बांधकाम च्या काही तासातच महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाची मंजुरी….
आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यास यश
निलंगा – शेतकऱ्यांसह वीज ग्राहकांना महावितरणच्या संदर्भातील सुविधा सहज उपलब्ध व्हावी यासाठी कार्यालयीन व्यवस्था स्थानिक पातळीवर निर्माण करण्यासाठी कासारसिरसी येथे महावितरणचे उपविभागीय कार्यालय मंजुरीसाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. अखेर या प्रयत्नाला यश आले असून याठिकाणी उपविभागीय कार्यालयास मंजुरी मिळाली आहे.यानूसार उप कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंतासह १२ अधिकारी व कर्मचारी याठिकाणी कार्यरत राहातील.
आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा विधानसभा मतदारसंघातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषय मांडून पाठपुरावा करीत विविध कामांसाठी विकासनिधीसह पायाभूत सुविधा नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्यासाठी अनेक कार्यालये मंजूर करून आणले.त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसह सर्व सामान्य नागरिकांना आपल्या कामासाठी स्थानिक स्तरावर सेवा उपलब्ध होताना दिसत आहे.मतदारसंघातील कासारसिरसी मंडळातील नागरिकांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय स्थापन करण्यास मंजुरी मिळाल्यानंतर अवघ्या काही तासातच महावितरणचे उपविभागीय कार्यालय मंजूर झाल्याची गोड बातमी कासारसिरसी मंडळातील नागरिकांना मिळाली आहे. कासार सिरसी, कासार बालकुंदा, मदनसुरी व निलंगा ग्राम शाखा २ या ४ शाखांचा कारभार नवनिर्मित कासार सिरसी उपविभागीय कार्यालयातून हाताळण्यात येणार आहे. या नूतन कार्यालयासाठी उप कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंतासह १२ पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. प्रतिकुल भौगोलिक व प्रशासकीय रचनेमुळे कासार सिरसी मंडळातील ६८ गावांमधील नागरिकांना शासकीय कामांसाठी मोठ्या गैरसोयीला आणि दिरंगाईला सामोरे जावे लागायचे. एकामागून एक उपविभागीय कार्यालय मंजुर झाल्याने प्रशासकीय गैरसोय टाळता येणार आहे आणि कामेही वेळेवर मार्गी लागणार आहेत.
कासारसिरसी मंडळातील नागरिकांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालयासह महावितरणचे उपविभागीय कार्यालयाची मंजुरी दिल्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.