लातूर बाजार समितीसाठी भाजपाची तगडी व्यूहरचना
लातूर दि.20-04-2023
आगामी येणार्या प्रत्येक निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव हेच भाजपचे लक्ष्य आहे. स्थानिक पातळीवर काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भाजपाच्या सर्वांनी एकत्रित येणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याशी चर्चा केली आहे. या चर्चेअंती लातूर बाजार समिती निवडणुकीसाठी भाजपाचे एकच पॅनल निवडणूक रिंगणात राहणार आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भाजपाने तगडी व्यूहरचना आखलेली असून ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्व ताकत पणाला लावण्यात येईल अशी ग्वाही लातूर शहर जिल्हा भाजयुमोचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी दिली आहे.
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणूक होऊ घातलेली असून आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी महादेव सुभाष गायकवाड, बाबासाहेब दादाराव देशमुख,निळकंठराव पवार, तानाजी रामलिंग झुुंजे, नरसिंग रंगनाथराव इंगळे, किशोर भानुदास घार, धनंजय बाचपल्ले, सूर्यकांतराव विठ्ठलराव शेळके, राजाभाऊ व्यंकटराव वैद्य, रेखा पिंपरे, सुभद्राबाई भूजंग पाटील, बब्रुवान पवार,अजित शिवाजीराव पाटील, अरूण बाबूराव लांडगे, वीर युवराज वामनराव यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे आता भाजपाचे एकच पॅनल या निवडणुकीत काँग्रेसच्या परावभासाठी सज्ज झालेले आहे.
लातूर शहरासह जिल्ह्यात काँग्रेसची असलेली ताकत कमी करून भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडी सरकारमुळे काँग्रेसला थोडीफार संजीवनी प्राप्त झाली. त्यामुळे आपली ताकत वाढली असल्याचा भास काँग्रेस नेत्यांमध्ये निर्माण झाला आहे. या भासातूनच आगामी निवडणुका आपण जिंकू अशी बतावणी काँग्रेस नेत्यांकडून होऊ लागलेली आहे. मात्र काँग्रेसचा पराभव हेच भाजपाचे लक्ष्य असल्याचे सांगत अजित पाटील कव्हेकर यांनी लातूर बाजार समिती निवडणुकीसाठी एकच पॅनल रिंगणात राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपाच्या ताकतीचे विभाजन होऊ नये आणि काँग्रेसला त्यामुळे मदत होऊ नये हाच त्यामागचा हेतू असल्याचे कव्हेकर यांनी स्पष्ट केले. बाजार समितीत यापूर्वी सत्ताधारी काँग्रेसने केवळ स्वतःचा स्वार्थ आणि हित जोपासण्याचे काम केलेे असून त्यांनी व्यापारी, हमाल आणि सभासद यांची कोणतेही हित साधले नसल्याचा आरोप केला. त्यामुळेच सत्ताधारी काँग्रेसच्या कारभारावर सर्वजणच कंटाळलेले आहेत. परिणामी काँग्रेसचा पराभव करण्याचा निश्चय मतदारांनी केलेला असून मतदारांच्या भावनेचा आदर करण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची असल्याचे कव्हेकर यांनी सांगितले.
बाजार समिती निवडणुकीसाठी एकच पॅनल असावे याकरीता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर,माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेअंती आता निवडणुकीत एकच पॅनल राहणार असून काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भाजपाने तगडी व्यूहरचना आखली असल्याचे अजित पाटील कव्हेकर यांनी सांगितले. या व्यूहरचनेच्या माध्यमातून भाजपाचे सर्वजण एकत्रित येऊन एकदिलाने आणि एकजूटीने निवडणूक प्रचारात सक्रीय सहभाग नोंदवतील असा विश्वास व्यक्त करत अजित पाटील कव्हेकर यांनी कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीसह आगामी प्रत्येक निवडणुकामध्ये काँग्रेसचा पराभव करण्यासाठी आम्ही सर्व ताकत पूर्ण पणाला लावू अशी ग्वाही दिली.