30.7 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeसाहित्यकिराणावर मिळेल वाईन मंत्रिमंडळाचा निर्णय फाईन…!

किराणावर मिळेल वाईन मंत्रिमंडळाचा निर्णय फाईन…!

किराणावर मिळेल वाईन
मंत्रिमंडळाचा निर्णय फाईन…

वर्तमान सामाजिक, राजकीय घडामोडींना लक्ष आणि म.गांधी विचाराविषयी कवितेतून कृतज्ञता व्यक्त करत मसाप लातूर शाखेच्या वतीने कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले.
जगद्गुरू तुकोबाराय व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात केली.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांना दोन मिनिटे मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूरच्या वतीने म.गांधी पुण्यतिथीनिमित्त ३१ जानेवारी रोजी पत्रकार भवन लातूर येथे प्रसिद्ध व्यंगचित्रकार, विनोदी कथाकार व कवी प्रकाश घादगिने यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर मसाप शाखेचे अध्यक्ष डॉ जयद्रथ जाधव, सचिव डॉ.दुष्यंत कटारे उपस्थित होते कवी संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन कवयित्री सौ शैलजा कारंडे यांनी केले.


संमेलनावेळी नरसिंग इंगळे, नरसिंह भिकाने,विमल मुदाळे,उषा भोसले,निलीमा देशमुख,नयन राजमाने,दिलीप गायकवाड, बालाजी भंडारे,सत्यशीला कलशेट्टी, तहेसीन सय्यद,रमेश हाणमंते, सविता धर्माधिकारी दुष्यंत कटारे, उत्तम जाधव,रत्नाकर बेडगे उपस्थित होते.
कवी संमेलनाची सुरुवात नरसिंग इंगळे यांच्या विठ्ठला या भाव कवितेने झाली. भक्ती आणि कर्माचा अद्वैत भाव सांगणारी कविता गायन करून कवी संमेलनात रंगत आणली.


विठू तुझा रंग माझ्या मातीला रं आला
चंद्रभागे तीरी
मळा फुलला फुलला
सावत्याची बाग
फुलाला रं आली
रंग पिवळा पिवळा तुझ्या शेल्याला रं आला
विठू तुझा रंग माझ्या मातीला रं आला “


भक्तीमय वातावरणात रमत असताना कवी विमल मुदाळे यांनी आत्मनिष्ठ जाणीवेची गझल सादर केली.स्वप्नात वा कल्पनेत न रमता स्रीयांनी स्वतः साठी जगावे हा संदेश


स्वप्नामधले जगणे ” या कवितेतून दिला.
” स्वतः साठी जगावयाचे नकोस विसरू,
दुसऱ्यासाठी जगणे आता फार जाहले.
काळाच्याही पुढे पाहिजे पाऊल तुझे,
मागे मागे पडणें आता फार जाहले
. “


या कवी संमेलनावर नुकताच राज्य सरकारने घेतलेला किराणा दुकानातून वाईन विक्रीचा निर्णय फार भाव खाऊन गेला. डॉ.नरसिंह भिकाने यांनी “वाईन ” या कवितेतून,


किराणा वर मिळेल वाईन
मंत्रिमंडळाचा निर्णय फाईन!
शेतकरी हीत आहे टाईमलाईन
कर वसुलीसाठी फाईन साईन.”


तर हाच भाव डॉ.दुष्यंत कटारे यांनी “शासन निर्णय ” या कवितेतून पुढील पिढीवर होणा-या परिणामांची मांडणी केली.


तरूण या देशाचे भविष्य
उद्या परीक्षा देतील,
वाईन आणि दारू फरक स्पष्ट करा
याचे गांभीर्याने उत्तर लिहितील,
याच धुंदीत आयुष्य जाईल.”


शैलजा कारंडे यांनी सूत्रसंचालन करतेवेळी लहान लहान कवितेच्या ओळी तून मनाला स्पर्शून जाणा-या कविता सादर केल्या.


बरेच काही शिकवत असतात
बांधावरच्या बाभूळबोरी,
म्हणून तर
हिरकण्या होतात
कुणब्याच्या पोरी…”


नयन राजमाने यांनी स्त्रीच्या जुनेर आयुष्याला नवी दिशा दिली आहे.


सारं जुनेर आयुष्य
जरा फुलाया बघते,
साज फुलांचा लेवून
कळी उमलू लागते.


