‘काश्मीर फाइल’ बंद होणे परवडणारे नाही!
सिनेमा सिनेमा
आज ‘द कश्मीर फाइल्ज’ पाहिल्यानंतर मन प्रचंड सुन्न आणि बधिर झाले आहे. काही सिनेमे खरोखरच मन सुन्न करणारे असतातच. मात्र ‘काश्मीर फाइल्ज’ पाहिल्यानंतर नक्कीच काहीतरी वेगळे घडले आहे. मन बधिर करणारी सुन्नता, कमालीची उद्वीग्नता, भयानक अस्वस्थता, असहायता, चिड, अपराधीपणाची भावना अशा अनेक संमिश्र भावना दाटून आल्या आहेत. खरेतर तब्बल तीन दशके आपल्या देशाला काश्मीरच्या समस्येने अक्षरश: छळले आहे. काश्मीरची समस्या ज्यांच्या एका जाणत्या वयात समोर आली आणि पाहता पाहता या समस्येने अक्राळविक्राळ रूप धारण केले त्या अभागी पीढीचा एका अर्थाने मी प्रतिनिधी. काश्मीर भारतापासून वेगळा होतो की काय, अशा अनामिक भितीने ग्रासले असतानाच देशात घडलेल्या एका अभूतपूर्व परिवर्तनानंतर या समस्येचे निराकरण होण्याच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल पाहण्याचे भाग्य लाभलेला त्याच पीढीचा मी प्रतिनिधी. मात्र ‘द कश्मीर फाइल्ज’’ पाहिल्यानंतर संघर्ष अजून संपला नाही, ही समस्या संपूर्णपणे सोडविण्यासाठी अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे याची जाणीव अधोरेखित झाली हे मात्र नक्की.

खरेतर १९८९ साली केंव्हातरी श्रीनगरमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय सामना दहशतवाद्यांच्या धमकीमुळे रद्द झाल्याची घटना कानावर पडली, तेंव्हापासून दिवसेंदिवस या समस्येची दाहकता अधिकच तीव्र झाली.रोजच्या रोज काश्मीरी हिंदुंच्या हत्त्येच्या आणि त्यांच्या काश्मीरमधून पलायनाच्या घटना वर्तमानपत्रात छापून येऊ लागल्या. त्या घटना वाचून संताप व्हायचा, सरकारची निष्क्रियता पाहून अंगाचा तिळपापड व्हायचा आणि स्वत:च्या असहायतेची जाणीव व्हायची.
सेक्युलॅरिझमच्या अतिरेकाचा तो काळ. साधारण तीस वर्षांंपूर्वी या खूळचट कल्पनेचा एवढा अतिरेक होता की, अतिरेकी काश्मीरी हिंदूंंना वेचून वेचून मारत असताना दूरदर्शन, वर्तमानपत्रे मात्र ‘विशिष्ट समुदायातील व्यक्तिची हत्त्या’ असा शब्द वापरून या संतापात आणखी भर घालायचे. दोन समाजात तणाव निर्माण होऊ नये यासाठी किती हा अट्टाहास?
काश्मीरमधील दहशतवाद जसा जसा उग्र रूप धारण करू लागला, तसा याच्या विरोधात या देशातील युवाशक्तिचा संताप देखील अधिक तीव्र होऊ लागला. काश्मीरमधील परिस्थिती पाहून हताश झालेल्या देशभरातील युवाशक्तीला, त्यांच्यातील देशभक्तिला, राष्ट्रभावनेला साद घातली ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने..!
११ सप्टेंबर १९९० ला ‘चलो कश्मिर’ची घोषणा देऊन विद्यार्थी परिषदेने जे ’काश्मीर बचाव’ आंदोलन उभे केले त्याचे वर्णन ‘ अभूतपूर्व ‘ या एकाच शब्दात करावे लागेल. काश्मीरचे तत्कालिन राज्यपाल जगमोहन यांनी लिहिलेल्या ‘धुमसते बर्फ’ या पुस्तकाच्या पारायणापासून ते ‘कॉलेज बंद’ ची हाक, या विषयासाठी झालेल्या कॉर्नर मिटींग्ज, प्रत्यक्ष काश्मीरी विद्यार्थिनींंचे प्रवास, भाषणे व त्यांच्या भाषणातील प्रत्येक शब्दातून काश्मीरी हिंदूंवर झालेल्या अन्यायाच्या विरोधातील अंगार या साऱ्यांमुळे प्रत्येक युवक अक्षरशः पेटून उठला होता. झेलमच्या हाकेला ओ देत ‘जिस कश्मिर को खून से सिंचा, वह कश्मिर हमारा है।’ असा निर्धार करून देशभरातील दहा हजार विद्यार्थी ज्या तडफेने जम्मु पर्यंत धडकले होते, त्या आंदोलनाचा भाग बनणे माझ्यासह हजारो युवकांच्या आयुष्यातील देशासाठी सीमेवर जाऊन लढण्याइतकेच अतुलनीय काम होते.
