*कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाची ऑनलाईन बैठक*
*कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात यावा — सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख*
मुंबई दि. 30: कोल्हापूर चित्रनगरीत सध्या अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमांचे चित्रीकरण मोठया प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात यावा असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पध्दतीने कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाची ऑनलाईन बैठक आयोजिजत करण्यात आली होती. यावेळी सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- येड्रावकर, कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे आर्किटेक्ट इंद्रजीत नागेशकर, यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले की, सध्या आपण सर्वच कोविडशी मुकाबला करीत आहोत. येणाऱ्या काळात सांस्कृतिक क्षेत्राचा विस्तार करीत असताना कोल्हापूर चित्रनगरीच्या अधिकाधिक विकास आणि आधुनिकीकरणावर भर देणे गरजेचे आहे. यासंदर्भातील नियोजन करण्यासाठी लवकरच ऑफलाईन पध्दतीने बैठक मंत्रालयात आयोजित करुन यावेळी याविषयाबाबत विचारमंथन करण्यात येईल.