तू चंडिका , तू अदिमाया
तू लक्ष्मी , तू जिजाऊची छाया.
जागतिक महिला दिनानिमित्त
मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूर व जी.के.जोशी ( रात्रीचे) महाविद्यालय लातूर संयुक्तपणे आयोजित कवी संमेलनात कवींनी मोठी उपस्थिती दाखवत बहारदार काव्यातून रंगत आणली.
स्त्रीचे कुटुंब,समाज, संस्कृती व राष्ट्र निर्माणातील महत्त्वपूर्ण स्थान अधोरेखित करत तीच्या कार्य कर्तृत्वाचे पोवाडे कवितेतून अनेकांनी गायिले.

जी.के.जोशी महाविद्यालय संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र- प्राचार्य सचिन प्रयाग सर होते.तर कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक, राजकीय कार्यकर्त्या सौ.सुनीताताई अरळीकर, प्रमुख पाहुण्या सौ.उषा किशन भोसले, मसाप शाखेचे अध्यक्ष डॉ जयद्रथ जाधव, सचिव डॉ दुष्यंत कटारे, संयोजक प्रा.नयन राजमाने व्यासपीठावर उपस्थित होते. जागतिक महिला दिनाचे स्वरूप स्पष्ट करत प्रास्ताविक डॉ जयद्रथ जाधव यांनी केले.मनोगत पर विचार प्राचार्य सचिन प्रयाग सर आणि प्रमुख पाहुण्या सौ.उषा भोसले यांनी मांडले.कवी संमेलनाच्या अध्यक्षा सौ.सुनीताताई अरळीकर यांनी यावेळी महिला दिनानिमित्त मार्गदर्शन केले.”वैभवशाली लातूर “या बद्दल सत्कार व मनोगत विवेक सौताडेकर यांनी व्यक्त केले.

या कवी संमेलनाला योगीराज माने,अजय पांडे, नरसिंग इंगळे,प्रकाश घादगिने, रामदास कांबळे, गोविंद जाधव, विश्वंभर इंगोले, नामदेव कोद्रे,वृषाली पाटील,विमल मुदाळे, दर्शना देशमुख, सत्यशीला कलशेट्टी, सविता धर्माधिकारी, सय्यद तहेसीन, कल्पना झांबरे, सुनीता मोरे, दिलीप गायकवाड, रमेश हाणमंते ओमकार सरवदे, राजेंद्र माळी, ब्रह्मदेव खिल्लारे या कवी- कवयित्रींनी आपल्या उत्तमोत्तम काव्य रचना सादर केल्या.

कवी संमेलनाचे सूत्रसंचालन प्रा.नयन राजमाने यांनी करत कार्यक्रमाला रंगत आणली. ज्येष्ठ कवी व चित्रपट गीतकार योगीराज माने यांनी ‘माझी मुलगी’ या कवितेतून मुली विषयीचा आत्मभाव असा प्रगट केला.
” परिस्थितीचे चटके होती सुसह्य कारण…
आयुष्यातील माझ्या हिरवळ माझी मुलगी, मला न झाला मोह कधीही दागिन्यांचा…
शंभर नंबरी सोने केवळ माझी मुलगी”
गझलकार अजय पांडे यांनी स्री ही विश्वरूप आहे.ती शिवशक्तीचे स्वरूप आहे.
” अंगाईला अधर मिळाले
छायेसाठी पदर मिळाले
गोष्ट न तुमच्या माझ्यापुरती इथे शिवाला उदर मिळाले”
कवी नरसिंग इंगळे यांनी घरादाराची लेक ही भक्तीचा आनंदी मळा आहे.
” लेक विठ्ठलाचे पाय
ती चंद्रभागेची पायरी
लेक मांडिते संसार
घर देवाची पंढरी”
नयन राजमाने यांनी स्त्रीचे समाजातील स्थान अधोरेखित केली.
” स्री मानवतेचा आदर्श
भावना निरपेक्ष
माणुसकीचा वारा
मातृत्वाचा झरा”
गोविंद जाधव यांनी फटका रचनेतून स्री भ्रूणहत्येची समाजस्थिती सांगितली.