जम्मुच्या रणरणत्या उन्हात झालेली सभा, पुढे न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये उफाळलेला असंतोष, जम्मुतून परतताना पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांच्या घरासमोर निदर्शने करण्याचा झालेला निर्णय या असामान्य अशा उपक्रमांमधून देशभरातील युवाशक्तीच्या भावनांना खूप मोठी वाट मिळाली हे मात्र नक्की. या आंदोलनातून या समस्येबाबत युवकांमध्ये प्रचंड जागरण तर झालेच, पण लाखो विद्यार्थ्यांना थेट काश्मीरसारख्या राष्ट्रीय समस्येशी जोडण्यात हे आंदोलन खूप यशस्वी झाले. या सर्व आंदोलनाचा सर्वात वेदनादायक भाग होता तो जम्मुमधील काश्मीरी हिंदूंच्या छावण्याना भेटी देण्याचा. प्रचंड मोठमोठी घरे, शेकडो एकर सफरचंदाच्या बागा आणि वर्षानुवर्षे ज्या जन्मभूमी, कर्मभूमीत वास केला ती सारी संपत्ती सोडून नेसत्या वस्त्रानिशी कॅम्पमध्ये राहण्यास आलेल्या हिंदुंच्या वेदना, आपल्या डोळ्यासमोर झालेल्या आप्तांच्या हत्त्या झाल्याच्या घटना ऐकुन झालेले त्यांचे दु:ख वर्णन करण्यापलीकडे होते. आज ‘काश्मीर फाइल्ज’ बघताना या आंदोलनाचा इतिहास लख्खपणे डोळ्यासमोर तरळला. आपल्याच देशाचे अभिन्न भाग असलेल्या एका राज्यातील एका बुद्धिमान समुदायाचे अशाप्रकारे दहशतवादामुळे झालेले स्थलांतर ही खुपच धक्का देणारी घटना होती. ज्याचा खूप खोलवर परिणाम आजही मनाला वेदना देऊन जातो.
आज द कश्मीर फाइल्ज’ पाहताना विभिन्न संमिश्र भावनांची मनात जी गर्दी झाली ती याच कारणामुळे. काहीशी अडगळीत पडलेली, थोडीशी धूळ जमा झालेली माझ्या मनातील काश्मीर फाईल देखील आज या चित्रपटाने पुन्हा ओपन केली. ‘ संघर्ष अजून बाकी आहे’ याची जाणीव प्रखरपणे या चित्रपटामुळे झाली. तब्बल तीस वर्षापासूनचा हा प्रश्न व्यक्तीश: विद्यार्थी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता अशा विविध भूमिका बदलल्या तरी आहे तसाच आहे. आजही काश्मिरी पंडित आपल्या मूळ जागी परत गेले आहेत किंवा जाऊ शकतील अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाहीये. आपल्याच देशातील एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत समुदायाची ही शोकांतिका मन विषण्ण करणारी आहे.
काश्मीरमधील हिंदूचे जसे शिरकाण झाले तसेच आपल्या हजारो सुरक्षा रक्षकांनी देखील काश्मीरसाठी आपले बलिदान दिले आहे.आपल्या देशाला काश्मीर भारतात ठेवण्यासाठी आर्थिक किंमत तर किती द्यावी लागली याची मोजदाद करणे अवघड आहे.
प्रश्न असा निर्माण होतो की, काश्मीर प्रश्नाची सोडवणूक खरच एवढी अवघड होती?
जम्मु काश्मीरसाठी असलेले ३७० कलम हटवून गृहमंत्री अमित शहा यांनी शब्दश: पाच मिनिटात हा प्रश्न निकाली काढला होता. काश्मीरमधील फुटिरवादी नेत्यांना जेरबंद करून व इंटरनेट सेवा बंद करून जो कठोरपणा त्यांनी दाखवला त्यातून सरकारच्या खंडणीवर जगणारे हे नेते किती कागदी वाघ होते हे जगाच्या समोर आले होते. मात्र या आधीचे काँग्रेसचे सरकारच एका व्यापक इकोसिस्टीमचे भाग होते आणि त्यामुळेच या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी धाडसी पावले उचलण्यास धजावत नव्हते असे आता म्हणावे लागते.
