी या भूमिकेसाठी लॉरेन्स ऑलीव्हीए, अर्नेस्ट बोर्गनाईन, ऑर्सन वेल्स यांचा विचार करावा, असे कोपोला यांना सुचविण्यात आले होते. पण कोपोला यांनी फक्त आणि फक्त मार्लन ब्रँडो यांचाच विचार सुरुवातीपासून केला व तो तडीस नेला. मार्लन ब्रँडोप्रमाणेच अल पचिनोची निवड करण्यासाठीसुद्धा कोपोला यांना आपले दिग्दर्शकपद पणाला लावावे लागले. अल पचिनोला घेतले नाही तर आपण दिग्दर्शन करणार नाही असे कोपोला आणि धमकावतात कंपनीने होकार भरला!
कोपोला त्यावेळी अतिशय तरुण होते. आपल्या कित्येक निर्णयासाठी त्यांना पॅरामाउंट कंपनीबरोबर झगडावे लागले. एकवेळ तर अशी आली होती की निर्माती कंपनी पॅरामाउंट ने कोपोला यांना काढून टाकण्याचा निर्णय जवळपास घेतला होता. त्यांच्या जागी एलिया कझान या ज्येष्ठ दिग्दर्शकाचा विचार सुरू होता. कारण कंपनीच्या मते कोपोला हे खूप धीम्या गतीने काम करतात, निर्णय लवकर घेत नाहीत. यावर कोपोला यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले आहे की, हा चित्रपट दिग्दर्शित केला त्यावेळी मी तरुण होतो; मला फारसे अधिकार नव्हते. तो माझ्या कारकीर्दीतील अतिशय भयावह व निराशाजनक कालखंड होता. खर्च कमी करण्यासाठी या चित्रपटाच्या कथेतील कालखंड 1970 चा ठेवावा जेणेकरून महागड्या जुन्या मोटारी, सेट व तत्कालीन वेशभुषा आदीवरील खर्च कमी होईल असा निर्माती कंपनीचा आग्रह होता. पण मी हे मान्य केले नाही. त्यामुळे मूळ पटकथेतील 1940 चा कालखंड कायम राहिला.
आपल्या आग्रहासह त्यांनी चित्रपट पूर्ण केला व त्या चित्रपटाने इतिहास घडवला! त्यांनी हा संघर्ष केला व आपल्या मनासारखा गॉडफादर बनवला. त्यांचा अट्टाहास किती सार्थ होता हे आज पन्नास वर्षांनंतरही पटते.
'गॉडफादर' च्या अनेक बाबी अविस्मरणीय आहेत. चित्रपटाच्या प्रारंभीच एका दृश्यात हॉलिवूडच्या स्टुडिओ मालकाने डॉनचे म्हणणे न ऐकल्याने त्याला धमकावण्यासाठी त्याच्या अंथरुणात घोड्याचे कापलेले शीर ठेवले जाते. तो सकाळी उठतो, तेव्हा त्याची बोबडी वळते! या दृश्यात घोड्याचे खरेखुरे शीर वापरण्यात आले होते. ते एका कत्तलखान्यातून आणले होते. हे दृश्य पाहून प्रेक्षकही हादरून जातो व पूर्ण चित्रपटभर हा भीतीदायक परिणाम आपल्यावर कायम राहतो. या चित्रपटात अनेक दृश्य अशी आहेत की प्रेक्षक म्हणून आपण ती विसरू शकत नाही. यापैकी डॉन वीटो कॉर्लियॉनीचा अतिशय लाडका पुत्र सनी कॉर्लियॉनीची मशीनगनच्या शेकडो गोळ्या झाडून त्याची झालेली हत्या, डॉन चा उजवा हात समजल्या जाणाऱ्या लुका ब्रासीचा खून व व्हिक्टर स्ट्रासीचा लिफ्टमध्ये पिस्तुलाने केलेला भेद हे तीन सीन आजही चर्चिले जातात. वेगवेगळ्या सिनेमात दाखवलेले व कायम आठवणीत राहतील अशी गाजलेली जी वीस खूनाची दृश्ये आहेत, त्यामध्ये वरील तीन दृश्यांचा समावेश होतो.
