गझलकार इलाही जमादार यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त
३१ जानेवारीला नांदेड मध्ये ऑनलाइन ‘ग़ज़लांजली’चे आयोजन
नांदेड, (प्रतिनिधी)- सुप्रसिद्ध ग़ज़लकार इलाही जमादार यांच्या प्रथम स्मृतीदिना प्रित्यर्थ येत्या ३१ जानेवारी रोजी नांदेड येथे ‘कोहिनूर-ए-ग़ज़ल’ इलाही जमादार ‘ग़ज़लांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
■येथील नागोरावजी नरवाडे मंगल कार्यालयात दुपारी ४ वाजता होणाऱ्या ‘ग़ज़लांजली’ अभिवादन कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्रालयातील अवर सचिव विकास तु. कदम यांच्या हस्ते होणार आहे. प्रोफेसर डॉ. राजेंद्र गोणारकर, समाजकल्याण अधिकारी ग़ज़लकार बापू दासरी, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ऑनलाइन – दूरदृश्य प्रणालीद्वारे हा कार्यक्रम होणार आहे.
■जागृती सामाजिक प्रतिष्ठान आणि पूज्य मातोश्री स्मृतीशेष सीताबाई तुळशीराम कदम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग़ज़लांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ग़ज़लांजली’ कार्यक्रम आकाशवाणीचे निवृत्त सहसंचालक स्मृतीशेष भीमराव शेळके विचार मंचावर होणार आहे, अशी माहिती इलाही जमादार अभिवादन कार्यक्रमाच्या संयोजन समितीतर्फे देण्यात आली आहे.
■नांदेडच्या श्री गुरू गोविंदसिंघजी पत्रकारिता महाविद्यालयात प्रसिद्ध विचारवंत प्रोफेसर डॉ. राजेंद्र गोणारकर यांच्या अध्यक्षतेखाली इलाही जमादार अभिवादन कार्यक्रमाच्या आयोजनाची बैठक पार पडली. या बैठकीत कविश्रेष्ठ इलाही जमादार यांच्या प्रथम स्मृतिदिन कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली. ■सध्याची कोरोना प्रादुर्भावाची स्थिती आणि शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करून संयोजन समिती संगीत क्षेत्रामधील मोजके वाद्यवृंद, कलावंत- गायक आणि मर्यादित रसिकांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम पार पाडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ग़ज़लांजली कार्यक्रमात इलाही जमादार यांच्या ग़ज़ल, दोहे, लावणी गायक सादर करणार आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध गायक नामदेव इंगळे, बी.के. कांबळे, शीव मठपती, महेश जैन, प्रा. किरण सावंत, संगीतकार सदाशिव गच्चे, आकांक्षा मोतेवार, रागेश्री जोशी, राजकिरण कांबळे गायक सहभागी होणार आहेत. सुप्रसिद्ध तबलावादक स्वप्नील धुळे, अंकुश डाखोरे, आदित्य डावरे, अमित गायकवाड, ओंकार गायकवाड आणि त्यांचा संगीत संच या कार्यक्रमात वाद्यवृंदासह साथ-संगत देणार आहे.
■अभिवादन कार्यक्रमात इलाही जमादार यांच्या विविध ग़ज़ल तसेच दोहा वाचनाचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. बापू दासरी, जगन शेळके, शंकर नरवाडे, राम चव्हाण, डॉ. राजेंद्र गोणारकर, माया भद्रे, डॉ. विकास कदम अशोक एडके आदींचा ग़ज़ल वाचन कार्यक्रमामध्ये सहभाग राहणार आहे.
■अभिवादन कार्यक्रमाचे नांदेड येथील पत्रकार प्रवीण कंधारे यांच्या ‘मराठी नाऊ’ आणि पुणे येथील पत्रकार विजय भुजबळ यांच्या ‘जागृती न्यूज’ चॅनेल द्वारे ऑनलाईन- दूरदर्शन प्रणालीद्वारे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यामुळे सदर चॅनल्सच्या लिंकवर हजारो रसिकांना घरबसल्या आपल्या मोबाईलवर ‘ग़ज़लांजली’ अभिवादन कार्यक्रम ऑनलाईन- दूरदृश्य प्रणालीद्वारे पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अभिवादन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र गोणारकर आणि कवयित्री माया भद्रे करणार आहेत.
■ ‘कोहिनूर-ए-ग़ज़ल’ इलाही जमादार ‘ग़ज़लांजली’ अभिवादन कार्यक्रमाच्या संयोजन समितीचे पदाधिकारी प्राचार्य डॉ. विकास कदम, माया भद्रे, बी.के. कांबळे, एड. साहेबराव शेळके, सामाजिक कार्यकर्ते दीपक नरवाडे, ग़ज़लकार बापू दासरी, जगन शेळके, शंकर नरवाडे, आनंद भोरगे, प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार, रोहित शास्त्री अडकटलवार, डॉ. कैलास धुळे, विलास वाळकीकर, अशोक एडके, प्रा.अमोल धुळे, गायक दामोदर आदींनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.