महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय 100 वे नाट्यसंमेलन
गंजगोलाई ते दयानंद महाविद्यालय दरम्यान आज निघणार नाट्यदिंडी
▪️पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार कलावंत
▪️महासंस्कृती महोत्सव अंतर्गत सर्व उपक्रमांना निःशुल्क प्रवेश
लातूर, दि. 11 (वृत्तसेवा): -राज्य शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि लातूर जिल्हा प्रशासनामार्फत भव्य महासंस्कृती महोत्सव, तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने 100 व्या नाट्य संमेलनाचे लातूर येथे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आज, 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता गंजगोलाई ते दयानंद महाविद्यालय दरम्यान नाट्यदिंडी निघणार आहे.

नाट्यदिंडीचे उद्घाटन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते नियोजित आहे. तसेच यावेळी आमदार अमित देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, भरत जाधव, संकर्षण कऱ्हाडे, विजय गोखले, अभिनेत्री स्पृहा जोशी यांची उपस्थिती राहील. गंजगोलाई, महात्मा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, छ्त्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे दयानंद महाविद्यालय येथे आल्यानंतर नाट्यदिंडीचा समारोप होईल.

दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता संकर्षण कऱ्हाडे आणि स्पृहा जोशी यांचा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम होईल. याचठिकाणी रात्री 8 वाजता ‘तू तू मी मी’ हे व्यावसायिक नाटक सादर होईल. यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव हे 14 भूमिकेत असतील, तसेच कमलाकर सातपुते यांचाही सहभाग असेल.

दगडोजीराव देशमुख सभागृह येथे रात्री 8 वाजता अभिजित झुंजारराव दिग्दर्शित ‘कृष्ण विवर’ हे प्रायोगिक नाटक सादर होईल. या सर्व कार्यक्रमांना निःशुल्क प्रवेश राहणार आहे.