गणेशचे वडील अशोक सवादे मूळचे गुलबर्ग्याचे. त्यांना थोडं बोलण्याचा आणि ऐकण्याचा प्रॉब्लेम म्हणून हॉटेलवर काम करायचे. त्यांच्या मावशीला त्यांनी हॉटेल मध्ये काम करण्यापेक्षा अंबाजोगाईत येऊन काही काम करावे वाटत होते म्हणून ते अंबाजोगाईत आले व इथे गॅरेजवर काम करायला लागले. त्यांच्या चार मुलांच्या पैकी गणेश तिसरा मुलगा. दोन वर्षांनी मावशीच्या घरात राहणाऱ्या अशोकना आपली स्वतःची व्यवस्था करायला सांगितले. अमदानी फारच कमी मग भाड्याचे घर कसे परवडणार. शेवटी एक पत्र्याचे कुड बांधून ते राहू लागले. गणेशच्या आईकडे अठराविश्व दारिद्र्य. वडील आणि भाऊ दारू पिऊन मेले. घराला हातभार लागावा म्हणून त्या धुनीभांडी करतात. त्यांची सगळी भविष्याची मदार गणेशवर !!
गणेश शिकलकरी वस्तीवरील सर्वात गुणी मुलगा. प्रचंड समंजस. कुठल्याही गोष्टीचा हट्ट नाही न कधी काही मागणे. कुणाशी भांडण कधीच नाही. शाळेत अगदीच रोज जाणार !! तो नेहेमीच आनंदी असतो अगदीच हसतमुख !!
गणेश आता सातवीत आहे. त्याचा दिवस सकाळी पाचला होतो. घरातील सर्वांच्या आधी तो उठतो. फारच क्वचित त्याला उठवावे लागते. सकाळचे आवरले की तो सरळ शिकवणीला जातो. सकाळी 6 ते 9 शिकवणी. तिथून आला की थोडं काही खातो की लगेच फळवाल्याकडे कामाला जातो. त्याला दिवसाचे साठ रुपये मिळतात. त्यातील काही पैसे तो आईला देतो इतर आपल्या गल्यात साठवून ठेवतो. त्या पैशातून तो शाळेसाठी लागणारे साहित्य घेतो. त्याची धावपळ फार व्हायची म्हणून त्यांनी आताच एक वापरलेली सायकल घेतली. दोन तास दुकानावर काम केलं की तो घरी येऊन जेवण करतो व लगेच शाळेत जातो. दुपारी साडेचार पर्यंत शाळेत.
शाळेतून आला की तो ज्ञान प्रबोधिनीच्या आनंद शाळेत. ते संपले की परत फळवाल्याकडे कामाला. दोन तास काम करून तो घरी येतो जेवण करून अभ्यासाला बसतो. दीड दोन तास गृहपाठ आणि अभ्यास करून झोपी जातो.
मी गणेशची दिनचर्या ऐकत असताना अवाक होत होतो. त्याच्याशी गप्पा मारताना मी त्याला विचारले तुला कोण व्हायचे ?
“मोठा माणूस व्हायचे !!”
“मोठा माणूस म्हणजे काय रे ?“
“प्रसाददादा सारखा मोठा !!”
मी परत अवाक !! काय बोलावे हेच कळत नव्हते. गेले तीन वर्षे मी गणेशला पाहतो आहे. त्याची धडपड खरच कमालीची आहे. तो जीव तोंडून मेहनत घेतोय. त्याचे भविष्य काय असेल हे आता नक्कीच मला सांगता येणार नाही पण त्याची जिद्द,मेहनत करण्याची वृत्ती आणि समंजस पणा याने त्याला केव्हाच मोठं केलं आहे माझ्या मनात !! अगदीच माझ्यापेक्षाही मोठा.
मला गणेशच्या पेक्षा खूप चांगल्या सुविधा होत्या. अगदीच घरातले पण काम कधी पडले नाही. सगळ्या सुखसोयी होत्या. मनात मोठा इंजिनिअर होण्याची इच्छा होती भरपूर पैसे कमावण्याची. माझ्या तुलनेत गणेशची परिस्थिती अगदीच विपरीत आणि त्याचा संघर्ष माझ्यापेक्षा किती तरी जास्त आहे. गणेश मित्रा निदान तुझ्या वयात मी तुझ्यापेक्षा खुपच खुजा माणूस होतो रे !! तू आजच माझ्यापेक्षा ही खूप जास्त कष्ट करतोस. माझ्या संघर्षा पेक्षा तुझा संघर्ष खुप मोठा आहे. तू नक्कीच मोठा माणूस होशील माझ्यासारखा नाही तर माझ्यापेक्षा ही खूप मोठा. ताठ मानेने आम्हाला सांगता येईल गणेश आमच्या ज्ञान प्रबोधिनीचा अव्वल दर्जाचा प्रबोधक ….खूप मोठा माणूस !!
लेखन :प्रसाद चिक्षे