कादंबरी प्रकाशन

0
208

बालकांपेक्षा पालकांवर संस्कार होणे गरजेचे!–  संजय सोनवणी 

नागेश शेवाळकर लिखित *समूदादा* या बालकादंबरीचे थाटात प्रकाशन

पुणे:- आजच्या एकूण परिस्थितीचा विचार करता संस्काराची खरी गरज बालकांना नसून पालकांवर संस्कार करणे महत्त्वाचे आहे असे मत सुप्रसिद्ध संशोधक, लेखक संजय सोनवणी यांनी व्यक्त केले. ते नागेश सू. शेवाळकर यांनी लिहिलेल्या आणि चपराक प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशनासाठी सिद्ध केलेल्या ‘समूदादा’ या बालकादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षपदावरून बोलत होते. २६ जुलै चपराक कार्यालय, पुणे येथे अत्यंत थाटात समूदादा या कादंबरीचे प्रकाशन प्रसिद्ध लेखक अरुण कमळापूरकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संजय सोनवणी पुढे म्हणाले की, लेखक शेवाळकर यांच्या लेखनशैलीवर सानेगुरुजी यांचा प्रभाव दिसतो आहे. संस्कारक्षम अशी ही कादंबरी असून कुटुंब, समाज आदर्श झाला तर देश आपोआप आदर्श होईल अशी विचारसरणी या कादंबरीत आढळून येते. नातेवाईकांचे आपसातील संबंध कसे असावेत अशी एक आदर्श वसाहत या कादंबरीच्या माध्यमातून शेवाळकरांनी वाचकांसमोर मांडली आहे.

समूदादा कांदबरी प्रकाशित केल्यानंतर कादंबरीवर भाष्य करताना अरुण कमळापूरकर म्हणाले, ‘गोट्या आणि फास्टर फेणे या साहित्यकृतीशी नाळ जोडणारी समूदादा ही कादंबरी आहे. सर्वधर्मसमभाव, स्वच्छता, वृक्षारोपण यासह अनेक संस्कारांचे बीजारोपण शेवाळकरांनी समूदादा या कादंबरीतून केले आहे. लेखकाची भाषा सरळ, साधी, सोपी अशीच आहे. जे साहित्य बालकांना हसवते, खेळवते, प्रसंगी रडवते सोबतच संस्कार करते, मार्गदर्शन करते ते खरे बाल साहित्य. या आणि इतर अनेक कसोट्यांवर शेवाळकरांची समूदादा कादंबरी खरी उतरते. म्हणून हे कथानक प्रत्येक बालकाला माझे वाटते, पालकांना आपल्या चिमुकल्याचे वाटते हे लेखकाच्या लेखणीचे यश आहे.

याच सोहळ्यात रिधान पांडे पुणे, रामांश पांडे हैद्राबाद(तेलंगणा), ग्रीष्मा वसेकर, पुणे, इरा व्यवहारे पुणे, शारवी मुळे भोपाळ(मध्यप्रदेश), सौरीश देशमुख आणि अवनीश देशमुख (सिल्वासा, दमन), समर्थ तांबडे औरंगाबाद, यथार्थ गोस्वामी पुणे, आमोद मुळे अकोला, परम भयवाळ (चेन्नई) ह्या बच्चे कंपनीने समूदादा कादंबरीचे ऑनलाईन प्रकाशन केले. या समारंभाचे प्रास्ताविक प्रकाशक घनश्याम पाटील यांनी केले. ते म्हणाले, शेवाळकर सेवानिवृत्त शिक्षक असल्यामुळे त्यांना बालकांच्या भावभावनांची चांगली जाण आहे. बालकांवर कशाप्रकारचे संस्कार व्हावे हे या कादंबरीत शेवाळकरांनी प्रभावीपणे मांडले आहे.

लेखक नागेश शेवाळकर यांनी आपल्या भाषणात कादंबरी लेखनामागची भूमिका स्पष्ट केली. आजचा बाल वाचक किती जागरूक आहे. कथा असो, कविता असो तो कसा त्या विषयात शिरुन ते अनुभव तपासून पाहतो हे सांगितले. कार्यक्रमाचे संचलन माधव गीर यांनी केले. कार्यक्रमास विनोद पंचभाई, रवींद्र कामठे, चंद्रलेखा बेलसरे, जयंत कुलकर्णी, प्रमोद येवले इत्यादी साहित्यिकांची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here