आमदार धिरज देशमुख यांचे मत; ज्ञानेश्वर विद्यालयात गुणवंत शिक्षकांचा गौरव
लातूर :
नव्या पिढीला निर्णयक्षम, संस्कारक्षम, सकारात्मक व जागरुक नागरिक बनवणारी आणि त्यांच्या हाताला काम मिळवून देणारी शिक्षणव्यवस्था हवी. ती केवळ परीक्षांना आणि परीक्षेतील गुणांना महत्व देणारी नको. म्हणून सध्याच्या शिक्षणव्यवस्थेवर विचारमंथन करून त्यातील त्रुटी दूर करायला हव्यात, असे स्पष्ट मत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लातूर एज्युकेशन सोसायटी संचलित ज्ञानेश्वर विद्यालयात उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा संचाचे आमदार श्री. धिरज देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर शाळेतील गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
श्री. धिरज देशमुख म्हणाले, हल्ली शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली आहे. मुलाने ९९ टक्के गुण घेऊनही त्याचे कौतुक होत नाही. एवढी स्पर्धा गरजेची आहे का? यामुळे तरुणाईत निराशा वाढत आहे. एकामागोमाग एक परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरही विपरित परिणाम होत आहे. याचा विचार करून आजची शिक्षणव्यवस्था बदलण्याबाबत किंवा त्यातील त्रुटी बाजूला करण्याबाबत शिक्षक, पालक, शिक्षणतज्ज्ञ यांनी एकत्र येऊन विचारमंथन करायला हवे.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव गोमारे, लातूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, संस्थेचे सचिव डी. एन. शेळके, बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाट, बँकेचे संचालक राजकुमार पाटील, संचालक स्वयंप्रभा पाटील, संचालक अनुप शेळके, नागनाथराव कनामे, प्रल्हाद दुडिले, विठ्ठल इगे, प्राचार्य वाघमारे, नगरसेवक अजय गुडीले, मोहनराव माने, व्यंकटराव कुल्ले, नाथराव कोल्हे, संस्थेचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अॅड. मनोहरराव गोमारे यांनी अध्यक्षीय भाषण केले. डी. एन. शेळके, नागनाथराव कनामे, अनुप शेळके यांनीही मनोगत व्यक्त केले.—-चौकट :सौर ऊर्जा ही काळाची गरज
सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे. ती ओळखून संस्थेने सौर ऊर्जा संच बसवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असाच आहे. सौर ऊर्जा वापराबाबत समाजाचा कल दिवसेंदिवस बदलत आहे. पण, तरीही जनजागृतीचे कार्य यापुढेही सुरूच रहायला हवे. सरकारच्या यासंदर्भातील योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचायला हव्यात, अशी अपेक्षा आमदार श्री. धिरज देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.—