गुडसूरकरांच्या लेखणीत मुक्तिसंग्रामाच्या लढयाला समाजासमोर प्रभावीपणे आणण्याचे सामर्थ्य: लक्ष्मीकांत देशमुख
पुणे / प्रतिनिधी–
” हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या लढयाला समोर आणण्यासाठी पुढच्या पिढीतील लेखकांनी प्रभावीपणे लेखनाची गरज आहे . धनंजय गुडसूरकर यांच्या लेखणीत असणारी क्षमता व या विषयाच्या अनुषंगाने त्यांचा अभ्यास व आत्मियता पाहता या विषयावर त्यांनी मोठा प्रकल्प हाती घ्यावा ” अशा अपेक्षा महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली .

साहित्यिक व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांच्या’ खळाळल्या शृंखला’ या पुस्तकाचे प्रकाशन मराठवाडा मित्रमंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाले . या प्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते . व्यासपीठावर मुक्तिसंग्रामाचे अभ्यासक व पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर,साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका डॉ . संगीता बर्वे, मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव , लेखक धनंजय गुडसूरकर हे उपस्थित होते .

“हैदराबाद संस्थान व काश्मीर संस्थान या दोन संस्थानांचे विलीनीकरण हा स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचा प्रश्न होता. या दोन्ही प्रश्नात त्या त्या भागातील नेत्यांचे व तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाचे योगदान महत्त्वाचे ठरते .हैदराबाद मुक्तिसंग्रामात वरवर धार्मिक संघर्ष दिसत असला तरी या लढ्याला धार्मिक स्वरूप येऊ न देण्याचे श्रेय स्वामी रामानंद तीर्थ व त्यांच्या सहकाऱ्यांना जाते असे मत देशमुख यांनी पुढे बोलताना व्यक्त केले .

“राज सत्तेचा अन्याय मर्यादेच्या बाहेर जातो तेव्हा उठाव होणे स्वाभाविक असते इंग्रजांनी केलेल्या अत्याचारापेक्षा भयानक अत्याचार हैदराबाद प्रांतात होत होते त्यामुळे सामान्य माणूस या राजवटीविरुद्ध पेटून उठला ” असे देशमुख पुढे बोलताना म्हणाले . “बंधनातून मुक्त होण्याची धडपड म्हणजे शृंखला खळाळणे असते या खळाळणाऱ्या श्रृंखला या सामान्य माणसाच्या जगण्याला बळ देणाऱ्या असतात “असे मत भाऊसाहेब जाधव यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले .

” मुक्तिसंग्रामाच्या लढयाबाबत उर्वरित महाराष्ट्राला आजही फारशी माहिती नाही मात्र या लढ्याला मराठवाड्याबाहेरच्या महाराष्ट्राने समजून घेण्याची गरज आहे ” असे प्रतिपादन डॉ . संगीता बर्वे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले .या लढ्याला समजून घेतले नाही तर तो सामाजिक कृतघ्नपणा ठरेल डॉ . बर्वे पुढे बोलताना म्हणाल्या .
” हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा हा सामंतशाही विरुद्ध आधुनिकता असा होता . त्यामध्ये आधुनिक विचारांना विजय मिळाला . मात्र यासाठी मराठवाड्याने खूप काही भोगले आहे .मु कापूर स्वराज्यसारख्या घटना या अत्यंत महत्त्वाच्या असताना त्याची योग्य नोंद घेतली गेली नाही .उशिरा स्वातंत्र्य मिळण्याबरोबरच तत्कालीन राज्यकर्त्याचे सरंजामशाही धोरण यामुळे मराठवाडा १३० वर्ष मागे पडला . मात्र या मागासपणातूनच मराठवाड्याने शैक्षणिक क्षेत्रात आपली पदचिन्हे उमटवली आहेत ” असे मत पशुसंवर्धन आयुक्त व मुक्तिसंग्रामाचे अभ्यासक कौस्तुभ दिवेगावकर यांनी यावेळी व्यक्त केले .

“मुक्तिसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ हे हैद्राबाद प्रांताचे महात्मा गांधीच ठरतात सार्वजनिक जीवनातील निस्पृहता ही स्वामीजींनी सार्वजनिक जीवनाला दिलेली मोठी देणगी आहे ” असे दिवेगावकर पुढे बोलताना म्हणाले . श्री . दिवेगावकर यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले .

लेखक धनंजय गुडसूरकर यांनी या ग्रंथामागची व प्रकाशनामागची भूमिका स्पष्ट केली .मुक्तिसंग्रामाचे अभ्यासक व भाषा तज्ञ खंडेराव कुलकर्णी व लोकसाहित्याचे अभ्यासक प्रा . डॉ . दिनकरराव कुलकर्णी, श्रीमती निर्मलाबाई गुडसूरकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला .आंतरभारतीच्या वतीने राम माने,अक्षरमैत्री परिवाराच्या वतीने कवयित्री रजनी जोशी यांनी लेखक धनंजय गुडसूरकर व सौ रुपा गुडसूरकर यांचा सत्कार केला .सविता कुरुंदवाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर दिलीप फलटणकर यांनी आभार मानले . प्रा . रमेश पंडित , संकेत मुरुगकर, श्रावणी गुडसूरकर, पद्मजा मोटेगावकर , अनुजा कुलकर्णी यांनी यासाठी यांनी यासाठी पुढाकार घेतला .