निलीमा देशमुख यांनी शब्दांची महती सांगताना सुख-दुःखात साथ देतात शब्द तर मनोभाव प्रकट करताना सोबत करतात ते शब्द असे सांगत ” कोडं ” या कवितेतून मी कोण आहेचा व जीवनातील घुसमटीचा शोध घेतला आहे.


उदासिनतेच्या ढगामागून
प्रकाश दिसतो चोहिकडे
नैराश्याच्या वा-याआडून
मन वळते उडणा-या पक्षांच्या थव्याकडे “


जीवनात ऊन, पावसाच्या सोबतच स्वतःला सांभाळावे लागते असी समजही स्वतःच घालतात.
दिलीप गायकवाड यांनी विद्रोही कविता सादर केली.
” धार लावू रे ” या कवितेतून समाजातील रूढी परंपरा मोडीत काढून महापुरुषांच्या विचारांचा स्वीकार केला पाहिजे.अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी शब्दाला धार लावली पाहिजे.


अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्या मनाला चेतवा.
गुलामांना जागं करण्या लेखनीला धार लावू रे.”


माणसांनी आता दबावाखाली जगणं सोडून विचाराप्रमाणे जगले पाहिजे.
गोविंद जाधव यांच्या कवितेने सरकारच्या विसंगतीवर लक्ष वेधून घेतले.पक्षापक्षातील जाती- धर्माला टोकदार करत समाजाला फोडण्याची नीती,तर कधी दलित सवर्णांना हाताशी धरून समाजला संघर्षात झुंजवत ठेवण्याचा नीतीचा ते हिशोब घेतात.


काळ मोठा कठीण अन् प्रसंग बाका आहे…
पडद्याआड डोकावून पहा संविधाना सोबत लोकशाहीला धोका आहे.
“शिवस्मारकाला”बंदी अन् “डान्सबारला” संधी देत.. समतेच्या खांद्यावरून नेम धरायचा
कधी सवर्ण तर कधी दलित मारायचा,
या मारामारीत लोकशाही झाली मुकी,
म्हणून तर पावलापावलावर देशातील दुभंगत राहते येकी…
म्हणून तर पावलापावलावर देशातील दुभंगत राहते येकी..”

डॉ.बालाजी भंडारे यांनी ” बापू” ही दीर्घ कवितेतून देव, विचार,निष्ठा जपत असताना संसाराची होणारी हेळसांड कथन केली.
उषा भोसले यांच्या कवितेने स्त्रीचं शक्तीपीठच सादर केले.या आसमंतात इवल्या इवल्या पाखरांना पंखात बळ देणारी,सृष्टीच संजीव पण जोपासणारी, जीवनाच्या धगीत आणि दगदगीत होरपळत असूनही नव सुखांचा प्रसव करणारी ती तू स्त्रीचं आहेस.


अश्रुत बुडतेस
मरूनही जगतेस
अमृत पाजणारी
तुच तर आहेस…”


कलशेट्टी सत्यशीला यांच्या कवितेने स्री भ्रूण हत्येचा प्रश्न बहिण- भावाच्या नात्याच्या भावबंधातून सादर केला.


एक अभागी बहिण दादा
विनंती करीते तुला,
राखी बांधण्यासाठी तरी ते
जीवन दान दे मला”


तहेसीन सय्यद यांनी सुरुवातीला मराठी भाषेची महती सांगून म.गांधींच्या सत्य, अहिंसेचे विचार हे देशाला स्वर्गाहून श्रीमंत करतील.


घेतला सर्वांनी जर
गांधीजींचा ” पण “
होईल धरती
नंदनवन
होईल धरती नंदनवन
…’


सविता धर्माधिकारी यांनी” भारत देश महान”
या देशभक्तीपर कवितेतून स्वातंत्र्य वीरांची महती गायली.


लोकमान्य टिळक,म.गांधी, स्वातंत्र्य वीर सावरकर, आझाद सेना नेताजींची
झुकले नाही हे वीर खरोखर
या वीरांचा या मातीचा
देशाला अभिमान”


याचवेळी नवोदित कवयित्री दिप्ती जाधवनेही कविता सादर केली.
या कवी संमेलनाच्या अध्यक्षीय समारोप करताना प्रकाश घादगिने यांनी चिमणी ही कविता सादर केली.आणि अध्यक्षीय समारोप केला. कवी संमेलनाला रसिक श्रोते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]