सरस्वती – नारायण स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने शालांत परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव
‘नजाकत ‘ गझल आणि गीत मैफिलीने लातूरकरांची मने जिंकली
लातूर ; दि.२८ (माध्यम वृत्तसेवा):- वडवळ ( नागनाथ ) येथील स्व.नारायणराव कुलकर्णी , स्व.सरस्वती कुलकर्णी वडवळकर यांच्या स्मरणार्थ यावर्षीपासून शालांत परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, नारायण व सरस्वती वडवळकर यांच्या स्मरणार्थ आयोजित नजाकत या गझल -गीत मैफलीने लातूरकरांची मने जिंकली.

सरस्वती नारायण स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने व कुलकर्णी वडवळकर परिवाराच्या वतीने स्वर्गीय नारायणराव कुलकर्णी व स्वर्गीय सरस्वती कुलकर्णी वडवळकर यांच्या स्मरणार्थ लातूर येथील अष्टविनायक मंदिराजवळील गणेश हॉलमध्ये नुकत्याच एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वडवळ (नागनाथ ) येथील प्रसिद्ध व्यक्तिमत्व व पंचायत समितीचे माजी सदस्य विश्वासराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीच्या नेत्या डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, सुप्रसिद्ध मराठी व उर्दू गझलकार अजय पांडे, व्यंकटेश कुलकर्णी यांची मंचकावर प्रमुख उपस्थित होती.

कार्यक्रमाची सुरुवात नारायणराव कुलकर्णी व सरस्वती कुलकर्णी ,विलास कुलकर्णी, डॉ. वसंत कुलकर्णी प्रतिमांना पुष्पांजली अर्पण व दीप प्रज्वलनाने झाली. शालांत परीक्षेमध्ये ९८.८० टक्के गुण मिळवणाऱ्या कै. बापूसाहेब पाटील विद्यालयाच्या ऋतुजा गिरीधर भेटे ,विद्यानिकेतन विद्यालयातील ८१.०६ टक्के गुण मिळवणाऱ्या शुभम दिलीप गोरे, जिल्हा परिषद हायस्कूल मधील सुनील मारुती दुवे ,बापूसाहेब पाटील विद्यालयातील स्मृती सतीश नवने , विद्यानिकेतन विद्यालयातील अरुण उद्धव राठोड, जिल्हा परिषद हायस्कूल मधील महेक सरफराज खुरेशी या गुणवंत विद्यार्थ्यांनी यावेळी प्रत्येकी पाच हजार व तीन हजार रुपयांचा धनादेश देऊन व पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करण्यात आला.

याप्रसंगी डॉक्टर सी एन जोशी प्रभाकर जोशी , प्रकाश कुलकर्णी राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प पुरुषोत्तम बुवा कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार गोपाळ कुलकर्णी व्यंकटेश कुलकर्णी आदींनी उपस्थित पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

सुप्रसिद्ध गझलकार व्यंकटेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रम आयोजनामागची भूमिका विषद केली . सरस्वती नारायणराव यांच्या स्मृतींना वंदन करून काही आठवणींना देखील उजाळा दिला.तसेच आपल्या आई-वडिलांच्या स्मृतीपित्यर्थ दरवर्षी एखादा सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय कीर्तनकार हभप पुरुषोत्तम बुवा कुलकर्णी यांनी या प्रतिष्ठानला एक लाख रुपयाची मदत जाहीर केली.

डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, मराठी व उर्दू गझलकार अजय पांडे यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाचे स्वागत केले.विश्वासराव पाटील यांनी अध्यक्ष समारोप केला. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन संजय अयाचित यांनी केले.
या कार्यक्रमास शशिकांत देशमुख तसेच मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य दगडू लोमटे ,प्रसिद्ध उद्योजक प्रकाश पाटील वांजरखेडकर, द रिंगल लाईव्हचे संपादक राजू पाटील, औशाचे तहसीलदार घनश्याम अडसूळ , तसेच राहुलदेव कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवीकुमार बरमदे, पंकज जैस्वाल ,सुधीर राजहंस, मनोज बाजपाई ,धनाजी तोडकर, शिरीष खंदाडे आदींनी परिश्रम घेतले.

‘नजाकत’ गझल आणि गीत मैफिलीने लातूरकरांची मने जिंकली
याच वेळी गणेश हॉलमध्ये नजाकत या गझल आणि गीत गायनाच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफिलीमध्ये सुप्रसिद्ध गायक व संगीतकार अतुल दिवे आणि वैशाली राजे यांनी गीते गायली. अतुल दिवे व वैशाली राजेश यांनी साडेतीन हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम घेतलेले आहेत. 30 मराठी सिनेमा ,90 पेक्षा जास्त टीव्ही सिरीयलला अतुल दिवे यांनी संगीत दिग्दर्शन व गायक म्हणून काम केलेले आहे. पंडित सुरेश वाडकर, उत्तरा केळकर, चंद्रशेखर गाडगीळ, शंकर महादेवन, आदर्श शिंदे, साधना सरगम, वैशाली सामंत ,वैशाली माडे इत्यादी नामवंत कलाकारांचे कार्यक्रम देखील त्यांनी केलेले आहेत. अतुल व वैशाली या दोघांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीवर मान्यवर कलावंत म्हणून काम केलेले आहे.

वडवळ नागनाथ येथे नागनाथाचे मंदिर आहे. या ग्रामदैवताला नमन करून वैशाली राजेश यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. शंभो शंकरा या स्तवनाने त्यांनी कार्यक्रमाची बहारदार सुरुवात केली. यानंतर चदरिया झीनी रे झीनी… या कबीराच्या दोह्याने अतुल दिवे यांनी रसिकांवर आपल्या आवाजाची मोहिनी घातली. त्यानंतर सुरेश भटांची .केव्हा तरी पहाटे …अरुण सांगोळे यांची तुला भेटले की बरे वाटते…. ही गीते प्रचंड ताकतीने सादर केली. सुप्रसिद्ध गझलकार व्यंकटेश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या काही गीते व गझलला या दोघांनी संगीत संयोजन व स्वरसाद देखील दिला आहे. त्यातील काही अमीट गाणी त्यांनी सादर केली. स्वतः घे तू तुझा चंद्र तू व लागली जिव्हारी इतकीच बात माझी…. अशा काही गझलला रसिकांनी दाद दिली. व्यंकटेश कुलकर्णी यांनी आपल्या आईवर लिहिलेल्या गझलला कीर्तनकार पुरुषोत्तम बुवा कुलकर्णी यांनी चाल लावून ती स्वतः रसिकासमोर सादर केली. तुझे शब्द ओटी ..तुझ्या चांदराती तुझ्या सोबतीला मिळो स्वर साती… या गीताने अतुल दिवे यांनी कार्यक्रमाची सांगता केली. हा कार्यक्रम संपूच नये असे प्रत्येकाच्या मनात होते आणि कार्यक्रम अजूनही ऐकण्याची त्यांची इच्छा होती.