डॉ.रावसाहेब कसबे यांचे प्रतिपादन
लातूर,दि.१९ः
आज देशातील वातावरण चांगले नाही. देश अजराकतेचा उंबरा ओलांडून प्रवेश केला आहे. देशातील राजकारण कोलमडले आहे. अशावेळी देशातील या कोलमडलेल्या राजकारणाला वाचविण्याची जबाबदारी आता कवी-लेखक साहित्यिकांची आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे यांनी केले.स्मृतीशेष सीताराम धसवाडीकर यांच्या प्रथम स्मरणार्थ,धसवाडीकर परिवार व मित्रपरिवाराच्यावतीने येथील दयांनद शिक्षण संस्था सभागृहात दि.१६ व १७ एप्रिल २०२२ रोजी आयोजित दोन दिवशीय आंबेडकरी साहित्य संंमेलनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.कसबे बोलत होते. विचारमंचावर संमेलनाध्यक्ष डॉ.ऋषिकेश कांबळे, स्वागताध्यक्ष प्रा.युवराज धसवाडीकर, संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.हर्षवर्धन कोल्हापूरे हे उपस्थित होते.डॉ.रावसाहेब कबसे पुढे बोलताना म्हणाले की, आज सामान्य माणसांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा असताना, याकडे कोणीही लक्ष देत नाही. स्वतःच्या माणसाचे स्वतःकडे लक्ष नाही.अशी विचित्र परिस्थिती आहे. भारतात भावनिक सलोखा राहिलेला नाही. कोणीही,कुणाशीही सौहार्दाने वागत नाही. एका माणसाला दुसर्या माणसाची भीती वाटतेय, तरुण पुरुषाला तरुण मुलीबद्दल घाणेरडे आकर्षण निमार्ण झाले आहे.त्यामुळे भारतात बलात्काराची संख्या वाढते आहे. अशावेळी साहित्यिकांची जबाबदारी खुप मोठी वाढली आहे. साहित्य आणि समाज यांंचा अनुबंध आहे, बाह्य परिस्थितीत असणारा संघर्ष दुःख,दैन्य ,आनंद, सुख यांच्याशी तुमच्या आत्म्यात वावरताना केलेला संघर्ष व संवाद म्हणजे साहित्य होय.अशी साहित्याची व्याख्या त्यांनी यावेळी सांगितली.अध्यक्षीय समारोप डॉ.ऋषिकेश कांबळे यांनी केला. या सत्राचे प्रास्ताविक प्रा.बापू गायकवाड यांनी केले. याप्रसंगी सामाजिक व साहित्य क्षेत्रात उल्लेख कार्य केल्याबद्दल डॉ.विजय अजनीकर, प्रा.ङ्गङ्ग.म.शजाजिंदे, सुनिता आरळीकर, यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.लहू वाघमारे व विद्या कांबळे यांनी केले.