लातूर/प्रतिनिधी:लातूरचे खासदार तथा आगामी निवडणुकीत भाजपाचे उमेदवार असणारे सुधाकर शृंगारे यांनी जिल्ह्यातील मान्यवरांच्या सदिच्छा भेटी घेतल्या.यादरम्यान माजी मंत्री बसवराज पाटील यांनी लातूर लोकसभेसाठी पूर्ण वेळ देण्याची ग्वाही दिल्याचे खा.शृंगारे यांनी सांगितले.
भाजपाने लातूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून खा. सुधाकर शृंगारे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे.उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खा.शृंगारे यांनी मान्यवरांच्या भेटी- गाठींचे सत्र सुरू केले आहे.या अंतर्गत शनिवारी (दि.२३ )खा.शृंगारे यांनी माजी मंत्री तथा औशाचे माजी आमदार बसवराज पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.यावेळी भाजपाचे लातूर लोकसभा प्रभारी किरण पाटील,लातूर शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे व गुरुनाथ मगे यांची त्यांच्यासमवेत उपस्थिती होती.
यावेळी बोलताना बसवराज पाटील म्हणाले की,आम्ही पूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीशी आहोत.लोकसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघासाठी आपण पूर्ण वेळ देणार असून या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा फडकावणार आहोत.खा.
शृंगारे यांच्या रूपाने भाजपाचा उमेदवार विजयी करण्यासाठी आपण काम करू,अशी ग्वाही त्यांनी दिली.
आ.अभिमन्यू पवार यांचीही खा.शृंगारे यांनी भेट घेतली.आ.पवार यांनी खा.शृंगारे यांना आगामी निवडणुकीसाठी यावेळी शुभेच्छा दिल्या. महायुतीतील घटकपक्ष शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष ॲड.बळवंत जाधव यांचीही त्यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी जाधव परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. महायुतीतील घटक पक्ष एकत्रितपणे भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी काम करत असून यामुळे शृंगारे यांचा विजय सुकर होणार असल्याचे ॲड.जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले.