लातूर/प्रतिनिधी:कोटक महिंद्रा बँक लिमिटेडच्या सीएसआर फंडातून विवेकानंद रुग्णालयास कार्डियाक ॲम्बुलन्स देण्यात आली असून या रुग्णवाहिकेचा हस्तांतरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. कोटक महिंद्रा बँकेतर्फे सीएसआर फंडातून सुमारे ३० लक्ष रुपयाची कार्डियाक ॲम्बुलन्स रुग्णालयास प्रदान करण्यात आली आहे.या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन, व्हेंटीलेटर,डीफेब्रीलेटर आदी अतिदक्षता विभागासारख्या अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. ॲम्बुलन्स प्रदान सोहळ्यास कोटक महिंद्रा बँकेचे कार्यकारी उपाध्यक्ष राजीव ठक्कर,ॲग्री बिझनेस गृपचे उपाध्यक्ष सुरेश नारापराजु व रणजीत चामले यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी नवीन कार्डियाक ॲम्बुलन्सची पुजा करुन त्यास मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला. कोटक महिंद्रा बँकेने सीएसआर फंडातून यावर्षी तीन ॲम्बुलन्स महाराष्ट्रात दिल्या असल्याचे राजीव ठक्कर यांनी यावेळी बोलताना सांगितले.आरोग्य क्षेत्राशिवाय अन्य क्षेत्रातही दरवर्षी मदत करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. विवेकानंद रुग्णालयासारख्या सेवाभावी रुग्णालयास कार्डियाक ॲम्बुलन्स देऊन बँकेने भरीव मदत केली असून ही ॲम्बुलन्स गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन संस्थेचे कार्यवाह व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राधेशाम कुलकर्णी यांनी दिले. रुग्णालयाच्या आजवरच्या प्रगतीत कोटक महिंद्रा बँकेसारख्या दानशूर संस्थांचा मोलाचा वाटा आसल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.कोटक महिंद्रा बँकेचे आभार मानून भविष्यातही बँकेने विवेकानंद रुग्णालयास सीएसआर फंडातून मदत उपलब्ध करुन द्यावी अशी आशा व्यक्त केली. विवेकानंद रुग्णालयाकडून या ॲम्बुलन्सच्या माध्यमातून अनेक अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळेल अशी आशा सुरेश नारापरासु यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

सीएसआर फंडाच्या माध्यमातून विविध संस्थांना योग्य ती मदत देऊन कोटक महिंद्रा बँक अशा पदधतीने आपले समाज ऋण फेडण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी अधोरेखीत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ.गौरी कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमास कोटक महिंद्रा बँकेचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी तसेच विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक विश्वस्त डॉ. गोपीकिशन भराडिया, संस्थेचे विश्वस्त,डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.