कोरोनाच्या पहिल्या लाटेवर स्वार कशी झाले त्याची गोष्ट
समारंभ होता ( 4जानेवारी 2020 )अतुल देऊळगावकरांच्या “ग्रेटाची हाक ..”पुस्तकाच्या प्रकाशनाचा..व्यासपीठावरून बोलता बोलता आठवलं,बरोबर शंभर वर्षांपूर्वी रिचर्ड बेकर अशाच हाका मारत होता की! .. मग त्याच्याविषयी बोलले. तसा रिचर्ड बेकर विस्मृतीत गेला नव्हताच.एखाद्या शालेय कार्यक्रमात बोलायची वेळ आली की मी त्याची गोष्ट मुलांना सांगायचेच..तशी मी ती या प्रकाशन समारंभातही प्रौढांसमोर सांगितली..नंतर देऊळगावकरांनी विचारलं,”हा रिचर्ड बेकर कोण?” तर मनात म्हटलं या बाबाला पुन्हा गाठलंच पाहिजे.
पुन्हा म्हणजे 1989सालानंतर..
फ्लॅशबॅक…
नुकतंच माझं सालिम अली चरित्र लिहून हातावेगळं झालं होतं. पुण्यात स्मृतिवन टेकडी हिरवी करत असलेले शशी पटवर्धन म्हणाले ,आमच्या ‘अभिजित निसर्ग सेवक’ साठी काही लिहा.ते साल होतं 1989. त्याकाळात मी मुंबईच्या एशियाटिक लायब्ररीत वारंवार जात असे.तिथं जाऊन शोधाशोध केल्यावर हे रिचर्ड बेकर महाशय हाती लागले..त्यांच्या शोधात मी डाॅ अशोक कोठारींपर्यंत पोहोचले होते. बेकर मुंबईत आले होते तेव्हाचा त्यांच्यासोबतचा फोटो त्यांनी मला दिला.बेकर यांचाही झाडासोबतचा फोटो दिला.तो लेख 1989च्या अंकात छापून आला…विषय डोक्यात राहिला.अधूनमधून भाषणातून वर येत राहिला.
फ्लॅशबॅक संपला.
तर मग आता बेकर पुन्हा हातात घ्यायला हवाच.आता वसई-मुंबई फेऱ्या करणं शक्य नव्हतं..पुस्तकांचा शोध सुरू झाला. 1989चा लेख,त्यावेळच्या नोंदी जपलेल्या होत्या. पण त्या पुरेशा नव्हत्या..मदतीला आले प्रसाद कुलकर्णी.तेच हो,बुकस्पेसवाले..त्यांनी तातडीने बेकरवरचं पाॅल हॅनली लिखित मॅन ऑफ द ट्रीज..हे नवं चरित्र पाठवले.पुस्तकातली संदर्भ सूची पाहिली,तर ती माझ्या नोंदींशी मिळतीच होती..याचं भाषांतर करावं तर बेकर यांच्या भारतसंपर्कावर त्यात फारसं नव्हतं.चिपको, सुंदरलाल बहुगुणा,थर वाळवंट प्रकरण यांच्यावर जुजबी लिहिलेलं होतं..त्यापेक्षा स्वतंत्र चरित्र लिहावं असं ठरवलं..पुस्तकं मिळेनात.. ह्या ब्रिटिशाचा शोधायचं तर इंग्लंड गाठायला हवं..आठवली तिथली फेसबुक मैत्रीण प्रेरणा तांबे.तिला माझी रोझलिंड फ्रँकलीन आणि लीझ माइट्नर चरित्रं खूप आवडल्याचं तिनं फेसबुकवर म्हटलं होतं.त्या काडीचा आधार घेऊन मी तिला मेसेज केला..तिने लगेच माझ्याशी फोनवर संपर्क साधला.पुस्तकांची नावं मागितली..हे घडत असताना कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू झाला…
हातातील नोंदी,गूगल,…चरित्र आधारे सुरू झालेलं काम थांबलं..पण प्रेरणा तांबे आणि तिचा पती प्रताप थांबणारे नव्हते.त्यांनी एकेका पुस्तकाच्या पानांचे फोटो पाठवायला सुरुवात केली.माझा मुलगा ते फोटो पेनड्राइव्हवर घेऊन झेराॅक्सवाल्याकडे जाई.प्रिंट काढून त्याचं स्पायरल बाईंडिंग करून हातात ठेवी. लाॅकडाऊन(पहाला) संपला. प्रेरणाने पाठवलेली पुस्तकं हाती आली..अशा रीतीने कोरोनाच्या पहिल्या लाटेवर स्वार होत मी दिवसच्या दिवस या रिचर्ड बेकर यांचा शोध घेत राहिले..
कोरोनाकाळात काकूंनी पाठकोर्या कागदावर कुरूकुरू लिहून हातावेगळं केलेलं कोरं पुस्तक लवकरच येतंय.
जे लिहिलंय तो रचलेला इतिहास नाही याचा पुरावा म्हणून सर्व छायाचित्रं दिलीत.
लेखन:वीणा गवाणकर