द कश्मीर फाइल्ज’’ मध्ये दहशतवादी संघटना, तुकडे तुकडे गँग, फारूख अब्दुल्ला सारख्या विविध मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारे, मीडिया यांनी एकत्र येऊन एका व्यापक षड्यंत्राचा भाग म्हणून काश्मीर प्रश्न जिवंत ठेवण्यासाठी कसे नॅरेटिव्ह चालवले होते हे दाखवून विवेक अग्निहोत्रीने सर्वांनाच चित्रपटात अक्षरश: उघडे केले आहे. अनेक दहशतवाद्यांना ‘हिरो’ म्हणून विद्यापीठांमधील कार्यक्रमांमध्ये बोलावून त्यांना काश्मीरचा प्रश्न मांडण्यासाठी जे व्यासपीठ डाव्या चळवळीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले व त्यातून युवकांचे ब्रेन वॉशिंग करण्याचे जे प्रयत्न चालू आहेत ते डाव्या चळवळीचा बुरखा फाडणारे आहेत. त्यामुळे विवेक अग्निहोत्रीच्या या धाडसाचे नक्कीच कौतुक केले पाहिजे. मुळात आजच्या परिस्थितीत काश्मीर प्रश्नाचे स्वरूप दाखविण्यासाठी जे जे दाखवणे आवश्यक होते ते कुठलाही आडपडदा न ठेवता पुरेसे स्पष्टपणे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
काश्मीरची समस्या गेल्या तीस वर्षांपासून सततपणे वाहणारी एक भळभळती जखम आहे. गेल्या दोन अडीच वर्षांपासून मोदी सरकारच्या कठोर प्रयत्नांमुळे ही जखम आता काहीशी भरून येण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र हा प्रश्न कायम निकाली निघाला आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. या चित्रपटात राधिका मेनन नावाचे विद्यापीठातील एका प्राध्यापिकेचे पात्र पल्लवी जोशीने साकारले आहे. त्यात एका प्रसंगात ती म्हणते, ‘गव्हर्नमेंट भली उनकी हो, लेकीन सिस्टम तो हमारा है’. काँग्रेस व डाव्या मंडळींनी मीडियाला हाताशी धरून देशभरात एका प्रचंड मोठी इकोसिस्टीम उभी केली आहे. आज देशात असलेल्या बहुतेक समस्यांचे मूळ हे या इकोसिस्टम मध्ये आहे. ही सिस्टम जोपर्यंत उद्ध्वस्त होत नाही तोपर्यंंत या देशाला कधीही शांतता लाभणार नाही. ‘बुद्धा इन अ ट्रॅफिक जॅम’ असेल ‘ताश्कंद फाईल्ज’ असेल वा ‘काश्मीर फाइल्ज’ या तिन्ही चित्रपटांमधून विवेक अग्निहोत्रीने प्रभावी पद्धतीने या सिस्टमचा पर्दाफाश केला आहे.
अर्थात काश्मीर प्रश्नामधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे काश्मीरी हिंदू. ज्या साडेतीन लाखांपेक्षा अधिक हिंदूंना आपली भूमी सोडून निर्वासितांचे जीणे जगावे लागत आहे, ते सर्व जण जोपर्यंत आपल्या हक्काच्या जागी परत जात नाहीत, १९९० पर्यंत त्यांच्या नावावर असलेली जमिन, शेती, घरदार पुन्हा त्यांना प्राप्त होत नाही व पुढची हजार वर्ष आपल्याला या जागेवरून कुणी हटवू शकत नाही असा विश्वास जोपर्यंत त्यांना वाटत नाही, तोपर्यंत काश्मीर समस्या सुटली असे म्हणता येणार नाही. एक भारतीय म्हणून आपल्या सर्वांची ती एक जबाबदारी आहे. मात्र तोपर्यंत काश्मीर फाइल बंद करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार आपल्याला नाहीये.
आजही काश्मीर प्रश्नाबाबत देशविघातक असे Narative चालू आहे. अनेक विद्यापीठे, कॉलेजेस मधून ब्रेन वॉश झालेले कृष्णा पंडित या Fake Narrative चे बळी ठरलेले आहेत. अशा भ्रमित युवकांना काश्मीर प्रश्नाची सत्यता समजावून सांगावी लागणार आहे. काश्मीर प्रश्न चिघळत ठेवणे व या प्रश्नाची दाहकता सतत धगधगती ठेवणे यामागे खूप मोठे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे. हे षड्यंत्र कठोरपणे मोडून काढावे लागणार आहे.
मुळात कुठल्याही राष्ट्रीय समस्येची फाईल बंद होत नसते. काश्मीर तर भारताचा मुकुट आहे. भारताच्या या नंदनवनात जोपर्यंत संपूर्ण शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत काश्मीर फाईल बंद करणे आपल्याला परवडणारे नाही. कारण…
लाखो काश्मिरी हिंदू अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत..!!
महेश काळे