“ सामर्थ्य शब्दांचे “
रिक्षा, मर्सिडीज, सर्वससामांन्याचे सरकार, बंडखोर, पक्षांतर्गत उठाव, गद्दार अशा अनेक शब्दांची सध्या महाराष्ट्रात जोरदार बरसात सुरू असल्याची अनुभूती सर्वसामान्यांना येतेय. कदाचित बदलत्या काळानुसार राज्याच्या ( ? ) विकासासाठी हेच परवलीचे शब्द आहेत का ? असा स्वाभाविक प्रश्न निर्माण होतोय. नवीन सरकार येताच आधीच्या सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली जाणे, यातून सामान्य नागरिकांनी नेमका काय अर्थबोध घ्यायचा ? स्थगितीतून नेमके काय साध्य करायचे आहे ? आधीच्या सरकारने घतलेले निर्णय महाराष्ट्राच्या हिताचे नव्हते का ? राज्याच्या हितासाठी नव्हते तर मग ते कोणाच्या हिताचे होते ? चुकीचे निर्णय घेतले गेले असा अर्थ यातून अभिप्रेत आहे का ? राजकीय पटलावरील या वा अशा अनेक निर्णयातून नेमके काय साध्य करायचे आहे ? सध्याचे राजकीय वातावरण पहाता महागाईसह अनेक समस्या वा अडचणींचा सामना करणार्या सर्वसामान्य नागरिकांना मात्र हाच प्रश्न पडतोय. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांच्या संवादातून * खेळ मांडीयेला …. * दुर्दैवाने असेच वक्तव्य ऐकायला मिळतय. ” सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास ” या उक्तीचा अर्थ सोयीनुसार लावला जातोय हेच सध्याच्या राजकीय पटलावरील घडामोडीतून स्पष्ट होतय.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ही अनेक संकटांचा सामना करणार्या व ” अच्छे दिन म्हणजे काय रे भाऊ ” असा स्वाभाविक प्रश्न पडलेल्या राज्यातील बहुसंख्य नागरिकांसाठी “हवा हवाई चार्टर विमानांची उड्डाणे “, पंचतारांकित हाटीलातील मुक्काम, यामागिल अर्थकारण, जनसामान्यांचे प्रतिनिधी म्हणवणाऱ्यांसाठी प्रचंड सुरकक्षा कवच, पावसाळी पर्यटनासाठी सुरत, गुहाटी, गोवा अशा राज्यांचे दौरे, यातून नेमके काय साध्य होणार आहे ?
माजी खासदार सोमय्यांसह भाजपनेही महाविकास आघाडीशी काडीमोड घेतलेल्या व आता सत्ताधारी गटातील काही लोकप्रतिनिधींवर आरोप केले आहेत, चौकश्या सुरु आहेत, त्याचे आता नेमके काय होणार ? ईडीचे ( देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार ईडी म्हणजे एकनाथ व देवेंद्र) धोरण काय असणार ? सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा न करणे, मार्गदर्शकाच्या भुमिकेला पसंती देणार्या माजी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचे पक्षादेश माध्यमातूनही दिले जाणे यामागचे नेमके संकेत काय आहेत ? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरातून पारदर्शी कारभाराची प्रचिती सामान्य जनतेसह नेहमीच गृहित धरल्या जाणाऱ्या मतदारराजालाही येईल का ?
राजीव मुळेकर
खालापूर