” पेटला तर दिवा, नाही तर नुसती,जळकी वात आहे.मुलीचा जन्म नाकारण्यात,बापाबरोबर शिकलेल्या आईचाही हात आहे”समाजाच्या संवेदना शून्यतेकडे लक्ष वेधले.विमल मुदाळे यांनी स्त्रीला आत्मनिर्भर तेचा संदेश दिला.कुंटुब, समाजासाठी जगता जगता आता स्वतः साठी जगण्याचा सल्ला दिला.” स्वतःचसाठी जगावयाचे नकोस विसरू, दुसऱ्यासाठी जगणे आता फार जाहले”सविता धर्माधिकारी यांनी महिला दिन ही स्त्रीयांचे कुटुंबातील स्थान, होणारी हेळसांड,घुसमट, नोकरी, संस्कृती, परंपरेची जपणूक करताना तारेवरची कसरत करावी लागते.पण या बद्दल कुठेही तक्रार न करता ती स्वयंसिद्धपणे जबाबदारी पेलते.
” भल्या पहाटे लवकर उठतेस
घरची कामेही तूच करतेस
सर्वाला नाश्ता व गरम चहाही देतेस
मुलांचही सार तूच आवरून देतेस,
वेळेकडे तुझे सततच असते लक्ष
कामात नेहमीच असतेस दक्ष
परंपरा ,संस्कृतीचे रक्षणही तूच करतेस
प्रत्येकाच्या आवडीनिवडी तूच तर जपतेस
जमेल का ? तुझ्यासारख जगावं म्हणतो
आज महीलादिन साजरा करावा म्हणतो.”
उषा भोसले यांनीही स्त्रीला स्व सामर्थ्याची जाणीव करून दिली आहे.” मनगटात तुझ्या वाघिणीचे बळ, हिंमत कर ही लढण्याची वेळ,उठ आता तू शस्त्र धर,एक तरी राक्षस ठार कर” ही विद्रोही भाव आहे.प्रा.विश्वंभर इंगोले ‘स्त्री ‘ कवितेत स्त्रीचं सासरी येणं हे किती महत्त्वाचे असते हे सांगताना ते म्हणतात,
“तुझ्याच साठी बापाचे घरदार सोडुनी येते
तुझ्याच साठी ती, आनंदे आयुष्य उधळुन देते
जुने पुराणे विसरुन सारे, तुझ्यात मिसळुन जाते
तुझ्या घराला आनंदाने, सुखात भिजवून घेते”स्त्रीच्या समर्पणाची जाणीव सहजपणे व्यक्त केली आहे.सय्यद तहेसीन यांनी ‘हिरकणी’ या कवितेतून स्त्रीच्या कर्तृत्ववाचा,सामर्थ्याचा पाढा वाचला आहे.स्री ही हिंमतवान आहे.
” स्त्री इंदिरा, कल्पना चावला किरण बेदी, मदर तेरेसा, लता ही बनते ,प्रसंगीअधिकारासाठी,
चारित्र्य सन्मानासाठी जळता निखारा ही बनते,
कधी अग्निपरीक्षेस सीता बनून उभी असते ,
कधी देवतांशी भांडून सत्यवानाला परत आणण्याचे सामर्थ्य ठेवते,कधी फुलेंची सावित्री बनून शिक्षणाची धगधगती मशाल बनते ,
स्त्री विधात्यानेच दिलेले
सृष्टीला सुंदर असे वरदान असते” म्हणून स्त्रीला कमी लेखू नका असा संदेश ही कविता देते.दिलीप गायकवाड यांनी “बहुजनांची माय ” या कवितेतून जिजाऊ,अहिल्या, लक्ष्मीबाई,रमाई व सावित्रीबाईने समाजाला दिलेली नव क्रांतिची लढाई सांगत स्री ला सावध केले आहे.

“दार उघड ग लेकी,तु दार उघड ग माय,नव क्रांतिची पहाट झाली, तुझी झोपच गेली नाय..
त्यागी रमाई भीमरायाची,माता झाली बहुजनांची
चैन सुखाची ना धनाची,चिंता फक्त दीन दुबळयांची
उपासपोटी राहून रमाई,जगली बहुजनां साठी” रामदास कांबळे यांनी सासरला नांदायला जाणा-या लेकीसाठी कासावीस झालेला बाप ही सुरेख रचना सादर केली.”सार्या लेकी साठी येतो
जाण्या नांदायाचा दिस
बाप झालेल्या बापाचा
जीव होतो कासाविस..”स्त्रीला आत्मनिर्भरतेचा मंत्र वृषाली पाटील, दर्शना देशमुख यांच्या कवितेने आईची महती सांगितली आहे.
“आग होते तळपते सूर्याची,ढाल होते संकटांशी, भाकरी तव्यावरची,चरकते भाजते तरीही आई लेकरासाठी हसते” य रमेश हाणमंते ओमकार सरवदे राजेंद्र माळी ब्रह्मदेव खिल्लारे यांनी दिले आहे.
स्री जाणीवेचा जागर या कवितेतून रसिकांना मंत्रमुग्ध करणारा होता.या कवी संमेलनाला हरिहर प्रतिष्ठानचे सचिव श्री धनराज जोशी, उपाध्यक्ष सौ. किर्ती जोशी, श्री व्यंकटेश जोशी, श्रीमती बोरा रमेश बोरा, मनिषा लातूरकर,प्रा.आरेफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विद्यादेवी कांबळे यांनी केले तर आभार प्रा.अनिता चौधरी यांनी मानले.
संकलन : प्रा. जयद्रत जाधव