विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था
येथे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार
लातूर, दि.16(जिमाका):- सरफराज शेख रा. लोहटा ता. औसा येथील दहा वर्षाचा मुलगा खेळताना पडून डाव्या हाताच्या कोप-यावर मार लागला होता. जखम झाल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर त्या रुग्णाला लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात रुग्णाचे हाड चुकीच्या पद्धतीने जुळून कोपरातील सांधासुद्धा निखळला होता. यामुळे रुग्णाची सांध्यामधील हालचाल कमी होऊन हाडसुद्धा वाकडे झाले होते.
लातूरच्या शासकीय रुग्णालयात अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागाच्या मार्फत विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये शहरात प्रथमच शस्त्रक्रियेचे लाईव्ह टेलीकास्ट यावेळी करण्यात आले होते. यामध्ये जवळपास 350 डॉक्टरांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला होता. यामध्ये 13 रुग्णांवर अत्यंत आधुनिक पद्धतीने उपचार करण्यात आले होते. यावेळी सरफराज शेख या 10 वर्षीय रुग्णाची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया याच कार्यशाळेत डॉ. विशाल चांडक , डॉ. गोवर्धन इंगळे व शासकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या चमूने पार पडली. रुग्णाचे वाकडे जुळलेले हाड सरळ करून निखळलेला सांधा पुर्ववत बसवण्यात आला. त्यामुळे सदरील रुग्णाची सांध्याची पूर्ववत हालचाल प्राप्त झाली. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. या संस्थेच्या इतिहासामध्ये आजपर्यंत फक्त 2-3 वेळा ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून ही शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर रुग्णांवर त्याचा परिणाम अत्यंत चांगला झाला आहे असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
सदरील विभागीय कार्यशाळा अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. रणजीत हाके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.शशिकांत कुकाले, डॉ.प्रशांत घुले, डॉ.मन्सुर भोसगे, डॉ.विजय वाघमारे, डॉ.तुषार पिंपळे यांनी यशस्वी रित्या पार पाडली.
या कार्यशाळेचा सकारात्मक लाभ झालेल्या सरफराज शेख या रुग्णाच्या उपचारावर आनंदी पित्याने अधिष्ठाता व शस्त्रक्रिया करणा-या सर्व डॉक्टरांचे आभार मानले. या उपक्रमाचे शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे यांनी कौतुक केले व भविष्यातसुद्धा अश्या प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करण्यासंबंधी प्रोत्साहित केले.
****