कैसेछुपाऊँराज़ेएग़म
(६ जानेवारी २०२३. सकाळी ७:५५)
आजकाल सर्वसाधारणपणे आपला सगळ्यांचा दिवस सुरू होतो तो…
‘कराग्रे वसते आळस: करमध्ये मोबाईल।
करमूले तु कीपॅड: प्रभाते व्हाट्सअप दर्शनम्।।’
नेहमीप्रमाणेच सूर्यदेव उगवून बराच वेळ झालेल्या सकाळी सकाळी उठून योग-प्राणायाम-सूर्यनमस्कार वगैरे व्हिडिओ पाहत, ‘उद्या पासून असाच दिनक्रम आपण नक्की सुरू करू या,’ असे स्वतःशीच म्हणत, मी व्हाट्सअप-फेसबुक- इन्स्टावरची प्रभातफेरी पूर्ण केली. प्रभातफेरी बरीच लांबली आणि ऑफिसला जाण्याची घाई सुरू झाली. तुम्हाला सांगतो… या धावपळीच्या आयुष्यात वेळ कधी कसा जातो कळत नाही.
सकाळी उठून आरामात चहा घेत घेत वृत्तपत्र वाचणाऱ्या मंडळींचा मला हेवा वाटतो. कसंही करून आठच्या आत बाथरुममध्ये अंघोळीसाठी जावंच लागतं. थोडा वेळ झाला की मग पुढचे वेळापत्रक बिघडत जाते. घरातून निघायला उशीर झाला की रस्त्यावरचा ट्रॅफिक जॅम अन् तुमची जुगलबंदी आहेच म्हणून समजा.
वृत्तपत्राचा आनंद घेता येत नाही, निवांतपणे टीव्हीवरील बातम्या पाहता येत नाहीत. मग अशा वेळी ब्रश करण्यापासून ते आंघोळ करून बाहेर येईपर्यंत हा मोबाईलच तुमची 'ॲलेक्सा' असतो. युट्यूब, विंक, स्पॉटिफाय, स्टोरीटेलवर पॉडकास्ट, बातम्या, कथा, कादंबरी, मुलाखत किंवा संगीत ऐकत ऐकत कामं आटोपायची आणि पटकन काहीतरी खाऊन ऑफिसला निघायचं हा माझा सर्वसाधारण नित्यनेम.
आजही अशाच घाईत आवरत आवरत, #मेहदी_हसन ऐकत होतो. '#हसरत_मोहानी' या लखनवी शायरची एक उत्तम गजल सुरू होती...
कैसे छुपाऊँ राज़-ए-ग़म दीदा-ए-तर को क्या करूँ
दिल की तपिश को क्या करूँ सोज़-ए-जिगर को क्या करूँ
आहाहा… काय कशिश आहे त्या शब्द-स्वरांत. सर्वसाधारणपणे कैसे छुपाऊँ राज़-ए-दिल’ किंवा ‘दिल का राज दिलमे छुपा है’ असे ऐकायला, वाचायला मिळते. इथे शायरने ‘राज़-ए-ग़म’ असं म्हटलंय.
काही दिवसांपूर्वी माझ्या एका कवितेवर एक प्रतिक्रिया होती की, ‘त्या आठवणी भूतकाळातल्या आहेत की काल्पनिक.’ खरं तर प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो आणि तो अगदी खुली किताब असतोच असे नाही. अगदी बराचसा वर्तमान काळही आपल्यापुरताच ठेवतो ना आपण. कविता कशी सुचेल, कधी सुचेल सांगता येत नाही. प्रत्येक कविता ही आपलं प्राक्तन घेऊन जन्मते असे म्हणतात.
तर गजल सुरू होती… मस्त मूड लागला होता…
कैसे छुपाऊँ राज़-ए-ग़म दीदा-ए-तर को क्या करूँ
दिल की तपिश को क्या करूँ सोज़-ए-जिगर को क्या करूँ
गजल ऐकत ऐकत मनातल्या मनात अर्थ लावत प्रत्येक शेराचा माझ्या परीने मी भावानुवाद करत होतो.
कशी व्यथा ही लपवू मी अन्, अश्रुंचे या काय करू
व्याकुळलेल्या, धडधडणाऱ्या हृदयाचे मी काय करू
मेहदी साहेब गात होते… ऐकत ऐकत मी यंत्रवत सकाळची माझी कामे आवरत होतो.