रसिकांनी पाहायलाच हवा, अशा चित्रपटांच्या यादीत 'गॉडफादर' अव्वलस्थानी आहे. या चित्रपटाच्या यशाने आगामी काळात आलेल्या जॉज, इ.टी, स्टारवार्स, टायटॅनिक या आधी चित्रपटांचा मार्ग प्रशस्त केला. त्याचप्रमाणे बिग बजेट चित्रपटांना सर्वसामान्य प्रेक्षक डोक्यावर घेऊ शकतो, हा विश्वास हॉलीवूड चित्रपटसृष्टीला मिळवून देण्याचा मान या चित्रपटाकडे जातो. या चित्रपटाने दिग्दर्शक म्हणून कोपोला यांना प्रचंड मानसन्मान मिळाले. पण त्यांची पंचाईत देखील करून टाकली. कारण त्यांच्या नंतरच्या प्रत्येक कामाची तुलना 'गॉडफादर'शी होऊ लागली. त्यांनी या चित्रपटाचा दुसरा भागही तितकाच चांगला काढला. गॉडफादर-2 ने सुद्धा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे ऑस्कर पटकावले. कोपोलांनी आपले श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध केले!
परंतु 1990 मध्ये आलेला गॉडफादर'चा तिसरा भाग मात्र आधीच्या दोन भागांइतका प्रेक्षकांच्या कसोटीस उतरला नाही. असे असले तरी या तीन चित्रपटांनी माफिया जगताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन मुळासकट बदलून टाकला. हे झाले जगाच्या बाबतीत. पण माफियांचा सुद्धा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोण या चित्रपटांनी बदलला. माफिया जगतात प्रवेश करायचा असेल तर या चित्रपटांचा प्रथम अभ्यास करा मग तुम्हाला प्रवेश मिळेल असा जणू अलिखित नियम या चित्रपटांनी घालून दिला. हे चित्रपट म्हणजे माफिया जगताचे सूचना पुस्तक असल्याचा समज नंतर रुढ झाला!
अमेरिकन स्वप्नांची काळी बाजू दाखविणाऱ्या मारिओ पुझो यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी जगतातील कौटुंबिक नाट्य आपल्याला दाखवतो. माफिया जगताची उत्कंठापूर्ण कथा सांगत असतानाच गुन्हेगारी कुटुंबाची मानवी बाजू आपल्यासमोर येते. यातील माफिया डॉन भीतीदायक वाटत नाहीत. ते तुमच्या आमच्या सारखेच मानवी चेहऱ्याने वावरत असले तरी त्यांची दुनिया वेगळी आहे. लेखक म्हणून मारिओ पुझो व दिग्दर्शक म्हणून फ्रान्सिस कोपोला यांनी समर्थपणे ती आपल्यासमोर मांडली आहे.
'गॉडफादर'ने माफियाच्या जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकला. माफियांची घराणी, त्यांच्यातील नैतिक संदिग्धता,थंड डोक्यांनी चाललेला त्यांच्यातील हिंसाचार, गुन्हेगारी विश्वाचे नेतृत्व मिळवण्यासाठी सतत चाललेला जीवघेणा संघर्ष, हा चित्रपट आपल्यासमोर वास्तव पद्धतीने मांडतो.
'गॉडफादर' ने अनेकांची कारकीर्द घडवली. मार्लन ब्रांडो यांचा अभिनयाचा उतरणीला लागलेला आलेख या चित्रपटाने रातोरात वर नेला. शिवाय अल पचीनो, जेम्स केन, डायना किटन व रॉबर्ट द्रूवाल यांना स्टार पद मिळवून दिले. तर फ्रान्सिस फोर्ड कोपोला यांना जागतिक सिनेमा जगतात अग्रस्थानी आणून उभे केले!
गेल्या पन्नास वर्षात या चित्रपटाचे गारूड कमी झालेले नाही. गुन्हेगारी जगताचे अतिशय परिणामकारक चित्र मांडणारा हा चित्रपट पुढील पन्नास वर्षे सुध्दा आपले क्लासिकपद मिरवत राहणार यात शंका नाही.

श्याम जैन