36.7 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeलेखगाव हरवल्याच्या खुणा…!

गाव हरवल्याच्या खुणा…!

माझ्या पुण्यात स्थायिक होण्याला आता तीन दशकं झाली. इतक्या वर्षांत इथलं शहरपण अंगवळणी पडलं, पण मनाच्या खोल तळाशी गावाची मुळं घट्ट रोवलेलीच राहिली. कोणी विचारलं, “कुठले तुम्ही?” तर अजूनही ओठांवर आपसूक येतं – लातूर जिल्ह्यातील चोबळीचा!

गेल्या वर्षभराच्या कामाच्या व्यापामुळे गावी जाता आलं नाही, पण सोशल मीडियावर गावच्या गल्ल्या, मंदिराच्या पायऱ्या, चावडीवरचे कट्टे, आणि जुन्या मंडळींच्या गप्पा अद्याप भेटतात. मात्र, या आठवणींतूनच गाव जिवंत राहिलंय, प्रत्यक्षात तिथं गेलं की वेगळाच रिकामेपणा जाणवतो.

गावाने कितीतरी पिढ्या उराशी जपलेल्या, ज्या वडिलधाऱ्या मंडळींनी आपल्या असण्याला अर्थ दिला, त्या एकेक करत वठलेल्या पिंपळपानासारख्या गळून पडत आहेत. त्या माणसांचं योगदान गावाच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग होतं, पण तो इतिहास कुठं तरी त्यांच्यासोबतच मातीत मिसळतोय. त्यांच्या आठवणींना वाहणारे डोळे उरले, पण त्या आठवणी शब्दात उतरणार नाहीत, नोंदल्या जाणार नाहीत. गावाच्या मातीशी जोडणाऱ्या या खुणा काळाच्या ओघात पुसट होत चालल्या आहेत.

मागच्या वर्षी गावी गेलो, तर एका छोट्याशा मुलाने सहज विचारलं – “कोणाच्या घरी जायचंय?” त्याच्या निरागस प्रश्नाने काळजात खोलवर वेदनेचा टोकदार तुकडा रुतला. ज्या गावात मी जन्मलो, वाढलो, खेळलो, त्या गावात मला ओळखणारं नवं पिढीत कुणी नाही, आणि मीसुद्धा त्यांना ओळखत नाही! गावात कधीतरी दोन दिवसांसाठी जाणं होतं, पण तिथल्या बदललेल्या चेहऱ्यांनी आणि नवा रंग चढलेल्या गावानं अनोळखी असल्यासारखं वागवलं.

चार हजार लोकसंख्येच्या गावात, पूर्वी प्रत्येकजण एकमेकांना ओळखायचा. आज तीन दशकं पुण्यात राहूनही शेजारच्या अपार्टमेंटमधल्या सगळ्या माणसांची नावंही माहिती नाहीत. इथं गरजा बाजार पुरवतो, नात्यांचा संवाद व्हॉट्सअ‍ॅपवर होतो, आणि मनोरंजनासाठी असंख्य माध्यमं आहेत. पण जेव्हा मन मोकळं करावंसं वाटतं, तेव्हा अजूनही गावाकडच्या मित्रालाच फोन करतो.

पुण्यात जन्मलेल्या नव्या पिढ्यांना विचारलं की, “कुठले तुम्ही?” तर ते अभिमानाने सांगतात – “पुण्याचे!” पुन्हा खोदून विचारलं की, “मूळ कुठलं?” तर उत्तर येतं – “वडिलांचं गाव अमुक एक!” गावाचा हा तुटलेला धागा खूप वेदनादायक असतो. शहराच्या गर्दीत हरवलेल्या या पिढ्यांना गाव काय असतो, याची जाणीवच राहणार नाही का, ही भीती वाटते.

इतिहासात १५-२० पिढ्या मागं जाऊन शोधलं, तर आपले पूर्वज कोण होते, कुठं होते, याचा ठोस पुरावा सापडत नाही. फक्त काही संदर्भ, काही तुटक आठवणी, गावातल्या मंदिराच्या गाभाऱ्यात कोरलेली नावं आणि स्मशानभूमीतल्या जुन्या समाध्या! गावाशी असलेलं नातं केवळ तिथल्या घरापुरतं मर्यादित राहिलं, तर आपल्या अस्तित्वाचेच संदर्भ हरवून जातील.

आपण कुठून आलो, कोणत्या मातीत रुजलो, हेच विसरायला लागलो, तर जगाच्या कोणत्याही टोकाला गेलो तरी मुळं नसलेल्या झाडासारखे भरकटू. मातीशी नाळ तोडल्याने काय गमवतो, हे पटकन समजत नाही, पण या तुटलेल्या नात्याची किंमत पुढच्या पिढ्यांना चुकवावी लागते. गाव हरवल्याच्या खुणा जसजशा पुसट होत जातात, तसतसं आपल्या असण्याला आधार देणारी भूमीही दुरावत जाते.

माणसाच्या इतिहासाची मुळं त्याच्या गावाच्या मातीत खोलवर रुजलेली असतात. तीच जर उन्मळून पडली, तर आपण फक्त भौगोलिक सीमारेषेत उरतो—माणूसपणाचा आत्मा हरवून गेलेल्या शहरी गजबजाटात हरवतो…!

  • युवराज पाटील चोबळीकर
  • जिल्हा माहिती अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]