शोरिश-ए-आशिक़ी कहाँ और मेरी सादगी कहाँ
हुस्न को तेरे क्या कहूँ अपनी नज़र को क्या करूँ
ऐकता ऐकता माझ्या परीने या शेरांचा मराठीत अर्थ लावायचा प्रयत्न करत होतो…
ते प्रेमाचे तांडव आणि माझा भोळाभाव कुठे
हाय तुझे सौंदर्य, नि माझी नजर अशी मी काय करू
छान समाधी लागली होती. बाथरूम सिंगिंगपेक्षा मोबाईलला गायला लावणं कधीही चांगलं नाही का? … मेहदी साहेब पुढे गायला लागतात…
ग़म का न दिल में हो गुज़र वस्ल की शब हो यूँ बसर
सब ये क़ुबूल है मगर ख़ौफ़-ए-सहर को क्या करूँ
दुःख न राहो हृदयामध्ये, मीलन रात्री रम्य असो
माहित आहे मला परंतु, ‘चिंता उद्याचि,’… काय करू
मेहदी साहेब गात होते... मी गुंग होऊन ऐकत होतो अन् अचानक मोबाईलमधून वेगळाच आवाज येऊ लागला... गजल थांबली, लागलेली तंद्री भंग पावली. लक्ष फोनकडे गेले. व्हाटसप कॉल होता. नकळत रिसिव्हरचे बटन दाबले गेले... हॅलो म्हणणार एवढ्यात स्क्रीनवर चित्र दिसू लागले. 'ओह... म्हणजे व्हिडिओ कॉल होता हा'. विचार करायला वेळच मिळाला नाही.
समोर स्क्रीनवर चेहरा... एकदम क्लोजअपमध्ये. डोळे नेहमीप्रमाणे समोरच्याला आरपार पाहत त्याच्या अंतरंगाचा अंदाज घेणारे. ' अरेच्चा!.. हे तर आपले काका बॉय दिसताहेत.'
हे आमचे काका बॉय म्हणजे कोकणातला फणस. म्हणजे ते कोकणातले नसतानाही फणसासारखे… वरून एकदम कडक, आतून मात्र मधाळ, गोड.
काकांचा फोन म्हणजे समोरच्याचा आरपार वेध घेत अक्षरशः त्याचा इंटरव्ह्यू घेणारा. स्वतःच्या चेहऱ्यावरचे भाव अजिबात समजू न देता समोरच्याला आपल्या डोळ्यांनीच संमोहित करून बंदिस्त करणारे. फोन सुरू झाला की काही सेकंद समोरच्यावर आरपार भेदक नजर टाकत त्याचं अर्धं अवसान कमी करणारे आणि मग दोन तीन अनपेक्षित प्रश्न टाकत संपूर्ण चर्चा स्वतःच्या नियंत्रणात घेणारे आमचे हे काका बॉय म्हणजे अफाट व्यक्तिमत्त्व.
आज माझी अवस्था आणखी बिकट झाली होती, कारण नुकताच बाथरूममध्ये शिरून अंगात बनियन आणि कमरेला टॉवेल अशा ‘अर्ध दिगंबर’ अवस्थेत मी आंघोळीचे पाणी काढत होतो, गजलेत रमलो होतो आणि तितक्यात बेसावध क्षणी हा व्हिडिओ कॉल आलेला.
“नमस्कार काका”… नेहमीप्रमाणेच तिकडे काही सेकंद मोठा पॉज.
“नमस्कार… कालचा व्हिडिओ पाहिला का.”
“न… न… नाही… कोणता काका?”
“महत्वाचा होता म्हणून पाठवलाय, वेळ काढून पहा.”
“हो... हो… गडबडीत राहून गेलं. आज नक्की पाहतो.”…. पुन्हा मोठा पॉज.
“पण व्हिडिओ कशाबद्दल होता काका?”
“पहा म्हणजे कळेल.”… पुन्हा मोठा पॉज…
“पाहून फोन कर.”
“हो... हो… नक्की नक्की.”
“अजून काय?”
काका नेहमीप्रमाणे बोलण्याच्या मस्त मूडमध्ये दिसत होते… बाथरूममध्ये असल्यामुळे मी शक्यतो फक्त मान आणि चेहरा कॅमेऱ्यावर ॲडजस्ट करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत…
“काका ऑफिसला निघायचंय, आवरतोय… जरा घाई आहे, नंतर फोन करतो” असं म्हणून घाईने फोन बंद केला आणि मला ‘हुश्श’ झालं.
थांबलेली गजल पुन्हा सुरू झाली…
हाल मेरा था जब बतर तब न हुई तुम्हें ख़बर
ब’अद मेरे हुआ असर अब मैं असर को क्या करूँ
हा शेर ऐकताना आज मात्र माझ्यावर वेगळाच असर होत होता… ‘परमेश्वरा… नेमक्या अशा वेळीच व्हिडिओ कॉल का येतात? … यदाकदाचित जर आणखी दोन-तीन मिनिटे उशीरा हा फोन आला असता तर माझी काय अवस्था झाली (दिसली) असती?…’
गजलेच्या समारोपाचा शेर सुरू होता, तबल्याची लय वाढली होती, सारंगीचे स्वर रोमारोमांत पाझरत होते… मेहदी साहेब आता मतला गात होते…
कैसे छुपाऊँ राज़-ए-ग़म… … … … … … …
कैसे छुपाऊँ राज़-ए-ग़म… … … … … … …
मला पुढील शब्द ऐकायलाच येत नव्हते. मनात सुरू होतं…
कैसे छुपाऊँ राज़-ए-हमाम… हसरत-ए-दीदार को क्या करूं…
दिगंबरा… दिगंबरा…
- व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद – ८ जानेवारी २०२३