१७ व्या राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धनाचा निवासी संकुल प्रवर्गातील प्रथम पुरस्कार
“गंगासागर रेसिडेन्सी” लातूरने पटकावला
लातूर -ऊर्जा संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण संस्थेद्वारे १७व्या राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन पुरस्कारासाठी स्पर्धा आयोजित केली होती त्यात निवासी संकुलाच्या प्रवर्गामध्ये गंगासागर रेसिडेन्सी लातूर या संस्थेने राज्य स्तरावरील प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे १४ डिसेंबर ते २० डिसेंबर हा सप्ताह, “ऊर्जा संवर्धन सप्ताह” म्हणून राज्यभर साजरा केला जातो. याचे औचित्य साधून १४ डिसेंबर रोजी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आलेला असून, लवकरच मुंबईमध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
गंगासागर रेसिडेन्सी, लातूर या संकुलामध्ये १६८ कुटुंबे राहत असून प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरावरील टाकीला बॉल-फ्लोट व्हाल्व बसवलेले आहेत. अनेक कुटुंबाने सोलर रूफ टॉप बसवून अक्षय ऊर्जा स्त्रोतातून विजेची गरज भागवण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. ४०% घरांनी गरम पाणी मिळण्यासाठी सोलर वॉटर हीटर बसवलेले आहेत. संपूर्ण संकुलामध्ये व निवासी घरात एलईडी बल्ब बसविलेले आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीमध्ये उच्च व निम्न पातळीवर सेन्सर्स बसवून पाण्याची मोटार आपोआप चालू – बंद होण्याची व्यवस्था केलेली आहे. अनेक घरांनी आपल्या घराच्या वरच्या स्लॅबला सनकोट पेंट देऊन इमारत गरम होणार नाही, याची काळजी घेतलेली आहे.
संकुलातील सदस्यांना पारंपारिक विजेचे पंखे न वापरता, नवीन तंत्रज्ञानावर आधारित बी एल डी सी फॅन जे पारंपारिक पंख्याच्या तुलनेमध्ये केवळ २५ ते २८ टक्के ऊर्जा खर्च करतात, असे पंखे बसवण्याचे आवाहन केलेले आहे. बऱ्याच सदस्यांनी त्यांच्या घरचे शक्य असतील तेवढे पंखे बदलण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. घनकचरा व्यवस्थापनामध्ये ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून, ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाते. येत्या एक वर्षांमध्ये संकुलाचे सर्वसाधारण वापराचे वीज देयक शून्य करण्याचा संकुलाचा संकल्प आहे. गंगासागर संकुलामध्ये ऊर्जा संवर्धनासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री रघुनाथ उपाख्य नंदू कुलकर्णी, सचिव श्री सतीश बाचपल्ले, कोषाध्यक्ष श्री शामसुंदर बांगड, उपाध्यक्ष श्री भारत चव्हाण, सहसचिव श्री मधुकर राठोड व संचालक मंडळातील डॉ. हेमंत पाटील, प्रा. प्रशांत करंजीकर, अॅड. श्रीमती वैशाली यादव, श्रीमती वर्षा सुडे, श्री अजहर शेख व श्री दगडू भारती यांनी संचालक म्हणून संकुलाला पुरस्कार प्राप्त करून देण्यासाठी मोठे योगदान दिले. गंगासागर संकुलातील सर्व सदस्यांनी भरीव योगदान दिल्यामुळे व सहकार्य केल्यामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाला व याचे सर्व श्रेय संकुलातील सर्व रहिवाशांना जाते असे अध्यक्ष श्री नंदू कुलकर्णी यांनी सांगितले.
—————————————————————————–