सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून
केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर
भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांची प्रतिक्रिया
लातूर दि.०२- देशातील गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक, महिला, युवा या सर्वांचा विचार करून सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचा सर्वसमावेशक अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केला. ७ लाखापर्यंत आयकरात सूट देणारा, शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणारा आणि पंतप्रधान आवास योजनेत ६६ टक्यांची आर्थिक वाढ करून सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी व्यक्त केली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाचा चालू पंचवार्षीक कार्यकाळातील शेवटचा आणि अमृत काळातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी संसदेच्या सभागृहात आज बुधवारी सादर केला. या अर्थसंकल्पात निर्मला सितारमन यांनी सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला असून आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद केली आहे. नैसर्गिक खताचा वापर वाढवून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या अर्थसंकल्पामुळे शेतकऱ्यांसह शेती क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे. नव्या कर रचनेमुळे कराचा भार कमी होणार असून महिलांसाठी महिला सन्मान बचत पत्राची घोषणा करण्यात आली आहे.
मध्यमवर्गीयांना दिलासा, उद्योगांना भरारी आणि पायाभूत सुविधांना उत्तेजन देणाऱ्या या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी देशातील विशेषतः महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला बळकट करण्यास प्राधान्य दिले असून साखर उद्योगातील दहा हजार कोटी रूपयाचा जूना कर माफ केल्याने साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, गोरगरीब मध्यम वर्गीयांसाठी असलेल्या पंतप्रधान आवास योजनेत ६६ टक्के आर्थिक वाढ करून सर्वसामान्यांच्या स्वप्नातील हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्यास मोठा हातभार लावला आहे.
रस्ते उभारणी, हायवेची बांधणी आणि उर्जा प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली असून देशाला आत्मनिर्भर करणारा त्याचबरोबर गरजवंताच्या गरजा पुर्ण करणारा, छोटया उद्योजकांना दिलासा देणारा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प आहे असे आ. रमेशअप्पा कराड यांनी बोलून दाखविले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प, सर्वच घटकांना न्याय देणारा – आ. अभिमन्यू पवार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. शेतकरी, महिला, युवा, कामगार आणि उद्योग अशा सर्वच घटकांचे हित जोपासणारा हा अर्थसंकल्प आहे.
वैयक्तिक करदात्यांना मोठा दिलासा या अर्थसंकल्पामुळे मिळाला आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या निधीमध्ये ६६% इतकी घसघशीत वाढ करण्यात आली आहे,प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ४.० अभियानाची घोषणा करण्यात आली असून याअंतर्गत युवकांना कालानुरूप कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.नैसर्गिक खतांचा वापर नियोजनबद्धपणे वाढवण्यासाठी पीएम प्रणाम योजना राबविली जाणार आहे. महिलांसाठी महिला सन्मान बचतपत्र घोषित करण्यात आलं असून याअंतर्गत २ वर्षांसाठी २ लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ७.५% इतका सुरेख परतावा मिळणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड व पंकज चौधरीजी यांचे अमृतकाळातील प्रगतिशील अर्थसंकल्पासाठी मनस्वी अभिनंदन.

नवभारताच्या निर्मितीसह सर्वसामान्यांच्या प्रगतीचा अर्थसंकल्प
- माजी मत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे नवभारताच्या निर्मितीसह सर्वसामान्यांच्या प्रगतीला वेग देणारा असल्याचे स्पष्ट होत आहे. समाजातील प्रत्येक घटकांसह विविध क्षेत्राला न्याय देणारा आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतुद करणारा हा अर्थसंकल्प देशाच्या विकासाची सप्तपदी मांडणारा असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिले आहे.
कोरोना महामारीनंतर जगभरात आर्थिक मंदीचे वातावरण असतानाही भारताच्या अर्थव्यवस्थेने तग धरत आता जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडलेला देशाचा अर्थसंकल्प जगातील सर्वांसाठीच दिशादर्शक असल्याचे सांगत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी वंचीत घटकांना प्राधान्य, पायाभित सुविधा आणि गुंतवणुक, विकास, क्षमता विस्तार, हरित विकास, युवक व आर्थिक क्षेत्राचा विकास अशा सात प्रमुख मुद्दावर मांडला हा अर्थसंकल्प म्हणजे देशाच्या विकासाची सप्तपदी असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील प्रत्येक घटकांचा विचार करत या अर्थसंकल्पाच्या माध्यातून त्यांचा प्रगतीचा आणि विकासाचा विचार केला असल्याचे दिसून येते. विशेषतः शेतकर्यांसाठी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून विविध योजनाची घोषणा करत त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. शेतीबरोबरच दुध, मत्स उत्पादन आणि पशुधन क्षेत्राचाही विकास होणार असल्याने शेतकर्यांना आर्थिक बळ मिळणार आहे. विशेषतः सहकार क्षेत्रासाठीही या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून विशेष विचार केलेला असून गाव पातळीपर्यंत सहकार मजबुत करण्यासाठी या अर्थसंकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. युवक व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नवनवीन दालने खुली होणार असून, शिक्षण क्षेत्राच्या विकासासह रोजगार निर्मितीसाठी केलेल्या घोषणा भारताच्या उज्वल भविष्यासाठी महत्वाच्या ठरणार आहेत.
देशाच्या विकासात महत्वाची भुमिका पार पाडणार्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरु होणार असून बचत गटाच्या माध्यामातून महिला सक्षमीकरणासाठी विशेष पाऊल उचलले जाणार आहे. ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेतील दरी कमी करणारा हा अर्थसंकल्प समृद्ध, समर्थ व संपन्न भारत बनविणारा असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.