लातुरातील कन्हेरी रोडवरील लोहाना महाजनवाडीत
गणपती मंदिराची प्राणप्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळा संपन्न
लातूर :
श्रीराम नवमीचे औचित्य साधून लातूरच्या कन्हेरी रोड, रिंग रोड परिसरातील श्री लोहाना महाजनवाडीतील श्री गणपती मंदिरातील श्री गणपती व अष्टविनायक मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळा उत्साही व मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
हा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, लातूर शहर मनपाचे आयुक्त अमन मित्तल लातूरचे विख्यात अस्थिशल्य चिकित्सक डॉ. अशोक पोद्दार यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात रविवारी सकाळी सात वाजल्यापासून होमहवनने करण्यात आली. या होमहवनच्या पूर्णाहुतीस प्रमुख अतिथींसह लोहाना महाजनवाडी संस्थेचे अध्यक्ष हरीशभाई ठक्कर, सचिव निलेशभाई ठक्कर यांचीही उपस्थिती होती. पूर्णाहुतीनंतर दीप प्रज्वलन करण्यात आले. तत्पश्चात मूर्तींची मान्यवरांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर लोकार्पण करण्यात आले. संस्थेच्या वतीने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, मनपा आयुक्त अमन मित्तल, डॉ. अशोक पोद्दार यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या अष्टविनायकच्या मूर्ती खास राजस्थान मधून आणण्यात आल्या आहेत. या मूर्तींकडे पाहिल्यास भाविक भक्तांना जणू साक्षात अष्टविनायकाचे दर्शन घेतल्याची अनुभूती येते. श्री गणपतीची मूर्तीही अत्यंत आकर्षक बनवण्यात आली आहे. या मंदिर परिसरात आल्यानंतर मूर्तींचे दर्शन घेतले की भाविक भक्तांना निश्चितच प्रसन्न वाटते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी या मंदिराच्या लोकार्पणाने लातूरच्या सौंदर्यात कमालीची भर पडणार असून मंदिर परिसर भाविकांना आकर्षित करून घेणारा असा असल्याने भविष्यात हे लातुरातील एक प्रेक्षणीय स्थळ बनेल,असा विश्वास व्यक्त केला. अमन मित्तल यांनी या मंदिरातील गणेश मूर्ती भाविक भक्तांच्या प्रत्येक अडचण, समस्येचे निराकरण करणाऱ्या असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. अशोक पोद्दार यांनी आपले विचार व्यक्त करताना राम नवमीचे औचित्य साधून आपणास एका चांगल्या सोहळ्यास उपस्थित राहण्याची सुवर्णसंधी मिळाल्याचे सांगितले. श्री लोहाना महाजनवाडी संस्थेचे अध्यक्ष हरीशभाई ठक्कर यांना विविध ठिकाणी अशा प्रकारची सुंदर व आकर्षक मंदिरे उभारण्याची आवड असून ईश्वर त्यांच्याकडून हे कार्य अत्यंत यशस्वीपणे पूर्णही करून घेतो, असे सांगून हरीशभाईंच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली लोकार्पण करण्यात आलेले हे पाचवे मंदिर असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी किल्लारी, नांदेड, लातूर याठिकाणीही अशीच भव्य दिव्या मंदिरे उभारल्याचे डॉ. पोद्दार यांनी आवर्जून नमूद केले.