चांगला माणूस बनविणारी जीवनमुल्ये आत्मसात करा – डॉ.संगीताताई बर्वे
संस्था वर्धापन दिनानिमित्त केशवराज विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
लातूर/प्रतिनिधी : परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास केला. त्यात शंभर टक्के गुणही प्राप्त केले.अभ्यासात जसे १०० टक्के गुण मिळाले तसेच जीवनातील प्रश्न सोडवितानाही मिळायला हवेत.असे प्रश्न सोडविण्यासाठी चांगला माणूस बनणे महत्त्वाचे आहे.त्यासाठी संस्कार आणि जीवनमूल्ये आत्मसात करा,असे प्रतिपादन पुणे येथील प्रसिद्ध लेखिका,डॉ.सौ. संगीताताई बर्वे यांनी केले.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाईच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त लातूर येथील श्री केशवराज शैक्षणिक संकुलाच्या वतीने शालांत प्रमाणपत्र परीक्षा,बारावी व सीबीएसई परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.याप्रसंगी मार्गदर्शन करताना सौ.बर्वे बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य प्रवीण सरदेशमुख तर व्यासपीठावर जिल्हाधिकारी सौ.वर्षाताई ठाकूर – घुगे,नांदेड येथील रोगनिदान व आहारतज्ञ सौ.अर्चनाताई बजाज, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य संजय गुरव,श्री केशवराज शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष धनंजय तुंगीकर,कार्यवाह शैलेश कुलकर्णी,विद्यासभा संयोजक महेश कस्तुरे,केशवराज माध्यमिक विद्यालय शालेय समिती अध्यक्ष गंगाधर खेडकर, मुख्याध्यापक मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी,मुख्याध्यापक विष्णू सोनवणे,रेनिसन्स सीबीएसई स्कूलचे शालेय समिती अध्यक्ष डॉ. मनोज शिरुरे,मुख्याध्यापक महेश बांगर,केशव शिशुवाटिकेच्या शालेय समिती अध्यक्षा सौ.वर्षा डोईफोडे,मुख्याध्यापिका मंजुषा जोशी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.बर्वे म्हणाल्या की,शिक्षण घेताना केवळ गुण मिळवणे एवढेच महत्त्वाचे नसते.शालेय परीक्षांमध्ये आपण कितीही गुण मिळवले तरी पुढे शिक्षण घेताना तसेच जीवनात समोर येणारे प्रश्न वेगळे असतात.ते प्रश्न देखील आपल्याला सोडवावे लागतात.यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व चोहोबाजूंनी फुलणे आवश्यक आहे. चांगला माणूस बनण्यासाठी संवेदनशीलता,निर्णय क्षमता व कणखरपणा आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या.

विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना जिल्हाधिकारी सौ. वर्षा ठाकूर यांनी मुलांच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले त्यांनी नाराज होण्याची गरज नाही.ज्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले त्या विद्यार्थ्यांनी ही परंपरा टिकवण्याची गरज आहे. शाळेतून पहिले येणे सोपे असते परंतु पहिलेपणाची जबाबदारी टिकवणे कौशल्याचे काम आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच व्यवहार ज्ञान मिळवावे.संवाद कौशल्य,व्यक्तिमत्व विकास,संभाषण कौशल्य प्रत्येकाकडे असले पाहिजे.यापुढील आयुष्य चाकोरीबद्ध नाही.असंख्य नवी दालने आपल्यासमोर उघडणार आहेत.

अशावेळी पालकांनी मुलांवर बंधने घालू नयेत. विशेषतः मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे.एखाद्या क्षेत्रात अपयश येत असेल तर त्यासाठी दुसरा प्लॅन तयार असायला.हवा शाळा ही माणुसकी शिकवणारी विद्यापीठे आहेत. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहत इतरांच्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण करावे,असेही त्या म्हणाल्या.
आहारतज्ञ डॉ.अर्चना बजाज यांनी केशवराज विद्यालयातून शिक्षण व संस्कार मनावर बिंबवण्याचे काम केले जात असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी शारीरिक व मानसिक संतुलन आवश्यक आहे.त्यामुळे पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असेही त्या म्हणाल्या.

अध्यक्षीय समारोपात प्रवीण सरदेशमुख यांनी संस्थेच्या आजवरच्या वाटचालीची माहिती दिली. व्यक्ती,कुटुंब,समाज व राष्ट्राच्या प्रगतीसाठी संस्था कार्य करत आहे असे सांगतानाच बदलत्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने संस्थेने केलेली आखणी त्यांनी स्पष्ट करून सांगितली.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते वार्षिक नियोजन पत्रिकेचे प्रकाशन संपन्न झाले. गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.विविध विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिकेही देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी,सूत्रसंचलन वैशाली फुलसे व तेजस्विनी सांजेकर तर आभार प्रदर्शन कार्यवाह शैलेश कुलकर्णी यांनी केले. दहावी प्रमुख आदिनाथ कदम व शैलजा कुलकर्णी यांनी बक्षिसपात्र विद्यार्थ्यांच्या नावांचे वाचन केले .महेश काकनाळे यांच्या कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी,पालक,केशवराज शैक्षणिक संकुलातील शिक्षक,कर्मचारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.